Tuesday, July 23, 2024
Homeमहत्वाची बातमीगोष्ट ‘गोधडी’मुळे घडलेल्या उद्योजिकेची

गोष्ट ‘गोधडी’मुळे घडलेल्या उद्योजिकेची

अर्चना सोंडे

आपल्या प्रत्येकाच्या लहानपणीचा एक अविभाज्य भाग म्हणजे गोधडी. जुन्या कपड्यांच्या तुकड्यांपासून बनलेली. निव्वळ धाग्यांपासून नव्हे, तर आजीने मायेने विणलेल्या या गोधडीवर आपल्यापैकी कित्येकांचं बालपण गेलंय. ती स्वत:च्या बाळाच्या गोधडीसाठी धागा आणायला गेली. तिथे एका परदेशी बाईने ती गोधडी पाहून खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. कालांतराने ही गोधडी परदेशात पोहोचली. या गोधडीच्या माध्यमातून पोहोचली चंची, बॅग्ज, खेळणी आणि आपली मराठमोळी संस्कृती. ही गोष्ट आहे गोधडीमुळे उद्योजिका म्हणून घडलेल्या “याद्रा क्विल्ट”च्या चंद्रिका किशोर यांची.

चंद्रिकाचा जन्म पुसेगावात झाला. आई वंदना, वडील दोघेही प्राथमिक आरोग्य केंद्रसारख्या सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांची बदली दहिवडीमध्ये झाल्याने संपूर्ण कुटुंब दहिवडीमध्ये स्थायिक झालं. पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण दहिवडीमध्ये झालं. चंद्रीकाला लहानपणापासून चित्रकलेची जास्त आवड होती. पण घरातल्यांना चित्रकला आवडत नव्हती. त्यांना असे वाटायचे की, हा एक छंद आहे. छंद हा तात्पुरता असावा. पण खऱ्या अर्थानं या छंदामुळेच तिच्यातील कला वाढत गेली. चंद्रिकाची इच्छा होती की, याच्या पुढील शिक्षणासाठी बाहेर शिकायला जावं. पण त्याचवेळी वडिलांची इच्छा होती की, चंद्रीकाने डी.एड. करून शिक्षक व्हावं. इथेच सरकारी शाळेमध्ये नोकरी करावी. पण ते न करता वडिलांना समजावून चित्रकलेची शिक्षिका होण्यासाठी चित्रकलेतील डिप्लोमा पूर्ण करण्यासाठी चंद्रिका बारामतीला गेली. हे करताना तिला हे उमजलं होतं की, तिची मर्यादा फक्त चित्रकलेची शिक्षिका म्हणून नाही, तर जे काही क्रिएटिव्ह दिसेल ते सगळं शिकायचं होतं. डिप्लोमा पूर्ण होत आल्यानंतर वडिलांनी निक्षून सांगितले की, आता नोकरी करायची. पुढचं शिक्षण तुला देता नाही येणार. पण याच क्षेत्रातलं पुढचं शिक्षण तिला करायचं होतं. या शिक्षणासाठी योग्य आधार न मिळाल्याने चंद्रिकाने ते घर सोडले. यापुढचा तिचा एकटीचा प्रवास सुरू झाला. शिक्षणासाठी आपण योग्य पाऊल उचलले आहे की नाही, हे त्यावेळी तिला कळत नव्हतं.

त्याकाळी मोबाइल फोन इतके जास्त नव्हते. घरातील लोकांशी काही संपर्क साधता आला नाही. त्या क्षणाला खूप धाडस करून ठरवलं की, मला काहीतरी बनून दाखवायचं आहे. त्यामुळे चंद्रिकाने पूर्ण लक्ष शिक्षणात घातलं. पहिल्यांदा स्वतःची जबाबदारी उचलली. तिच्या कॉलेजशेजारीच डी.एड, बी.एड. कॉलेज होते. त्या मुलींना मदत करून महिन्याचा खर्च भागेल, इतपत पैसे ती कमवायला लागली. हे सगळं करत असताना तिचा वर्गात पहिला नंबर आला होता.

कॉलेजनंतर तिचं लग्न झालं. अनयाच्या जन्मानंतर तिला वेळ देता यावा, यासाठी चंद्रिका पुन्हा गावी गेली. तिकडे काही काळ राहिली. कुटुंबाचं सहकार्य होतंच. पण त्यावेळी छोटी-छोटी कामं करत होती. नंतर पुन्हा पुण्यात येऊन नव्याने कामाला सुरुवात करायचा ती विचार करत होती.

चंद्रिकाने एक हातावरची गोधडी तिच्या मुलीसाठी शिवली होती. गोधडीसाठी कलरफूल धागे आणण्याकरिता ती बाजारपेठेत गेली. तिथे एका स्पॅनिश महिलेने चंद्रिकाच्या हातातली गोधडी पाहिली. तिला भारतीय संस्कृतीबद्दल खूप आवड होती. तिला ती गोधडी खूप आवडली आणि तिने ती विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. ‘ही गोधडी माझ्या मुलीसाठी शिवली आहे’, चंद्रिकाने स्पॅनिश महिलेला सांगितलं. तिनं गोधडीबद्दलचं महत्त्व चंद्रिकाला सांगितलं. गोधडीबद्दल परदेशात आकर्षण आहे. गोधडी ही व्यवसायाचं एक माध्यम होऊ शकते. हे चंद्रिकाला उमगलं. चंद्रिकाने स्पॅनिश महिलेकडून काही दिवसांचा वेळ मागितला. या पहिल्या ऑर्डरनंतर तिने आणखी गोधड्यांची ऑर्डर दिली. पण वेळ फार कमी दिला होता. त्यावेळी एकटीने हे काम करणं शक्य नव्हतं. मनुष्यबळ लागणार होतं. त्यामुळे चंद्रिका पुन्हा गावी गेली. तिथल्या ज्या महिलांना खऱ्या अर्थाने रोजगार हवा आहे, त्यांना तिने हे काम देण्याचा निर्णय घेतला. तिथून पुढे काम एकत्र करायला सुरुवात केली. त्या महिलांना चंद्रिकाने शिकविले आणि ती पहिली ऑर्डर पूर्ण केली. हे सगळं करत असताना पुढे याचं मार्केटिंग कसं करावं, याची काहीच कल्पना नव्हती.

पहिली ऑर्डर पूर्ण झाली तेव्हा त्यावेळी या कामाला काय नाव द्यायचं हे त्यावेळी सुचलं होतं. कारण त्यावेळी चंद्रिकाच्या लक्षात आलं की, गोधडी ही आई-आजीशी संबंधित असते. मायेशी संबंधित असते. म्हणून त्याला असं नाव दिलं पाहिजे, जे आईशी रिलेटेड असेल. ज्या व्यक्तीने गोधडी घेतली होती त्या व्यक्तीने एक नाव सुचवलं. “याद्रा क्विल्ट” याद्रा म्हणजे आई, क्विल्ट म्हणजे गोधडी. थोडक्यात “आईची गोधडी” असं नाव ठेवण्यात आलं. ते आता प्रसिद्ध झालं आहे.

गोधडी शिकविण्याचं काम चंद्रिका आवडीने करत होती. खेडोपाड्यांत जाऊन प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करत होती, पण ते एका मर्यादेपर्यंतच राहत होते. तिला हा व्यवसाय बारा महिने चालू ठेवायचा होता. यासाठी लागणारं भांडवल कूठूनही मिळत नव्हतं. मग तिने तिच्या बाकीची वॉल पेंटिगची कामं सुरू केली आणि त्यातून येणाऱ्या पैशातून याद्राचं काम चालू राहिलं. सामाजिक माध्यमावर याद्रा क्विल्टचं काम टाकायला सुरुवात केली. सुरुवातीला मला लोकं विचारायला लागले. कार्यशाळा घेण्याबाबत विचारणा करू लागले आणि मग गोधडी कार्यशाळा सुरू झाली.

यावेळी दोन दिवस गोधड्या प्रदर्शनात मांडल्या. आयुष्यातली पहिली सर्वोत्तम कार्यशाळा ठरली. यावेळी बऱ्याच ऑर्डरदेखील तिला मिळाल्या. पहिलं मोठ्ठं काम मिळालं ते बॅग शिवण्याचं. हे काम मिळाल्यानंतर याद्राचा खरा प्रवास सुरू झाला. कामे सगळी गावी होत होती. पण प्रदर्शन सगळे पुण्यात होत होते. हे सगळं करत असताना चंद्रिकाचा राहण्याचा वेगळाच संघर्ष सुरू होता. पुण्यात आल्यावर कधी वृद्धाश्रमात, तर कधी स्वारगेट बसस्टॉपवर ती राहिली, तर कधी मैत्रिणीकडे राहिली. असे दिवस ती काढत होती. या दरम्यान कधीकधी माल चोरीला जायचा. मग १० बाय १० ची तरी जागा घ्यावी, असं ठरवलं. हळूहळू हा प्रवास सुरू झाला. अगदी दहा बाय दहा, मग वन बीएचके, मग टू बीएचके आणि आता याद्रा क्विल्टचा पुण्यात स्टुडिओ आहे.

तिचं काम गोधड्यांपुरतं मर्यादेत नाही राहिलं आहे. पॅचवर्कचे काम चालू झाले. आजीची चंची पिशवीची, जुन्या पिढीची पण नवीन पद्धतीने ही संकल्पना बाजारपेठेत आणली. आता चंचीचा ट्रेंड झाला आहे. कापडी खेळणी, कापडी बाहुली हा शिक्षणाचा भाग तिने आपल्या कामात आणला. सुरुवात १३ खेळण्यांपासून केली होती. आता प्रत्येक प्रदर्शनाला ३०० पर्यंतची खेळणी तयार करावी लागतात.

समाजमाध्यमांमुळे जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचता येत आहे. ऑर्डर मिळत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून मागणी होतीच. आता भारताबाहेरून देखील ऑर्डर येऊ लागल्या आहेत. आता याद्राच्या सगळ्या वस्तू अमेरिकेतही लवकरच उपलब्ध होणार आहेत.

याद्रा क्विल्ट हळूहळू वाढू लागली. या दहाजणांच्या टीमशिवाय मी इथपर्यंत पोहोचू शकत नव्हते. कुटुंबातील भाऊ महेश, बहीण वर्षा आणि भाऊजी डॉ. श्रीकांत चौगुले आणि माझी मुलगी अनया यांचा खूप मोठा आधार आहे. भविष्यात याद्रा क्विल्ट खूप मोठ्या प्रमाणात भारतीय संस्कृतीचा कलेचा भाग लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करेन. आयुष्यात गोधडी हा विषय मी निवडला. माझ्या कामासाठी तो सर्वोत्तम क्षण होता, असं चंद्रिका सांगतात. याद्रा क्विल्ट गोधड्या, कापडी खेळणे, बाहुल्या, बॅग्स, होम डेकोर बनविते. या सगळ्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. नुकतेच अभिनेत्री ऊर्मिला निबांळकरच्या मुलासाठीची गोधडीची ऑर्डर पूर्ण केली. याव्यतिरिक्त शुभांगी गोखले, नंदिता पाटकर, कादंबरी कदम, सुकन्या मोने, सायली संजीव, प्राजक्ता माळी नेहमीच खरेदी करतात.तुमच्या आमच्या मायेची गोधडी आपल्यातल्या एका महिलेला उद्योजिका घडवते, हे सारंच अद्भूत आहे. चंद्रिकासारख्या लेडी बॉसला सलाम.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -