सदगुरू वामनराव पै
चमत्कारांसाठी म्हणजेच सिद्धीसाठी परमार्थ करणारे अनेक लोक आहेत. त्याचप्रमाणे भीतीपोटी परमार्थ करणारे लोकही आहेत. भीतीपोटी परमार्थ करणारे लोक जवळजवळ ९९.९० टक्के आहेत.आपण देवाचे काही केले नाही तर देवाचा कोप होईल. आपण देवाचे व्यवस्थित केले नाही तर देवाचा कोप होईल या भीतीने लोक परमार्थ करतात. गणपती आणतात पण भीतीने दीड दिवसांत विसर्जन करतात. पूर्वी वडिलांनी गणपती दहा दिवसांचा ठेवला होता, पण नीट झाले नाही तर उगीच देवाचा कोप होऊ नये म्हणून आता दीड दिवसांत विसर्जन करतो. संध्याकाळची सुद्धा वाट पाहत नाहीत. दुपारची जेवणे झाली की निघाले विसर्जनाला असे बऱ्याच ठिकाणी होते. मी कल्पनेतले काहीही काल्पनिक सांगत नाही. जे मी पाहिलेले आहे, अनुभवलेले आहे तेवढेच मी सांगतो. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव असाच भीतीपोटी करतात. आमचे एक नामधारक असाच नवरात्रीचा उत्सव करायचे. त्यांनी आमचा अनुग्रह घेतला, प्रवचने ऐकली व त्यांची भीती गेली. ते सांगत होते सदगुरूपूर्वी आम्ही नवरात्रोत्सव करायचो तेव्हा दहा दिवस आमच्या पोटात भीतीचा गोळा असायचा. देवीचे काहीतरी चुकले तर देवीचा कोप होईल. देवी इथे ठेवायची की तिथे ठेवायची. देवीला अगरबती इथे लावायची की तिथे लावायची. कसेही करून देवीचा कोप होऊ नये ही भीती असायची. पण आता आम्ही हा नवरात्रोत्सव आनंदाने साजरा करतो. आमच्या मंडळातले लोक गणेत्सव आता आनंदाने करतात. देवाबद्दलची त्यांची भीती गेली. जीवनविद्या देवावर प्रीती करायला देवाबद्दल भीती नावाची गोष्टच नाही. देवाबद्दल प्रीती वाटते. आईची भीती कधी कुणाला वाटते का? आईने धपाटा मारला तरी ते आईलाच जाऊन चिकटते. आईने धपाटा मारल्यावर थोडेसे अॅ अॅ करील व पुन्हा आईलाच जाऊन मिठी मारील तसे परमेश्वराचे आहे. परमेश्वराबद्दल प्रीती वाटली पाहिजे. कारण परमेश्वर आपल्या जीवनाचे सर्वस्व आहे.
एकदा दादरला इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत साहित्य संमेलनासाठी मला बोलावले होते. त्यांच्या दृष्टीने मी एक साहित्यिक. कारण मी पुस्तके लिहिलेली आहेत. मात्र त्या आयोजकांनी माझे प्रवचन साहित्य संघात ऐकले होते म्हणून त्यांनी मला तिथे अन्य पाच-सहा वक्त्यांबरोबर एक वक्ता म्हणून बोलावले होते. आम्हाला सर्वांना एकच विषय दिला होता, तो म्हणजे सध्या चाललेला धार्मिक स्फोट म्हणजे काय? आज लोक मोठ्या संख्येने धार्मिक होत आहेत, असा तो विषय होता. मी सांगितले की लोक आज मोठ्या संख्येने धार्मिक होत आहेत हे मला काही खरे वाटत नाही. प्रत्यक्षात लोक आज जे काही करतात ते परमेश्वराच्या भीतीपोटी करतात म्हणून आम्हाला असे वाटते की, हा धार्मिक स्फोट नाही. सांगायचा मुद्दा असा परमेश्वराबद्दल जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण परमेश्वरावर प्रेम करू शकत नाही, प्रीती करू शकत नाही.