Thursday, July 18, 2024
Homeअध्यात्मकर्तव्यामध्ये स्मरण भगवंताचे ठेवा

कर्तव्यामध्ये स्मरण भगवंताचे ठेवा

ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

आपल्या जीवनाचा सारखा विकास होतो आहे. म्हणून आपण आज जिथे आहोत त्याच्या मागे काल होतो आणि आज जिथे आहोत त्याच्या पुढे उद्या आपण जाऊ. हे जरी खरे, तरी आज आपण जे करायला पाहिजे ते न केले, तर एखाद्या वेळी उद्या मागे जाण्याचा प्रसंग आपल्यावर येईल. पुढचा जन्म हा आजच्या जन्मातूनच निर्माण होतो. तेव्हा आपण आज चांगले असलो, तर ‘अन्ते मतिः सा गतिः’ या नियमाप्रमाणे पुढचा जन्म आपल्याला चांगलाच येईल. काळ मुख्यतः तीन प्रकारचा असतो; कालचा, आजचा आणि उद्याचा. जो काळ होऊन गेला तो काही केले तरी परत येणार नाही; म्हणून त्याची काळजी करू नये. एखाद्याचे कोणी गेले, तर आपण त्याला असे सांगतो की, “अरे, एकदा गोष्ट होऊन गेली; आता काय त्याचे! आता दुःख न करणे हेच बरे.” हे जे तुम्ही लोकांना सांगता, तसे स्वतः वागण्याचा प्रयत्न करा. मागे होऊन गेल्याची विवेकाने विस्मृती पाडता येते. तसेच पुढे काय होणार हे माहीत नसल्यामुळे त्याची काळजी करू नये. आजचे आपले कर्तव्य आपण केल्यानंतर, ‘जे व्हायचे ते होणारच’ म्हणून स्वस्थ बसावे. मागची आठवण करू नये किंवा गेल्याचे दुःख करू नये, आणि उद्याची किंवा होणाऱ्या गोष्टीची काळजी करू नये. सध्या, आपल्याला कालाच्या पलीकडे जाता येत नाही, आणि कालाच्या पलीकडे गेल्याशिवाय भगवंत मिळणार नाही, अशी अवस्था आहे. जगात घडामोडी सारख्या होत आहेत आणि आपली तळमळ कायम आहे! आपल्याला जी तळमळ लागते ती आपल्या अपुरेपणामुळे, अपूर्णतेमुळे लागते.

कोणीही मनुष्य जन्माला आला की, भगवंताला आनंद होतो, कारण सत्यस्वरूप प्रत्येकाला कळावे, अशी भगवंताची इच्छा आहे आणि हे कार्य फक्त मनुष्य जन्मामध्येच शक्य आहे. यासाठी भगवंत आपल्याला समजण्यासारखा आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. याकरिताच आपल्याला भाव, इच्छा, तळमळ, आच, मनातून उत्पन्न व्ह्यायला पाहिजे. पुष्कळ चांगला स्वयंपाक केला आणि मीठ घालायचे राहिले, तर काय उपयोग? भाव जर दुजा ठेवला, तर भजन चांगले झाले असे कसे म्हणावे? भक्तीचे नऊ मार्ग सांगितले आहेत. त्यातल्या कोणत्याही एकाचेच पूर्ण भाव ठेवून परिशीलन केले तरी त्यात बाकीचे आठ येतात. आपल्याला जे कळले ते आपल्या आचरणात आणावे, हे खरे ऐकणे होय. जो आपल्या रक्तामासात मिसळतो आणि रोजच्या वागण्यात आणता येतो तोच खरा वेदान्त होय आणि आपल्या कर्तव्यामध्ये भगवंताचे स्मरण ठेवणे हेच सर्व वेदान्ताचे सार आहे. वेदान्त हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -