जव्हार (वार्ताहर) : जव्हार शहरात नगर परिषदेमार्फत स्वच्छता करण्यात येत असते, घंटागाडीचे माध्यमातून घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यात येत असतो, काही वेळा घंटा गाडी आली नाही तर, नागरिक हा कचरा उघड्यावर टाकत आहे.
परिणामी या ठिकाणी डुकरांचा कळप येऊन तेथील कचरा अस्ताव्यस्त करीत आहेत, त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. ही बाब नगर परिषदेच्या आरोग्य विभागाला अनेक नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिली आहे. परंतु या बाबींवर उशिरा अंमलबजावणी होत असल्याने शहरात डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. अलीकडेच यशवंत नगरच्या जुन्या पेट्रोल पंप परिसरात एका ५३ वर्षीय इसमाला डुकरांनी चावा घेतला. या जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
शहरात आधीच मोकाट कुत्रे आहेतच त्यात डुकरांची देखील भर पडल्याने अबाल वृद्ध व लहान बालकांना घराबाहेर पडताना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरसेवकांचा कार्यकाळ काही महिन्यांवर येऊन ठेपला असल्याने प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार नगरसेवक करीत आहेत. शिवाय, नगरपरिषदेमार्फत नागरिकांना पायाभूत सुविधा देणे प्रशासकीय दृष्टीने अगत्याचे असताना या बाबीला कानाडोळा करत असल्याचा आरोप शहरातील नागरिक करीत आहेत.
एका व्यक्तीला डुकराने चावा घेतल्याची बाब कळली व हे अतिशय भयानक असून नगरपरिषदेच्या आरोग्य तथा स्वच्छता विभागाने ही बाब तत्काळ लक्षात घेऊन यावर आवश्यक उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. -वैभव अभ्यंकर, नगरसेवक, जव्हार नगर परिषद.
जव्हार शहरात डुकरांचे प्रमाण वाढले असून त्यासाठी योग्य प्रकारे उपाययोजना करण्याचे संबंधित विभागाला कळविले आहे. -मानिनी कांबळे, मुख्याधिकारी, जव्हार नगरपरिषद.