शिबानी जोशी
राष्ट्रसेविका समिती ही महिलांची संघटना कशी स्थापन झाली? याची माहिती आपण गेल्या लेखात घेतलीच आहे. वंदनीय मावशी म्हणजे लक्ष्मीबाई केळकर यांनी या महिला संघटनेची स्थापना केली. चटकन लक्षात एक वैशिष्ट्य असे आले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्र सेविका समिती या दोघांचीही आद्याक्षरे आरएसएस अशी आहेत. दोन पटरी असलेल्या रुळावरून रेल्वेगाडी जशी वेगवान धावते तसेच या दोन्ही संघटनांचे समांतर कार्य देश निर्माण करण्यासाठी वर्षानुवर्षं सुरू आहे, असं राष्ट्रसेविका समितीच्या आणि अनेक महिला संघटनांच्या संस्थांच्या उभारणीमध्ये आघाडीवर असलेल्या विलेपार्ले इथल्या कार्यकर्त्या सुशीला महाजन सांगतात. विविध महिला संघटनांशी निगडित असणाऱ्या खुद्द सुशीलाताई महाजन यांच्याकडूनच संस्थांची माहिती घ्यावी म्हणून मुद्दाम त्यांना भेटायला गेले आणि या वयातही असलेली कामाविषयीची त्यांची आत्मीयता अनुभवली. बाईंचा उत्साह बघून मी चकितच झाले. वयाच्या ९३व्या वर्षीही सुशीलाताई महाजन यांची स्मरणशक्ती तल्लख आहे. प्रत्येक सनावळीसह, कार्यकर्त्यांच्या नावासह त्यांना अनेक संस्थांच्या स्थापनेची आणि त्यांच्या विस्ताराची घटना आठवते. राष्ट्रसेविका समिती आणि संघ हे बहीण-भावाप्रमाणे काम करत असतात. घरातच संघ विचारांच वातावरण असल्यामुळे लहानपणापासूनच त्या, त्यांचे भाऊ संघ विचारांची बांधील होते. त्यांच माहेर कल्याणचं, १९४८ साली संघावर बंदी आली होती. त्यामुळे तिथे जमणाऱ्या समितीच्या तरुण तसेच प्रौढ कार्यकर्त्यांनी एकत्र येण्यासाठी भजनी मंडळ सुरू केलं. बंदी आली असली तरी काम बंद होता कामा नये, बायका एकत्र आल्या पाहिजेत. या विचारातून भजनी मंडळ सुरू झालं. या भजनी मंडळातही सुशिलाताई महाजन हिरीरीने भाग घेत असत. विवाह झाल्यानंतर त्या विलेपार्ले इथे राहायला आल्या. पार्ले टिळक विद्यालय या शिक्षण संस्थेत शिक्षिकेच्या रूपात अनेक सुसंस्कृत विद्यार्थी घडवण्याचं काम महाजन बाई करू लागल्या. त्याशिवाय त्यांनी समितीचं कामही चालू ठेवलं. त्यावेळी मुंबईमध्ये समितीच्या दैनंदिन आणि साप्ताहिक अशा ९० शाखा सुरू होत्या. सायंशाखेमध्ये शारीरिक शिक्षण म्हणजे लेझीम, लाठी शिकवलं जात असे. प्रौढ शाखांमध्ये भजनी मंडळ, वर्ग घेणे, शिबीर घेणे अशी कामे चालत असत.
९० शाखांच्या सेविकाची दर तीन महिन्यांनी बैठक होत असे. ही बैठक घेण्यासाठी हॉल घेणे महाग पडत असे. त्यामुळे वंदनीय मावशींच्या असं लक्षात आलं की, आपली स्वतःची एखादी जागा समितीसाठी उपलब्ध झाली, तर आपलं कार्य अधिक जोमाने करता येईल. त्यामुळे या गरजेपोटी स्वतःचं कार्यालय असावं या दृष्टीने जागेचा शोध सुरू झाला आणि ठाण्यातील संघ कार्यकर्ते गोविंदराव पटवर्धन यांनी एका मोठ्या धनिक दालमिया या दानशूर व्यक्तीकडून खूपच सवलतीच्या दरात ठाणे पूर्वला दोन प्लॉट मिळवून दिले. एक जिजामाता ट्रस्टसाठी आणि दुसरा गृहिणी विद्यालयासाठी राखला गेला. गृहिणी विद्यालयात मुख्यत्वे शैक्षणिक काम चालतं. राजमाता जिजाबाई ट्रस्ट असं नाव का देण्यात आलं? असं विचारलं असता महाजन बाई म्हणाल्या की, वंदनीय मावशी यांनी मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या तीन बाबतीत ३ आदर्श महिलांच्या डोळ्यांसमोर ठेवले होते. मातृत्वाचे आदर्श उदाहरण म्हणजे राजमाता जिजाबाई, नेतृत्वाचे आदर्श उदाहरण म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि कर्तृत्वाचं आदर्श उदाहरण म्हणजे अहिल्याबाई होळकर असं समितीमध्ये मानलं जातं. मातृत्वाचं आदर्श उदाहरण महिलांसमोर उभे राहावं, यासाठी राजमाता जिजाबाई ट्रस्ट असं या संस्थेचं नामकरण करण्यात आलं. जागा तर मिळाली; परंतु इमारत उभारण्यासाठी निधीची गरज होती. यासाठी कोणावरही अवलंबून न राहता प्रत्येकाकडून केवळ एक रुपया घ्यायचा, अशी अभिनव कल्पना निश्चित झाली. मध्यमवर्गीय, श्रीमंत, गरीब सर्व महिलांना एक रुपया देणे जड नव्हतं आणि त्यामुळे लोकसहभागातूनच हे काम उभं राहणार होतं. समितीच्या सेविकांनी यासाठी खूप मोठं काम केलं. त्या गिरगाव, दादर, पारले, ठाणे सारख्या ठिकाणी घरोघरी जाऊन फक्त एक रुपया गोळा करून एक रुपयाची पावती द्यायच्या. अशा रीतीने ८० हजार रुपये जमा झाले आणि त्यातून तळमजल्याचं बांधकाम पूर्ण झाले. यात खरोखर प्रौढ, निष्ठावान महिला कार्यकर्त्यांचे मोठे ऋण मानले पाहिजे. त्यांनी ही इमारत उभारण्यासाठी जणू काही एक चळवळच उभी केली. नुसती शिबिरे आणि बैठका घेण्यासाठी या इमारतीचा उपयोग होऊ नये, महिलांनाही काहीतरी ठोस काम मिळावं, यासाठी सर्वात प्रथम ‘उद्योग मंदिर’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आणि यासाठी बकुळताई देवकुळे या ज्येष्ठ भगिनींनी सुरुवातीचे शंभर रुपये देणगी दिली. या शंभर रुपयांत उपक्रम सुरू करण्यात आला. यामुळे गरीब महिलांच्या हाताला काम मिळालं. तसेच दर्जेदार व योग्य भावात हळद, तिखट यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तू गृहिणींना उपलब्ध झाल्या. व्यापारी लोकांकडून घाऊक स्वरूपात मिरच्या आणि हळकुंड खरेदी करून, घरघंटीवर, हळद, तिखट बनवण्याचा उद्योग सुरू झाला. समितीच्या सेविका घरोघरी जाऊन हळद आणि तिखटाची विक्री करत असत. या हळद, तिखटाचा दर्जा इतका चांगला आहे की, गृहिणी समितीच्या हळद आणि तिखटाची वाट पाहत असतात. या कामासाठी गिरगावातून अक्का कानिटकर, ताई गाडगीळ गिरगावातून जाऊन ८-८ दिवस तिथे राहून व्यवस्था पाहात असत.
उद्योग मंदिराचे हे काम साधारण १९८२ साली सुरू झाल. आजही हे काम अव्याहत सुरू आहे आणि त्यात मसाले, उपवास भाजणी, शिंगाडा पीठ, चिकवड्या अशा २० उत्पादनांची आणखी भर पडली आहे. शंभर रुपयांनी सुरू केलेल्या या कामाची उलाढाल आज रु. ३५ लाखांच्या वर पोहोचली आहे. नुसते उद्योग उभारून उपयोग नाही, तर महिलांच्या शिक्षणासाठी सुद्धा काहीतरी मदत करायला हवी हे लक्षात आलं, तेव्हा कोकणात उच्च शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळे शाळा झाल्यानंतर मुलींना मुंबई-पुण्यामध्ये येऊन शिक्षण घेण्याची इच्छा असे; परंतु मुंबईत जागेची सोय नसल्यामुळे अनेक मुलींना पालक पाठवत नसत. अशा मुलींसाठी विश्वासार्ह राहण्याची व्यवस्था संस्थेमार्फत वरच्या मजल्यावर करण्यात येऊ लागली. सुरुवातीला ५-६ मुली राहायला आल्या. आता सध्या तिथे ३८ मुली वास्तव्याला आहेत. मुलींची सुरक्षितता आणि शिस्त राखता यावी यासाठी या सर्व मुलींची व्यवस्था पाहण्यासाठी तिथे २४ तास व्यवस्थापिकेची सोय करण्यात आली आहे. या व्यवस्थापकेची राहण्याची व्यवस्था, कार्यालय पहिल्या मजल्यावर असून तीन मजली इमारत उभी राहिली आहे. ठाण्यातील चेंदणी नाका हा परिसर त्या आधी तसा अविकसित होता. पण हळूहळू त्या ठिकाणी वस्ती वाढली. त्यांच्या सोयीकरिता एक वाचनालय सुरू करण्यात आले. सध्या या वाचनालयाचे ५००च्या वर सभासद आहेत. वाचनालयात सध्या १५ हजार मराठी आणि इंग्रजी पुस्तके तसेच दररोजची वर्तमानपत्र उपलब्ध असतात. त्यानंतर असं लक्षात आलं की, महिलांच्या धार्मिक आणि अध्यात्मिक सोयीसाठी, त्यांना एकत्र येण्यासाठी एखादी जागा हवी. राष्ट्रसेविका समितीचे अष्टभुजा देवी हे आराध्यदैवत आहे. तिच्या आठ हातांमध्ये असलेली आयुध ही महिला सशक्तीकरणाची प्रतीकं आहेत. त्यांची पूजा महिलांकडून व्हावी, यासाठी अष्टभुजा देवीचे मंदिर मावशींच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आले. त्यासाठी वेगळं कार्यकारी मंडळ स्थापन करण्यात आलं असून नवरात्रमध्ये नऊ दिवस कार्यक्रम आयोजित केले जातात. त्या निमित्ताने महिलांना एकत्र येण्याची संधी मिळते तसेच आपली धार्मिक, अध्यात्मिक शांती मिळवता येते. या उत्सवात देवीला अनेक वेळा साड्या, खण अर्पित केले जातात, या साड्यांचा उपयोगही समितीच्या पूर्णवेळ कार्य करणाऱ्या सेविकांना देऊन केला जातो तसंच वनवासी पाड्यातील महिलांना संक्रांतीच्या दिवशी जाऊन तीळगूळ आणि हे खणवाटप केलं जातं. जिजाबाई ट्रस्टच्या शेजारी असलेल्या गृहिणी विद्यालयाने सरकारी अनुदान घेतलंय.तिथेही ४०-५० मुलींची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच तिथे मूकबधिर मुलांचे विद्यालयही चालतं.
आमचं भाग्य असं की, वंदनीय मावशी या इमारतीमध्ये अनेक वेळा वास्तव्याला आल्या आहेत. त्यांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनामुळे आम्ही विविध उपक्रम राबवून महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाचं काम गेली ५० वर्षे करत आहोत, असं मोठ्या अभिमानाने महाजन बाई यांनी सांगितलं. राजमाता जिजाबाई ट्रस्टनी चेंदणी कोळीवाडा भागात निस्वार्थीपणे केलेलं काम पाहून महापालिकेने त्या मार्गालाही राजमाता जिजाबाई मार्ग असं नाव दिलं आहे. त्यातूनच या संस्थेची कार्यक्षमता आणि उपयोगिता लक्षात येऊ शकते. नुकताच राजमाता जिजाबाई ट्रस्टचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला. अशी ही गेली पन्नास वर्षे महिलांसाठी विविध उपक्रम राबवणारी संस्था महिला सबलीकरणासाठी नवनवीन योजना घेऊन मार्गस्थ होत आहे.