उरण (वार्ताहर) : जेएनपीए बंदरातून तस्करी होत असल्याचे उघड होत आहे. सीमाशुल्कच्या विभागाने केलेल्या कारवाईत एका कंटेनर मधून ३०३० किलो रक्तचंदनाचा साठा जप्त करण्यात यश आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या रक्तचंदनाची किंमत अडीज कोटी रुपये आहे. सीमाशुल्क विभागाच्या डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांना एका कंटेनरमध्ये रक्तचंदन असल्याची खबर लागली होती. त्यांनी केलेल्या कारवाईत विदेशात तारखिळ्यांच्या नावाखाली पाठविण्याच्या तयारीत असलेला एका कंटेनरमध्ये ३०३० किलो रक्तचंदनाचा साठा जप्त साठा सापडला असून तो जप्त करण्यात आला आहे.
जेएनपीए बंदरातुन तस्करीच्या मार्गाने रक्तचंदनाचा साठा विदेशात पाठविण्याच्या तयारीत असलेल्याची माहिती जेएनपीटी सीमाशुल्क विभागाच्या डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागली होती. डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब कारवाईला सुरुवात करुन बंदरातील संशयित कंटेनरचा शोध घेऊन कारवाई सुरू केली. यावेळी विदेशात पाठविण्याच्या तयारीत असलेला एका कंटेनरमधुन ३०३० किलो रक्तचंदनाचा साठा सापडला. कंटेनरमध्ये तीन पार्सल मध्ये हा रक्तचंदनाचा साठा लपवुन ठेवला होता. तारखिळ्याच्या बनावट नावाखाली हा रक्तचंदनाचा साठा विदेशात पाठविण्यात येणार होता.मात्र डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच कारवाई केल्यामुळे चंदन तस्करांचा डाव फसला आहे.
जेएनपीए बंदर सुरू झाल्यापासून तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. यापूर्वी रक्तचंदन व इतर तस्करीच्या घटना घडून त्यांच्यावर कारवाई ही करण्यात आल्या आहेत. यावेळी काही तस्करांच्या साथीदारांना अटकही करण्यात आलेली आहे. मात्र रक्तचंदन व इतर तस्करी करणाऱ्या तस्करांच्या मुलापर्यंत जाऊन कारवाई करण्यात यश येताना दिसत नाही. त्यामुळे आजही जेएनपीए बंदरातून होणारी मग ती रक्तचंदन असो व इतर तस्करी रोखण्यात यश येण्याऐवजी ती सुरू असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात या भागाचा औद्योगिक विकास झपाट्याने होत आहे. त्यामध्ये नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळ व उरण रेल्वे स्टेशन सुरू होणार असल्याने तस्करांना सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे भविष्यात जेएनपीए बंदरातून मोठ्या प्रमाणात तस्करी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.