नाशिक (प्रतिनिधी) : बीएपीएस स्वामिनारायण मंदिरातील मूर्तीप्रतिष्ठा महोत्सवांतर्गत मंगळवारी नाशिक शहरातून भव्य नगर शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेत देशाच्या विविध भागातून आलेल्या कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह वेगवेगळ्या महापुरुषांची वेशभूषा करून सहभाग घेतला. या मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला येण्याचे भाग्य मला लाभले होते, त्यानंतर बुधवारी या मुर्तीप्रतिष्ठाविधी समारंभ देखील माझ्या हस्ते पार पडला याबद्दल समाधान वाटत असल्याची भावना यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच, स्वामीनारायण यांची कृपी म्हणूनच मी मुख्यमंत्री झालो, असेही ते म्हणाले.
अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या वतीने गोदावरी काठी तपोवनच्या केवडी वनात स्वामी नारायण मंदिर साकारण्यात आले. त्या मंदिराचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना ते म्हणाले, प्रभू श्रीराम चंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीला मंत्र नगरी म्हणून देखील संबोधले जाते. या नगरीत आता स्वामीनारायण मंदिराच्या रूपाने आणखीन एक भव्य दिव्य कलाकृती साकारली आहे.
अडीच महिन्यापूर्वी राज्यात नवीन सरकार आले आहे, या सरकारने सर्वांना पुढे घेऊन जाण्याचा विचार मांडला आहे व ते प्रत्यक्षात आणले जात आहे. राज्याच्या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद असून तुम्ही लोकांची सेवा करा. केंद्र सरकार तुम्हाला मदत करेल, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले आहे त्यामुळे प्रत्येकाच्या मनातील सरकार स्थापन झाले असून प्रत्येकाचे भले करणे हाच आपला अजेंडा असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
शाळेमधून सरस्वतीचा फोटो काढला जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. शाळेमधून सरस्वतीचा फोटो काढला जाणार नाही, असे कुणालाही काही वाटेल, पण ते आम्ही करणार नाही. जनतेला जे वाटेल, जे योग्य आहे, तेच केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
‘देशद्रोही विचारांचा राज्यात प्रसार होऊ देणार नाही’
पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवरील कारवाईनंतर पुण्यात झालेल्या निदर्शनात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये सांगितले. देश विघातक संघटनांचा चोख बंदोबस्त केला पाहिजे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना प्राप्त झालेल्या माहितीनुसारच कारवाई केली जात आहे.
देश विघातक संघटनांवर कारवाई झाल्यानंतर होत असलेल्या निदर्शनात पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देणे योग्य नाही अशा घोषणा देणाऱ्यांना देशात राहण्याचा देखील अधिकार नाही.
पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देणाऱ्यांवर राज्य सरकारने कारवाई करण्याचा निर्णय घेतला. पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर घातलेली बंदी योग्य आहे. बंदी घातलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर केंद्र व राज्य सरकारच्या गृह विभागाच्या वतीने लक्ष ठेवले जात आहे. देशद्रोही विचारांचा राज्यात प्रसार होऊ देणार नाही.