मोदींच्या स्वप्नातील शक्तिशाली भारत घडवूया : नारायण राणे

मुंबई ( प्रतिनिधी) : देशात जास्तीत-जास्त उद्योग सुरू झाल्यास त्यातून उत्पादन वाढेल, निर्यातीत वाढ होईल आणि देशाचा जीडीपी वाढेल, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील शक्तिशाली भारत घडविण्यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विलेपार्ले येथील खादी ग्रामोद्योग आयोगाच्या कार्यालयात ‘पीएमईजीपी’ कार्यक्रमांतर्गत देशातील ७२ नव्या युनिटचे उद्घाटन आणि ७२० उद्योजकांना या कार्यक्रमांतर्गत सबसीडीचे वितरण नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी देशाच्या विविध राज्यांत उपस्थित असलेल्या उद्योजकांच्या युनिटची ऑनलाइन सुरुवात राणे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी केंद्रीय खादी ग्रामोद्योग आयोगाचे चेअरमन मनोजकुमार, खादी ग्रामोद्योगचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन बाबू तसेच आयोगाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, देशातील बेरोजगारी संपवायची असेल, तर देशात उद्योगांची संख्या वाढली पाहिजे, त्यामुळे उत्पादन वाढेल आणि निर्यातही वाढेल. परिणामी देशात निर्यातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक आवक वाढेल. यासाठी भारत आत्मनिर्भर बनण्याच्या कार्यात सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. ते म्हणाले की, मोदी साहेबांना काम हवे आहे. त्यासाठी वेळ, वक्तशीरपणा आणि शिस्त या तीन बाबी आपल्याजवळ असल्या पाहिजेत. केवळ खादी ग्रामोद्योग आयोगाच्या अध्यक्षांची जबाबदारी नाही, तर ती आपल्या सर्वांची आहे. देशाला पुढे न्यायचे असेल, तर प्रत्येकाने आपले काम इमाने-इतबारे केलेच पाहिजे.


ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळेचे भान असून त्यांच्यातील वक्तशीरपणामुळे ते १८ तास काम करतात. त्यांच्यात वेळेचे भान आणि वक्तशीरपणा असल्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते सर्वांच्या आधी येऊन बसतात. पंक्च्युयालिटीमध्ये मोदी यांचा एक नंबर असल्याचे सांगून त्यांना प्रत्येक विषयाची जाण आहे. म्हणूनच अमेरिकेचे अध्यक्षही त्यांचे कौतुक करतात, असेही राणे यावेळी म्हणाले. देशाचे उत्पन्न, आर्थिक उलाढाल आणि दरडोई (जीडीपी) उत्पन्न वाढण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे, असे आवाहन राणे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना केले.


खादी कार्यालयाच्या अानुषंगाने बोलताना ते म्हणाले की, ग्राहकांमध्ये खादीचे आकर्षण वाढण्यासाठी नवनवीन बदल घडवून आणले पाहिजे. विशेष करून कपड्यांच्या डिझाइनकडे अधिक लक्ष दिले, तर आगामी काळात निश्चतच यश मिळेल. जगाच्या मार्केटमध्ये खादी पहिल्या क्रमांकावर आली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. आपल्या उत्पादित मालाचा पैसा हा बाहेर न जाता आपल्या देशातच राहिला पाहिजे. भारतास आत्मनिर्भर बनवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारताचे ‘महासत्ता’ होण्याचे स्वप्न पूणे केले पाहिजे, यासाठी अधिक चांगले प्रयत्न करून दाखवा, असे आवाहनही त्यांनी आयोगाच्या कर्मचाऱ्यांना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य लाभो, अशा सदिच्छा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केल्या. सुरुवातीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन बाबू यांनी प्रास्ताविक केले. शेवटी के. सी. सिंग यांनी सर्वांचे आभार मानले.


चीनचा कित्ता गिरवण्याची गरज...


जगात एकट्या चीनने जागतिक बाजारपेठेत ६४ टक्के जागा व्यापली आहे. चीनी वस्तू मिळणार नाहीत, असे होणार नाही. मग ती चीनी खेळणी असोत वा इतर वस्तू, तर इकडे १३५ करोड लोक असलेल्या भारताने जागतिक बाजारपेठेत फक्त ६ टक्के जागेत स्थान मिळविले आहे. चीन फक्त आपल्या वस्तू बाजारात विकत नाहीत, तर आयात आणि निर्यात यांच्यावरही जास्त लक्ष केंद्रित करतो. आपल्या देशात सगळ्या वस्तू बाहेरून येतात. आपणही आयातीसोबतच निर्यातीवरही जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तूंची जागतिक बाजारपेठेत जास्तीत जास्त विक्री कशी करता येईल, हे महत्त्वाचे आहे आणि त्याकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.

Comments
Add Comment

दादर पश्चिमेला झाड कोसळलं, चारचाकी थोडक्यात बचावली

मुंबई: दादरच्या पश्चिम येथील पोर्तुगीज चर्च जवळील परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. दादरच्या अमर हिंद

काहीही झाले तरी मुंबई महापौर महायुतीचाच असणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. नेत्यांच्या

मुंबईत देवींच्या आगमन मिरवणुकांनी परिसर उजळले

मुंबई: शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी शहरात सर्वात पूज्य देवींच्या मूर्तींचे उत्साही स्वागत करण्यात आले.

मुंबई मेट्रो स्टेशनच्या खराब डिझाइनवर प्रवासी नाराज

मुंबई: मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पंख्यांची कमतरता असल्याबद्दल 'रेडिट'वरील एका पोस्टनंतर मुंबई मेट्रो

मदर डेअरीचे टेट्रा पॅक दूध आजपासून प्रति लिटर २ रुपयांनी स्वस्त

मुंबई: मदर डेअरीने आपल्या युएचटी दूधाच्या (टेट्रा पॅक) किमतींमध्ये २ रुपयांची कपात करण्याची घोषणा आज, मंगळवारी

मुंबई मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद, एमएमआरडीएचा निर्णय

मुंबई : चेंबूर–जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरील वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांच्या