पिंपळगाव (वार्ताहर) : साकोरे मिग (ता. निफाड) बड्या राजकीय नेत्यांचे गाव अन् निफाडच्या राजकारणाला कलाटणी देणारे गाव म्हणून ओळखले जाते. सातासमुद्रापार द्राक्ष निर्यात करण्यात हुकमत असणारे शेतकरीही येथे आहेत. राजकीय अन् आर्थिक समृद्धी लाभलेल्या साकोरे मिगमध्ये आगळावेगळा स्नेहमेळावा झाला.
माजी पंचायत समिती सदस्य अनिल बोरस्ते यांच्या संकल्पनेतून मिसळ पार्टीचे आयोजन केले गेले. तर्रीदार मिसळीवर ताव मारताना राजकीय नेत्यांनी राजकारणावर तर शेतकऱ्यांशी द्राक्षांच्या ऑक्टोबर छाटणीवर चर्चा रंगली. अनिल बोरस्ते यांच्या फार्महाउसवर झालेल्या मिसळ पार्टीला आमदार दिलीप बनकर यांची प्रमुख उपस्थिती राहिली. साकोरे मिगची ग्रामपंचायतीची निवडणूक पुढील महिन्यात होण्याची चिन्हे आहेत. येत्या चार-सहा महिन्यांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजू शकते. त्यामुळे बोरस्ते यांनी आयोजित केलेल्या मिसळ पार्टीतून गटाची मोट नव्याने बांधण्याचा बोरस्ते यांचा प्रयत्न दिसतो.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेले अनिल बोरस्ते यांनी पंचायत समितीसह साकोरेचे उपसरपंचपद, सोसायटीचे संचालक, पिंपळगाव बाजार समितीचे संचालकपद भूषविले आहे. गोडबोले स्वभावाचे बोरस्ते यांनी मिसळ पार्टीतून काय संदेश दिला याचा जो तो आपल्या परीने अंदाज बांधत आहे. त्यांच्या मिसळ पार्टीने विरोधकांची ॲसिडिटी मात्र वाढविली आहे.
काही दुरावलेलेही बोरस्ते यांच्या मिसळ पार्टीत दिसल्याने त्यांनाही चुचकारण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. जुन्या मित्रांसोबत दिलजमाईचा प्रयत्न बोरस्ते यांनी केलेला दिसतो. नुकतीच झालेली मविप्र निवडणुकीची झणझणीत चर्चाही मिसळ पार्टीत झाली. एरवी शहरात दिसणारा मिसळ पार्टीचा उपक्रम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर झाल्याने व विविध विषयांवरील चर्चेमुळे गमतीजमतीसह एकच धमाल आली.
संततधारेने द्राक्षबागांच्या ऑक्टोबर छाटण्या खोळंबल्या आहेत. पावसाने उघडीप दिल्याने पार्टीतील शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसत होते. छाटणीच्या नियोजन, द्राक्षांचे भाव यावर संवाद घडला. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष भागवत बोरस्ते, अशोक माळोदे, शिवाजी माळोदे, विलास बोरस्ते, रमेश बोरस्ते, किरण बोरस्ते, माणिकराव त्र्यंबक बोरस्ते, काशीनाथ हिरे, रज्जाक शेख आदी उपस्थित होते.
अनिल बोरस्ते सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. समाजाच्या सुखदुःखात धावण्याबरोबरच ग्रामविकासाचा ध्यास आहे. साकोरेगावच्या विकासासाठी ते नेहमी माझ्याकडे पाठपुरावा करतात. मिसळ पार्टीतून त्यांनी सामाजिक सलोखा वाढविला आहे. – आमदार दिलीप बनकर
संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र येऊन चर्चा घडावी, हा मिसळ पार्टीचा उद्देश होता. तरुणांनी सामाजिक कार्यात पुढे यावे, परस्परांना संकटात हात द्यावा, असा संदेश द्यायचा होता. यामागे कोणताही राजकीय हेतू नाही.
-अनिल बोरस्ते, माजी पंचायत समिती सदस्य, निफाड