समर्थ राऊळ महाराज
माझ्या गुडघ्याला वात येत होता. त्यामुळे मला चालता येत नव्हते. मला खूपच त्रास व्हायचा. उठता बसता पण येत नव्हते. तेवढ्यात प.पू. महाराज तीर्थयात्रेहून आले. आल्याबरोबर प्रथम माझी चौकशी केली. महाराजांनी दाजीला विचारले, ‘विनो खय असा?’ दाजी म्हणाले, ‘त्याला बरे नाही, म्हणून तो झोपलो आसा.’ महाराजांनी पुन्हा विचारले, ‘कुठे झोपला आहे?’ मी कांदे ठेवायच्या खोलीत झोपलो होतो. एवढ्यात महाराज आपल्या हातात चहाचा ग्लास घेऊन आले व चहा माझ्या पायावर ओतला. त्याबरोबर पायाचा वात नाहीसा झाला तो आजतागायत.
त्याचप्रमाणे मध्यंतरी मी श्रीधर चंद्रोजी परब, यांच्या फियाट गाडीतून मुंबईला जायला निघालो. संध्याकाळी ५ वाजता संगमेश्वर येथे पोहोचलो. येथील शास्त्री पुलाजवळ गाडी येताच तेथे अचानक एक लहान मुलगा गाडीसमोर धावत आला. तेव्हा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना आमची गाडी उजव्या बाजूला घेतली आणि अचानक गाडी जवळजवळ ३४ फूट खाली दरीत कोसळली. पण आम्हा चौघांपैकी कुणालाच काही झाले नाही आणि आश्चर्य म्हणजे गाडी खाली पडली ती आमच्याशिवाय कुणालाच काही माहीत नाही आणि त्यावेळी महाराज मुंबईला होते. तेथे त्यांना आम्हाला अॅक्सिडंट झाल्याची वार्ता अंतर्ज्ञानाने समजली. तेथे ते जोराने ओरडले. ‘इनो पडलो, मेले, मेले, गाडी पडली’ आणि या सामर्थ्यवान विभूतीने साडेतीनशे मैलावर असूनसुद्धा कोणीही न सांगता फक्त अंतर्ज्ञानाने जाणून घेतले होते आणि या अपघातातून आम्ही चौघेहीजण बाबांच्या आशीर्वादाने सुखरूपपणे बचावलो. त्यानंतर आम्ही दुसऱ्या गाडीने मुंबईला गेलो.
मला खूपदा अपघात झाले आहेत. पण प.पू. महाराजांच्या कृपेने प्रत्येकवेळी सुखरूपपणे बचावलो आहे. असाच मला आणखी एक अपघात झाला. असाच मी मंगेश तेलीबरोबर त्यांच्या मुलाला घेऊन निघाले कारण, त्यांचा मुलगा खूप आजारी होता. मी तिकडे जाऊन त्या मुलाला बाबांचा अंगारा लावला व मी परत पिंगुळीला आलो. तेव्हा रात्रीच्या वेळी मंगेशने टॅक्सी घेऊन सुभाष गवस यांस पाठवले. ते येऊन मला निरोप दिला की, मंगेशने तुला मुंबईला जायला बोलावले आहे. खरे म्हणजे मला कुठेही जायचे नव्हते.
दुकानात राहावे लागत असल्यामुळे माझी त्यांच्याबरोबर जाण्याची इच्छा नव्हती; परंतु दाजींनी दुकानाची जबाबदारी सांभाळल्यामुळे मी त्यांच्याबरोबर जायला निघालो, महाराज यावेळी ध्यानस्थ बसल्यामुळे त्यांना काही हाका मारून काहीच फायदा नव्हता. म्हणून आम्ही सर्वजण गाडीत बसलो व गाडी चालू झाली. मी मंगेशचा मुलगा व ड्रायव्हर आम्ही तिघेही पुढे बसलो होतो व बाकी चौघेजण मागच्या सीटवर बसले होते. गाडी चालू होती आणि मला जाणवले की, मंगेशच्या मुलाला कुणीतरी अज्ञात, अदृश्य शक्ती बाहेर ओढीत आहे. तेव्हा मी त्याला घट्ट पकडून ठेवले; परंतु काही क्षणातच मी व तो मुलगा दोघांनाही कुणीतरी गाडीबाहेर ओढून काढले. मला खूपच दुखापत झाली, माझ्या पायांना, डोक्याला, गुडघ्याला बराच मार लागलेला होता. पण मंगेशचा मुलगा सुखरूप राहिला. त्याला मी घट्ट मिठी मारल्यामुळे त्याला जरासुद्धा इजा झाली नाही. गाडी जवळजवळ एक किलोमीटर जाऊन उभी राहिली तेव्हा कुठे त्यांना समजले, अण्णा व मुलगा दोघेही गाडीत नाहीत. गाडी परत मागे वळविली व मुलाला त्यांच्या स्वाधीन करून मी भाई डिंगेकडे गावी गेलो आणि भाई डिंगेबरोबर मी कुडाळला डॉ. सौदत्ती यांच्या दवाखान्यात गेलो. तेथे डॉक्टरांनी मला तपासून ड्रेसिंग वगैरे केले. भाई डिंगे आपल्या गाडीतून डॉक्टरांना व त्यांच्या नर्सला आणत होते व परत पोहोचवित होते. जवळपास दोन महिने डॉक्टरांनी औषधोपचार करून ठिक केले. यातून वाचलो हीसुद्धा महाराजांचीच कृपा.सन १९७२ मध्ये महाराज मला गावातील देव रवळनाथाच्या मंदिरात घेऊन गेले आणि मला म्हणाले, ‘अंगठ्याच्या खाली बघ.’ पण मला काही अर्थबोध होईना. तेथून मला नंतर लिंगाच्या देवळांत घेऊन गेले व म्हणाले, ‘तुला आता प्रत्यक्ष शंकराचे दर्शन घडवितो,’ आणि आश्चर्य म्हणजे शंकराच्या पिंडीला प्रत्यक्ष शेषशाही भगवान नागरूपाने वेटाळे घालून डोलत होते. मला फार आनंद झाला व माझे हात आपोआपच जुळले गेले.