- प्रवीण दरेकर, गट नेता, विधान परिषद
सन २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेसशिवाय अन्य एका पक्षाला केंद्रात स्पष्ट बहुमत मिळालं, देशवासीयांनी मोदीजींवर विश्वास दाखवला आणि मोदीजींनी २६ मे, २०१४ ला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यानंतर २०१९ ला पुन्हा जनतेने पूर्ण बहुमताने मोदीजींच्या नेतृत्वात भाजपला सत्ता दिली. लागोपाठ दोन लोकसभा निवडणुकीत मोदीजींच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास हा अभूतपूर्व तर होताच. पण मोदींजींच्या व्हिजनरी निर्णयांवर शिक्कामोर्तब करणाराही होता. इतिहासात डोकावून बघितलं, तर महात्मा गांधींनी ‘स्वच्छते’चा आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ‘स्वदेशी’चा आग्रह धरला होता. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर सरकारी पातळीवर या दोन्ही कार्यक्रमांना प्राधान्य मिळू शकले नाही. सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदीजींनी ‘मेक इन इंडिया आणि ‘स्वच्छ भारत’या दोन मोठ्या योजना सुरू केल्या आणि या दोन महान विभूतींच्या विचारांना आपल्या ध्येयधोरणांचा भाग बनवलं.
‘मेक इन इंडिया’ अभियान सुरू करण्यामागे देखील मोदींजींचे व्हिजन होते. ‘मेक इन इंडिया‘साठी मोदींजींनी परदेशी कंपन्यांना केवळ आमंत्रित केलं नाही, तर त्या कंपन्यांकडे असलेलं तंत्रज्ञान भारताला मिळेल, याचीही काळजी घेतली. जेणेकरून मिळालेल्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर फायदा घेऊन भविष्यात वस्तू पूर्णपणे भारतात तयार केल्या जाव्यात, अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर चालना मिळावी, परदेशी गुंतवणूक वाढावी, वस्तूंची निर्मिती भारतात केल्यामुळे देशातील लोकांना रोजगार मिळावा, परकीय चलनातील तूट कमी व्हावी, रुपया आणखी मजबूत व्हावा, असा व्यापक दृष्टिकोन होता. मला वाटतं, आत्मनिर्भर भारत आणि टिळकांच्या ‘स्वदेशी’च्या स्वप्नपूर्तीसाठी मोदींजींनी विचारपूर्वक टाकलेलं हे एक दमदार पाऊल आहे आणि त्याचं यशही आपण पाहतो आहोत. २०१४ला महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी मोदीजींनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली. स्वतः हातात झाडू घेऊन जनतेला स्वच्छतेचा संदेश दिला. अनेकांनी त्यावेळी मोदींजींवर टीका केली. केवळ अभियान सुरू करून मोदीजी थांबले नाहीत, तर त्यांनी या अभियानाला सरकारी पाठबळ आणि भरघोस निधी दिला, राज्यातील सरकारांना आणि जनतेला अभियानात सामावून घेतलं, सर्वेक्षण करून अभियानाचा पाठपुरावाही केला. यामुळेच अनेक लहान-मोठ्या शहरात, गावांत आणि लोकांत स्वच्छतेबद्दलची जागरूकता तर निर्माण झालीच. पण अनेक शहरांचा आणि गावांचा आमूलाग्र कायापालटही झाला. मला वाटतं, यापेक्षा मोठं स्मारक आजपर्यंत गांधीजींचं झालं नसेल.
मोदींजींनी अत्यंत धाडसाने घेतलेला आणखी एक निर्णय म्हणजे नोटबंदी. याबाबत उलटसुलट चर्चा होत असली तरी आज मोठ्या प्रमाणावर काळा पैसा बाहेर निघतो आहे, काळ्या पैशातील पॅरलल इकॉनॉमीचा संकोच होताना आपण पाहतो आहोत. काळा पैसा साठवणूक आणि त्याच्या व्यवहारांवर निर्बंध आले, भ्रष्टाचाराला समाधानकारक आळा बसला, कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे भारताने वेगाने आगेकूच केली, काळ्या पैशांचा ओघ निर्माण करणाऱ्या रिअल इस्टेटसारख्या अनेक सेक्टरना चाप बसला, देशाच्या शत्रूंची आर्थिक रसद बंद झाली, हे कुणालाही नाकारता येणार नाही. मोदी सरकार येण्यापूर्वी २२० कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार डिजिटल स्वरूपात होत होते. आज हा आकडा तब्बल ७,४२२ कोटी रुपयांवर पोहोचला. एवढेच नाही, तर भारताने चीन, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेसारख्या देशांना देखील डिजिटल व्यवहारांत मागे टाकलं आहे.
संपूर्ण परिवर्तनाची हाक यापूर्वी अनेक पक्षांनी आणि नेत्यांनी दिली. पण प्रत्यक्षात बदल डोळ्यांना दिसत नव्हते. मोदींजींनी केलेलं परिवर्तन डोळ्यांनाही दिसतंय आणि त्याची फळही देशवासी चाखत आहेत. वस्तू आणि सेवा कर प्रणाली धाडसाने लागू करण्याचे काम मोदींजींनी केलं. सोपी टॅक्स प्रणाली, अनेक टॅक्स भरण्याच्या कटकटीतून मुक्तता, वस्तू आणि सेवा दरात झालेली घट, देशभरात समान दर, आंतरराष्ट्रीय बाजारात देशी उत्पादनांना मिळणारे प्रोत्साहन, पारदर्शकता यामुळे व्यावसायिक, ग्राहक आणि उत्पादक अशा सर्वांनी अतिशय कमी कालावधीत ही प्रणाली आपलीशी केली. मोदींजींनी भ्रष्टाचारमुक्त भारताची घोषणा
दिली होती आणि ती प्रत्यक्षातही आणून दाखवली.
“ना खाऊंगा, ना खाने दुंगा” ही मोदीजींची घोषणा होती. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत अनेक स्कँडल, घोटाळे, स्कॅम आपण पाहिले. अगदी मुंदडा स्कॅमपासून बोफोर्स, हर्षद मेहता, सुखराम, यूरिया, हवाला, सत्यम, आईपीएल, टुजी स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ, आदर्श, कोळसा, अगस्ता वेस्टलैंड, अशी घोटाळ्यांची रांग लागली होती. मात्र गेल्या आठ-साडेआठ वर्षांत मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागला नाही. देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवकल्पना, संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दिवस-रात्र एक केल्याचं आपण सर्वांनी पाहिलं आहेच.
महाराष्ट्रात केंद्रीय योजनांच्या बरोबरीने त्यांनी अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या. आज एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात नवीन सरकार स्थापन झालं आहे आणि हे सरकारही मोदीजींना अभिप्रेत असलेल्या सेवा, सुशासन, गरीब कल्याणाच्या दिशेनेच वाटचाल करीत आहे. नरेंद्र मोदीजींनी पंतप्रधान म्हणून घेतलेल्या निर्णयांमागे दूरदृष्टी आहेच. पण ते निर्णय राबवण्याचे सामर्थ्यही त्यांच्यात आहे. आज असं एक नेतृत्व भारताच्या पंतप्रधान पदावर आहे, जे शब्द देतात आणि ते सत्यात उतरवून दाखवतात.
म्हणूनच “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले” या उक्तीनुसार आज सारा देश पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आदरणीय मोदीजी यांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो, देशवासीयांची सेवा करण्यासाठी त्यांना अपार शक्ती आणि समर्थन प्राप्त होवो, अशा मनापासून शुभेच्छा देतो.