मालवण (वार्ताहर) : वीज पडून होणारे नुकसान टाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या माध्यमातून मालवण बंदर जेटी येथे वीज अटकाव यंत्रणा उभारण्यात आली आहे. या यंत्रणेचे लोकार्पण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांच्या उपस्थितीत मालवण तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.
दरम्यान, चारही बाजूने एक किलोमीटर परिसराला वीज अटकाव यंत्रणेचा फायदा होणार आहे. अशी माहिती तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली. यावेळी तांत्रिक सहायक नितीन एनापुरे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, महसूल विभागाचे अधिकारी उमेश काळे, पीटर लोबो, विजय पास्ते यासह बंदर विभागाचे अधिकारी, ठेकेदार एजन्सीचे प्रेमानंद मलये उपस्थित होते.
पावसाळी कालावधीत वीज कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे वीज पडून होणारे नुकसान टाळण्यासाठी वीज अटकाव यंत्रणा बसवण्यात यावी. या सातत्याने होणाऱ्या मागणीची अखेर प्रशासनाकडून पूर्तता झाली आहे. वीज अटकाव यंत्रणेचा फायदा परिसरातील रहिवाशी, व्यापारी, किल्ले रहिवाशी, समुद्रातील नौका यांना होणार आहे. या परिसरात वीज कोसळल्यास ती या यंत्राच्या माध्यमातून खेचून जमिनीत जाणार आहे. त्यामुळे वीज कोसळून होणारे नुकसान टाळता येणार आहे.