सावंतवाडी (प्रतिनिधी) : नव्याने उभारण्यात येणाऱ्या अद्ययावत बसस्थानकाच्या कामाला जीएसटीचे ग्रहण लागले आहे. हे काम जीएसटीच्या वाढीव रकमेअभावी रखडले आहे. जीएसटी रकमेअभावी संबंधित ठेकेदाराला या कामात निव्वळ तोटा असल्याने पाच वर्षांत केवळ वर्कशॉपचे काम होऊ शकले. त्यामुळे हे काम मार्गी लावण्यासाठी एसटी महामंडळाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
सावंतवाडी शहरामध्ये संपूर्ण कोकणातील अद्ययावत एसटी बसस्थानक उभारण्याचा मुहूर्त तत्कालीन पालकमंत्री तथा सध्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला होता. केसरकरांनी खासदार विनायक राऊत यांच्यासोबत या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन केले होते. त्यावेळी संबंधित ठेकेदाराला सूचना करताना दोन वर्षांत हे काम मार्गी लावा, असेही केसरकरांनी म्हटले होते; मात्र याला पाच वर्षे उलटूनही बसस्थानकाचे काम मार्गी लागताना दिसत नाही. सद्य:स्थितीत संबंधित ठेकेदाराने वर्कशॉपचे काम पूर्णत्वास नेले आहे. उर्वरित काम पूर्ण होईल की नाही, याबाबत शंकाच आहे.
कारण, जीएसटी या कामाच्या आड येत आहे. संबंधित काम हाती घेतले तेव्हा भारत सरकारकडून जीएसटीचा निर्णय झाला नव्हता; मात्र नंतरच्या काळात जीएसटी लागू झाल्याने बांधकाम साहित्य दरात वाढ झाली. परिणामी, संबंधित ठेकेदार या कामात तोट्यात आला. कारण, पूर्वीची रक्कम आणि त्यानंतरची वाढीव रक्कम यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली. एकूणच ठेकेदाराने आपल्याला संबंधित कामाच्या टेंडरमध्ये जीएसटीची रक्कम सामावून द्यावी, अशी मागणी एसटी प्रशासनाकडे केली; मात्र गेली पाच वर्षे ही मागणी पूर्ण होत नसल्याने बसस्थानकाचे काम रखडले आहे.