- ॲड. आशीष शेलार, आमदार, अध्यक्ष – मुंबई भाजप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बेनेस यांसारख्या नेत्यांना मागे टाकत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते बनले आहेत. मॉर्निंग कंसल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने जारी केलेल्या जागतिक मान्यता रेटिंगनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींना ७५% लोक पसंत करतात. या ताज्या आकडेवारीतून जे चित्र समोर आले हे आपल्या देशाची मान उंचावणारे आहे. बलाढ्य देशांसमोर कणखरपणे उभे राहून आपल्या देशाची शान, मान उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काम केले, अपार परिश्रम केले त्यातून जागतिक पातळीवर हा देशाचा सन्मान होतो आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला सन्मानाने उभे करीत असताना देशातील सामान्य, गरीब, श्रमिकांचे जगणे उंचावण्यासाठी ही पंतप्रधान एक सेवक म्हणून परिश्रम घेत आहेत. देशातील तरुणांना सक्षम करण्यासाठी झटत आहेत, तर त्यासोबत देशातील महिलांना सन्मान व्हावा यासाठी काम करीत आहेत. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्याचे अश्रू पुसण्याचे काम पंतप्रधान करीत असताना भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन देशाची उभारणी ही करीत आहेत. यातून एक सक्षम नवा भारत उदयास येतो आहे. या नव्या भारताचे शिल्पकार खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत.
आपला देश ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करीत आहे. लाल किल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, आपण आता गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर यायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली जेव्हा लाल किल्ल्यावरून असेच देशाला संबोधले तेव्हा “घर घर शौचालय” असा नारा दिला. त्यावेळी तमाम देशातील टीकाकारांच्या प्रतिभेला धुमारे फुटले आणि देशाचे पंतप्रधान टाॅयलेटबाबतीत घोषणा करतात… ही कसली घोषणा म्हणून टीका झाली, टिंगलटवाळ्या झाल्या. पण अशा टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीच भिक घातली नाही. त्यांनी आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही. त्यांनी घोषणा केली आज ‘घरोघरी शौचालय’ ही लोकचळवळ बनली आणि देशातील चित्र बदलले, पंतप्रधानांनी घोषणा केली आणि स्वच्छतेची लोकचळवळ उभी राहिली, घरोघरी वीज पोहोचली, घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पोहोचला, किसान सन्मान योजना जाहीर केली आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले. एकापेक्षा एक अशा कितीतरी योजना सांगता येतील, ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्या. त्या लोकसहभागातून १००% यशस्वी झाल्या. खेड्या-पाड्यापर्यंत पोहोचल्या.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर आणण्यासाठी संकल्प करून काम करण्यास सुरुवात झाली आहे. राजपथाचे नाव बदलून ‘कर्तव्यपथ’ असे नामकरण केले. आताही टीकाकार – टवाळ्या करणारे विचारत आहेत, याने काय होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला काळ देईल. सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, ज्या दिवशी आपला देश स्वातंत्र्याचा शंभरावा वाढदिवस साजरा करेल. तेव्हा या देशाची बदललेली मानसिकता दिसून येईल. या सगळ्याची पायाभरणी, यशस्वी अंमलबजावणी आणि दिशादर्शनासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत. आमचा त्यांच्या कार्यकर्तृत्वावर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला खात्री आहे, ज्या नव भारताचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेय आणि त्यासाठी ते काम करीत आहेत तो नव भारत नक्की आपल्याला दिसेल. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जेव्हा ‘घरोघरी तिरंगा’ या संकल्पनेची घोषणा पंतप्रधानांनी केली आणि त्याला ज्यापद्धतीने उदंड यश मिळाले तेव्हाच नव भारताच्या यशाचे निशाण फडकले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या देशात सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान भाजप या पक्षाला मिळवून दिला. एका जागतिक विक्रमाची नोंद व्हावी एवढे आज भाजपचे सदस्य आहेत. पण हे करीत असताना पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांना त्यांनी सदैव एकाच गोष्टीची शिकवण आणि जाणीव करून दिली की, आपण सगळे सेवक आहोत. त्यामुळे कोरोना महामारी असो वा जनतेचे दैनंदिन जीवन असो भाजपच्या कार्यकर्त्यांना जनसेवेचा वसा पंतप्रधानांनी घालून दिला आहे. म्हणून भाजपने दर वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह आयोजित करून विविध जनसेवेचे उपक्रम राबविले आहेत. यावेळी आम्ही प्रत्येक वाॅर्डमध्ये आरोग्य शिबीर आयोजित करून जनतेची सेवा करून जनतेच्या उत्तम आरोग्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी उत्तम आरोग्याची प्रार्थना परमेश्वराकडे करणार आहोत.