तिरुनंतपुरन (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियाला धूळ चारल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. उद्या बुधवारपासून उभय संघांमधील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे भारताला मायदेशात आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकही टी-२० मालिका जिंकता आलेली नाही. हा इतिहास पुसण्याची भारताला संधी आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय संघासाठी अत्यंत महत्वाची असेल.
भारताला मायदेशात आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकही टी-२० मालिका जिंकता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उद्यापासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. रोहित शर्माच्या नेृतत्वाखाली भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताने मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आतापर्यंत तीन द्विपक्षीय टी-२० मालिका खेळली आहे. यातील दोन मालिका बरोबरीत सुटल्या आहेत. तर, एका मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजय मिळवला आहे.
दरम्यान, २०१५ मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताचा २-० असा पराभव केला आहे. त्यानंतर २०१९मध्ये खेळवण्यात आलेली टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली आहे. तर, आयपीएलच्या पंधराव्या हंगामानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारत दौरा केला होता. या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली गेली. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत पराभव स्वीकारलेल्या ऋषभ पंतच्या नेतृत्वात भारताने पुढील दोन सामन्यांत विजय मिळवला. परंतु, या मालिकेतील निर्णायक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. ज्यामुळे ही मालिकाही बरोबरीत सुटली.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत ७ द्विपक्षीय टी-२० मालिका खेळली गेली. यापैकी भारताने तीन मालिका जिंकल्या आहेत. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला दोन मालिकेत विजय मिळवता आला आहे.