Friday, June 20, 2025

रायगडात ७७ हजार २४६ जनावरांचे लसीकरण; लम्पीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून उपायायोजना

रायगडात ७७ हजार २४६ जनावरांचे लसीकरण; लम्पीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून उपायायोजना

अलिबाग (वार्ताहर) : लम्पी स्किन या पशुधनाच्या विषाणूजन्य संसर्गिय आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी रायगड जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, प्रतिबंधक लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ७७ हजार २४६ गोवंश पशुधनाचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम यांनी दिली.


लम्पी स्कीन हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. मात्र हा आजार जनावरांपासून माणसांना होत नाही. यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. हा आजार गोवंशिय पशुधनात जास्त प्रमाणात आढळतो. या आजाराच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येत आहे. जिल्ह्यात जनावरांच्या वाहतुकीस, बाजार व शर्यतीस बंदी आहे. एखादे लम्पी संशयित जनावर आढळल्यास ते जनावर इतर जनावरांच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घेतली जात आहे. गोठ्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. पाच किलोमीटर परिसरातील जनावरांचे तत्काल लसीकरण करण्यात येत आहे.


जिल्ह्यात एकूण १ लाख ७६ हजार ७७५ गोवंश वर्गातील पशुधन असून, आत्तापर्यंत ७७ हजार २४६ गोवंश पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ६ हजार ४३६ संशयित जनावरांची तपासणी करण्यात आली, यामधील ५५ जनावरांना लम्पी संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. यामधील ३३ जनावरांनी लम्पीवर मात केली असून, ४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर १८ जनावरांवर उपचार सुरू आहेत.


पशुधनात लम्पी आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित पशुवैद्यकीय चिकिस्तालय किंवा १९६२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यात गोवंश वर्गिय पशुधनाचे १०० टक्के लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गोवंशवर्गिय पशु पालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून, लसीकरण करून घ्यावे, तसेच गावात लसीकरण मोहीम सुरू असताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. -डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड

Comments
Add Comment