Tuesday, January 21, 2025
Homeमहत्वाची बातमी‘भारत जोडो’वर हातोडा!

‘भारत जोडो’वर हातोडा!

डॉ. सुकृत खांडेकर

राजस्थानचे मुख्यमंत्री असलेल्या अशोक गेहलोत यांचे नाव अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी घेतले जात असताना आपला राजकीय वारस सचिन पायलट हे असता कामा नयेत म्हणून त्यांच्या समर्थकांनी थेट पक्षाच्या हायकमांडलाच आव्हान दिले आहे. कोणत्याही परिस्थितीत सचिन पायलट हे राजस्थानचे मुख्यमंत्री होता कामा नयेत अशी हटवादी भूमिका गेहलोत समर्थकांनी घेतली असून काँग्रेसच्या तब्बल ९२ आमदारांनी विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्याकडे आपले राजीनामे सादर केले आहेत. देशात काँग्रेस जेमतेम दोन राज्यांत स्वबळावर सत्तेवर असून त्यातील राजस्थान हे एक राज्य आहे. गेहलोत यांचा अहंकार आणि त्यांच्या समर्थकांनी केलेले शक्तिप्रदर्शन यांतून या राज्यातील काँग्रेस सरकारलाही तडे गेले आहेत. नवा नेता निवडीसाठी हायकमांडने पाठवलेल्या दोन्ही निरीक्षकांना न भेटता गेहलोत समर्थकांनी एक गठ्ठा राजीनामे सादर करून पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरच थेट दबाव टाकला आहे. आम्हाला गेहलोतच मुख्यमंत्री हवेत किंवा गेहलोत सांगतील तोच या राज्याचा मुख्यमंत्री होईल, अशी ठाम भूमिका या आमदारांनी घेतली आहे. देशपातळीवर काँग्रेस कमकुवत असताना व दुसरीकडे राहुल गांधींची कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा चालू असताना राजस्थानमधील काँग्रेस आमदारांच्या बंडाने पक्षापुढे मोठे धर्मसंकट उभे ठाकले आहे.

राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री झालेल्या अशोक गेहलोत यांच्या नावाला गांधी परिवाराने काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार म्हणून पसंती दिली तेव्हा गेहलोत यांचे पारडे पक्षात जड झाले. काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरूर व अन्य चार जणांची नावे चर्चेत असली तरी गेल्या आठवड्यात गेहलोत यांनी दिल्लीला जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली व नंतर केरळमधील कोची येथे जाऊन भारत जोडो यात्रेवर असलेल्या राहुल गांधी यांचीही भेट घेतली. हायकमांड जी जबाबदारी सोपवेल ती आपण पार पाडू अशी त्यांनी या भेटीनंतर भूमिका मांडली. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर निवड झाली तरी राजस्थानचे मुख्यमंत्रीपदी कायम राहून काम करावे, अशी गेहलोत यांची इच्छा होती. पण राहुल गांधी यांनी स्वत:च उदयपूरच्या अधिवेशनात एक व्यक्ती, एक पद असा ठराव मांडल्यामुळे व त्या भूमिकेशी आजही राहुल ठाम असल्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार हे गेहलोत यांना कळून चुकले. गेहलोत यांच्या जागी सचिन पायलट यांची निवड होणार हे गेहलोत गटाला समजल्याने काँग्रेसच्या आमदारांमध्ये असंतोष भडकला.

जयपूरमधेही नये युग की तैयारी, असे सचिन पायलट यांच्या फोटोसह फलक झळकले. त्यामुळे गेहलोत गट आक्रमक बनला.आम्हाला पायलट मुख्यमंत्री नकोत, हायकमांडने आमच्यावर मुख्यमंत्री लादू नये अशी भूमिका गेहलोत समर्थक आमदारांनी घेतली. एवढेच नव्हे नवा नेता निवडीसाठी बोलाविलेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीवर गेहलोत समर्थकांनी चक्क बहिष्कार घातला. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक होईपर्यंत म्हणजे १९ ऑक्टोबरपर्यंत गेहलोत समर्थक आमदार कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, अशी कठोर भूमिका या गटाने जाहीर केली. गेहलोत समर्थकांनी तीन अटी पक्षाचे निरीक्षक मल्लिकार्जुन खरगे व अजय माकन यांच्यापुढे ठेवल्या आहेत. ज्यांनी राज्यात काँग्रेस सरकार वाचवले त्या गेहलोत समर्थक आमदारांच्या मधूनच नवा मुख्यमंत्री निवडण्यात यावा ही पहिली अट आहे. राष्ट्रीय अध्यक्षांची निवड झाल्यावरच राजस्थानचा नवा मुख्यमंत्री कोण हे ठरविण्यात यावे ही दुसरी अट आहे. तिसरी अट म्हणजे, जो नवीन मुख्यमंत्री असेल तो अशोक गेहलोत यांच्या पसंतीचा असावा. काँग्रेस हायकमांडलाच अटी घालून आपल्याला हवा तो मुख्यमंत्री मिळविण्यासाठी गेहलोत गटाने दबावाचे राजकारण खेळले आहे. यापूर्वी कोणत्याही राज्यात नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करताना, निर्णय हायकमांडवर सोपविण्यात येत आहे, असा एक ओळीचा ठराव संमत करण्याची प्रथा होती. पण गेहलोत समर्थक आमदारांनी नवा मुख्यमंत्री ठरवताना हायकमांडने आमचे ऐकले पाहिजे, अशी खेळी खेळली आहे. गेहलोत समर्थकांच्या या दबावाच्या खेळीवर निरीक्षक अजय माकन कमालीचे संतप्त झालेत. विधिमंडळ पक्षाने बोलाविलेल्या बैठकीला आमदारांनी हजर राहायचे नाही, ही अतिशय गंभीर व धक्कादायक बाब आहे. अशा बैठकीत प्रत्येक आमदारांची वैयक्तिक चर्चा करून त्यांचे काय मत आहे हे निरीक्षकांना जाणून घ्यायचे असते. पण ती संधी गोहलोट समर्थकांनी दिल्लीहून आलेल्या निरीक्षकांना मिळूच दिली नाही. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार घालणे हे बेशिस्त वर्तन आहे.

काँग्रेसच्या इतिहासात हायकमांडला सशर्त ठराव पाठवून नवा मुख्यमंत्री निवडलेला नाही. नेता निवडीसाठी दिल्लीहून आलेले दोन्ही निरीक्षक मल्लिकार्जुन खरगे व अजय माकन हे आमदारांना न भेटताच दिल्लीला परतले. दरम्यान गेहलोत व पायलट समर्थकांत समन्वय साधण्यासाठी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना दिल्लीला बोलावून पक्षाने यांच्यावर जबाबदारी दिली. राजस्थानात सत्ताधारी काँग्रेस पक्षात घडलेल्या राजकीय नाट्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. एक व्यक्ती मुख्यमंत्री होऊ नये म्हणून सत्ताधारी पक्षाने संपूर्ण राज्यालाच नव्हे, तर काँग्रेस पक्षाला व काँग्रेस हायकमांडला कसे वेठीला धरले हे देशाला बघायला मिळाले. गेहलोत समर्थकांचे म्हणणे आहे की, आम्ही काँग्रेस हायकमांड किंवा गांधी परिवाराच्या विरोधात नाही. आम्ही सचिन पायलट यांच्या वैयक्तिक विरोधात नाही. पण दोन वर्षांपूर्वी सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखाली भाजपशी हातमिळवणी करून गेहलोत सरकार पाडण्याचे जे कारस्थान रचले गेले, त्यात सहभागी असलेल्या कोणालाही मुख्यमंत्रीपद मिळता कामा नये, अशी आमची भूमिका आहे. गेलहोट समर्थकांनी दावा केला की, पक्षाच्या १०२ पैकी ९२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सादर केले. उद्या शिस्तभंगाची कारवाई करायची म्हटले तरी कोणा कोणावर करणार? गेहलोत सरकार संकटात असताना ज्यांनी पक्षाला साथ दिली, त्यापैकी कोणालाही मुख्यमंत्री करा, असे पायलट विरोधक सांगत आहेत. याचा दुसरा अर्थ राजस्थानमधील पक्षाच्या शंभर आमदारांनी थेट हायकमांडला आव्हान दिले आहे. हे सर्व आमदार गेहलोत यांचे खंदे समर्थक मानले जातात. खरगे व माकन या निरीक्षकांनी बोलविलेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला न जाता, हे सर्व आमदार नगरविकास मंत्री शांती धारिवाल यांच्या निवासस्थानी जमले व तेथून एकत्रितपणे बसेसमधून विधानसभा अध्यक्षांच्या निवासस्थानी गेले व आपले राजीनामे सादर केले. गेहलोत यांना काँग्रेस पक्षाने संघटना व सरकारमध्ये आजवर भरपूर काही दिले. केंद्रात मंत्रीपद, राज्यात तीन वेळा मुख्यमंत्रीपद, प्रदेशाध्यक्ष, अ. भा. काँग्रेसचे सरचिटणीस अशा महत्त्वाच्या पदांवर त्यांना संधी दिली. पक्षाच्या सर्वोच्च पदासाठी गांधी परिवाराची त्यांना पहिली पसंती असतानाही त्यांचा जीव राजस्थानात जयपूरच्या सत्तासिंहासनात अडकतो, याचेच मोठे नवल वाटते.

आपल्यानंतर कोणी मुख्यमंत्री व्हायचे ते आपणच ठरवू असे ते कसे म्हणू शकतात? काँग्रेस अध्यक्षपदासाठी गांधी परिवाराने गेहलोत यांना पहिली पसंती दिली तसेच राजस्थानचे नवे मुख्यमंत्री म्हणून सोनिया, राहुल, प्रियंका यांनी सचिन पायलट यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला आहे. गेहलोत समर्थकांचे बंड म्हणजे गांधी परिवाराला दिलेले आव्हान आहे. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होऊ पाहणाऱ्या गेहलोत यांच्याकडून अध्यक्षपदाची निवडणूक होण्यापू्र्वीच गांधी परिवाराला असे आव्हान दिले जात असेल, तर पक्षात मोठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे, असेच म्हणावे लागेल. सचिन पायलटच्या विरोधात गेहलोत समर्थक आमदारांनी बंडाचा झेंडा फडकावून हायकमांडरला आव्हान दिले आहेच. पण राहुल गांधी यांच्या ‘भोरत जोडो’ यात्रेवर हातोडा मारला आहे.

[email protected]

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -