नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराची कथा सपता संपत नाही. यापूर्वी खोटे प्रमाणपत्र दिले म्हणून दोन वैद्यकीय अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांची नाशिक ग्रामीण पोलीस चौकशी करीत असताना वैद्यकीय बिल मंजूर करावे, म्हणून लाच घेणाऱ्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
वैद्यकीय बिल मंजुरीच्या प्रकरणाच्या कार्यवाहीसाठी २४ हजारांची लाच घेणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने काल रंगेहाथ पकडले. राजेश नेहुलकर असे या लाचखोर लिपिकाचे नाव आहे. तक्रारदाराचे वैद्यकीय बिल मंजुरीच्या कार्यवाहीसाठी तक्रारदाराकडे नेहुलकर यांनी तीस हजारांची लाच मागीतली होती. मात्र, तडजोडीनंतर २४ हजार रुपये देण्याचे ठरले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याने सापळा रचण्यात आला. या सापळ्यात नेहुलकर अडकला.
ही कारवाई अधीक्षक सुनील कडासाने, अपर अधीक्षक नारायण न्हयालदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळशीकर प्रभाकर गवळी, नितीन कराड यांनी केली. जिल्हा रुग्णालय गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. मागील महिन्यातच आरोग्य उपसंचालकाला लाच घेतानाच रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांच्या बदली प्रकरणात खोटे प्रमाणपत्र दिले म्हणून जिल्हा रुग्णालयातीलच दोन डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही डॉक्टरांचे जामीन न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. हे दोन्ही डॉक्टर सद्या फरार आहेत.