भारतीय जनमानसावर व्यापक परिणाम करणारे क्षेत्र म्हणजे चित्रपट क्षेत्र. करमणुकीबरोबरच लोकशिक्षण, प्रबोधन, सरकारी योजनांचा प्रसार, प्रचार यांसाठी चित्रपट महत्त्वाची भूमिका बजावत आले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेतही या क्षेत्राचे मोलाचे योगदान अाहे. अशा या क्षेत्रात म्हणजेच उल्लेखनीय कामगिरी करणारे कलावंत आणि तंत्रज्ञांना सरकारतर्फे दरवर्षी दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार आहे.
इ. स. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जातो. चित्रपट उद्योगातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असलेल्या समितीद्वारे त्याची निवड केली जाते. या पुरस्कारामध्ये सुवर्ण कमळ, शाल आणि १० लाखांची रोख रक्कम यांचा समावेश आहे. दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यादरम्यान हा पुरस्कार प्रदान केला जातो. यंदाचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याने रूपेरी पडद्यावरील त्यांच्या सुमारे तीन दशकांच्या कारकिर्दीचा उचित सन्मान करण्यात आला आहे. आशा पारेख यांना बालपणापासून नृत्याची आवड होती. त्यांची आई सुधा पारेख यांनी त्यांना नृत्य शिकण्यासाठी शिकवणीही लावली होती. एकदा एका कार्यक्रमात दिग्दर्शक बिमल रॉय यांनी आशा यांचे नृत्य पाहिले. त्यावेळी आशा यांचे वय दहा वर्षं होते. आशा यांचे नृत्य पाहून दिग्दर्शक बिमल रॉय यांनी त्यांना १९५७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मां’ चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांनी १९५४ मध्ये त्यांनी ‘बाप बेटी’ या चित्रपटात काम केले. १९५९ मध्ये अभिनेते शम्मी कपूरसोबत ‘दिल देके देखो’ या चित्रपटातून त्यांनी काम केले व तो चित्रपट चांगलाच गाजला. आशा पारेख यांनी ९५ हून अधिक चित्रपटात काम केले. १९५९ पासून ते १९७३ च्या काळात बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखले जाते. आशा पारेख आणि हिट चित्रपट हे सत्तरच्या दशकातील समीकरण बनले होते. आशा पारेख या त्यांच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. खास भारतीय सौंदर्याचे प्रतीक म्हणून त्यांचे नाव घेतले जाईल. तसेच उत्तम अभिनय आणि निपुण नर्तिका या गुणांच्या बळावर त्यांनी आपली वेगळी ओळख बनविली.
ज्येष्ठ दिग्दर्शक बिमल रॉय यांनी एका कार्यक्रमातील त्यांचे नृत्य पाहून त्यांना बालकलाकार म्हणून चित्रपटात संधी दिली. पुढे ‘गूँज उठी शहनाई’ या चित्रपटासाठी घेण्यात आलेले त्यांचे नाव त्या ‘ग्लॅमरस’ नसल्याचे कारण देत मागे पडले. मात्र लगेच नासिर हुसेन दिग्दर्शित ‘दिल देके देखो’ या चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली आणि त्या संधीचे त्यांनी सोने केले. हुसेन यांच्या ‘फिर वही दिल लाया हूँ’, ‘तीसरी मंज़िल’, ‘प्यार का मौसम’ आणि ‘कारवाँ’ या चित्रपटांच्याही त्या नायिका होत्या. विश्वजित, जॉय मुखर्जी, शम्मी कपूर, मनोज कुमार, सुनील दत्त, शशी कपूर, धर्मेंद्र, जितेंद्र आणि राजेश खन्ना अशा आघाडीच्या नायकांबरोबर त्यांनी भूमिका केलेले चित्रपट प्रचंड गाजले. तिसरी मंझिलमधील ‘आजा आजा मैं हूँ प्यार तेरा’, तसेच ‘पर्दे मे रहने दो’, अशी अनेक गाणी आशा पारेख यांच्या नृत्यकौशल्यामुळे रसिकांच्या कायमची स्मरणात राहिली आहेत. अभिनयात विशेष अंग नसल्याने त्यांच्या नावावर फारसे नायिकाकेंद्रित चित्रपट जमा नाहीत. चाकोरी मोडून त्यांनी ‘कटी पतंग’ चित्रपटात एका विधवेची भूमिका केली आणि त्याला ‘फिल्मफेअर’ पुरस्कारही मिळाला. फिल्मफेअरचा जीवनगौरव आणि ‘पद्मश्री’ किताबाने त्यांना गौरविण्यात आले आहे. सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे यांच्यानंतर तब्बल ३७ वर्षांनी हा सर्वोच्च पुरस्कार एका अभिनेत्रीला मिळाला आहे. असे असले तरी अचानक एकेदिवशी आशा पारेख यांनी सिनेसृष्टीला राम राम केला होता. स्वत: यावेळी नेमके काय घडले होते आणि त्यांनी सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय का घेतला याबद्दल एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हा किस्सा सांगितला. आशा पारेख या एका चित्रपटात काम करत होत्या. त्यात त्यांच्यासोबत परवीन बाबी, कादर खान, प्राण, अमजद खान हे कलाकारही होते. पण आशा यांचे वय जसे जसे वाढत गेले, तसतसे त्यांच्याकडे चित्रपटांच्या ऑफर येणे कमी झाले होते. वाढत्या वयानुसार आशा यांना दुय्यम भूमिका मिळायच्या. एका चित्रपटात त्यांना आईच्या भूमिकेसाठी विचारणा झाली होती. त्यावेळी आशा पारेख म्हणाल्या होत्या, मला आईची भूमिका करणे अजिबात आवडत नाही. पण एकदा काम नसल्यामुळे मी ते पात्र करण्यास होकार दिला.
त्यावेळी दिग्दर्शकाने मला सकाळी ९.३० वाजता पोहोचण्यास सांगितले. मी वेळेत पोहोचली. पण या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे कलाकार हे संध्याकाळी ६.३० वाजता सेटवर पोहोचले. मी या गोष्टीला फार कंटाळले होते. या त्रासाला कंटाळूनच मी सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला. माझ्यासाठी हा निर्णय घेणे फार कठीण होते. पण आयुष्यात सर्व प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते, त्यापैकी हा एक होता. त्यावेळी मी ती गोष्ट स्वीकारली. मी म्हातारी झाली होती याचा मी स्वीकार केला, असेही त्या यावेळी म्हणाल्या. मात्र सिनेसृष्टीला रामराम केल्यानंतर आशा पारेख थांबल्या नाहीत, त्यांनी गुजराती मालिकांचे दिग्दर्शन केले. तसेच त्यांनी स्वत:च्या निर्मिती संस्थेंतर्गत पलाश के फूल, बाजे पायल, कोरा कागज आणि दाल में काला यांसारख्या मालिकांचीही निर्मिती केली. विशेष म्हणजे एखादा कलाकार आपल्या क्षेत्रात कार्यरत असताना किंवा त्या क्षेत्रापासून दूर झाल्याच्या लगेचच्या काळात त्यांना महत्त्वाचा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात अाले, तर ते उचित होते. त्यामुळे आशा पारेख यांच्याबाबतीत त्यांना योग्यवेळी दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला असेच म्हणावे लागे. आता ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी, सुचित्रा सेन यांसारख्या आणखी काही ज्येष्ठ अभिनेत्रींना हा पुरस्कार देण्याच्या अनेक वर्षांच्या मागणीचाही विचार होईल, ही आशा रसिकांनी आजही सोडलेली नाही.