Tuesday, July 16, 2024
Homeअध्यात्मआप्पा सुतार

आप्पा सुतार

विलास खानोलकर

भगवंत आप्पा सुतार हा श्री स्वामी समर्थांचा साधा-भोळा-गरीब भक्त होता. त्याज्याजवळ ना पांडित्य, ना थक्क करणारी विद्वत्ता. श्री समर्थ कृपेने त्याने त्याच्या शेतात खोदलेल्या विहिरीस भरपूर पाणीही लागले होते. त्यामुळे त्याची शेतीही बरी पिकली होती. तो व त्याचे कुटुंबीय खाऊन-पिऊन सुखी होते. हे सर्व केवळ श्री स्वामी कृपेनेच चालले आहे, अशी त्याची मनोमन कृतज्ञ भावना होती. उपासनेत अथवा भक्तीमध्ये देवाबद्दल कृतज्ञतेला महत्त्वाचे स्थान आहे, म्हणून ‘कृतज्ञतेविना भक्ती कोरडी’ असे म्हणतात. श्री स्वामींनी केलेल्या या उपकारातून थोडे तरी उतराई व्हावे, म्हणून त्यांना मळ्यात बोलवावे. जेऊ-खाऊ घालावे. त्यांचे अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करावे आणि धन्य-धन्य व्हावे, अशी त्याची साधी-भोळी सरळ कल्पना होती. म्हणून त्याने श्री स्वामींना विनम्रभावे विनविले, ‘महाराज कृपाकरून मळ्यात चालावे.’ सर्वसाक्षी श्री स्वामींनी त्याच्या मनातला भक्तिभाव जाणला होता. पण ते लगेच निघाले नाहीत. ‘थोडे थांब.’ असे त्यांनी त्यास उत्तर दिले. भगवंत आप्पा सुताराने चार-पाच वेळा त्यांना विनंती करूनही त्यांचे तेच उत्तर ‘थोडे थांब’ काशिनाथपंत व बाबा सबनीसांकडून श्री स्वामींनी स्वयंपाक करून घेतला. त्या दोघांनीही तो सोवळ्यात केला. श्री स्वामींना सोवळे-ओवळे याचा अतिरेक मान्य नव्हता. पण निर्मळपणा, शुद्धता, पावित्र्याचे ते आग्रही होते. शारीरिक, मानसिक आणि वाचिक शुद्धता असलीच पाहिजे. यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळेच त्यांनी अक्कलकोटातील काशिनाथपंथ आणि बाबा सबनीसांसारख्या प्रेमळ सत्त्वशिलाकडून स्वयंपाक करून घेतला. भगवंत आप्पा सुतार हा गरीब होता. त्याने चार माणसांची शिधासामग्रही त्या दोघास दिली. त्या सामग्रीतच त्यांनी नैवेद्य केला. गरीब सुताराने तो मनोभावे श्री स्वामी समर्थास अर्पण केला. श्री स्वामींही जेऊन संतोष पावले. पण त्यांनी नंतर येत गेलेल्या सेवेऱ्यासही जेऊ घालण्याची आज्ञा केली. काशिनाथपंथ म्हसवडकर तर घाबरलेच. चारजणांचीच भोजन व्यवस्था असताना जास्तीचे काय करणार? श्री स्वामी आज्ञा. जसजसे सेवेकरी येत गेले, तसतसे त्यांना भोजनास बसविण्यात आले. चार माणसांच्या भोजन व्यवस्थेत पन्नास माणसे जेवली. केवढे आश्चर्य? पण याचा मथितार्थ पाहिला तर, यात आश्चर्य वाटणार नाही. कारण श्री स्वामी म्हणजे जगन्नाथ, पूर्ण ब्रह्मस्वरूप, ते म्हणाले, ‘कायकू दिलगीर होते है? मी येथे असताना काळजी कशाला? निर्भय व्हा. निःशंक राहा. अशक्यही शक्य करतील स्वामी’ याचा प्रत्यय त्या दिवशी सर्वांनाच आला. सध्याच्या धावपळीच्या, काळ-काम-वेग यांच्याशीच निगडित असलेल्या जीवनात श्री स्वामी समर्थांचे स्मरण करण्यास १०-१५ मिनिटेही मिळणार नाहीत का? आपणास सर्व काही देणाऱ्या, आपल्यावर कृपा करणाऱ्या श्री स्वामींसाठी आपण थोडेसेही थांबणार नसू, त्यांचे चिंतन, स्मरण करीत नसू, तर कोणता आशय – अर्थ-भावार्थ आणि मथितार्थ आपल्या जीवनास आहे? याचा विचार ज्या – त्या व्यक्तीने करावयाचा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -