विलास खानोलकर
एके दिवशी ठाण्यातील कौपीनेश्वर मंदिरात दासगणू महाराजांचे कीर्तन होते. त्या कीर्तनास अनेक लोक उपस्थित होते. त्यांत चोळकर नावाचा एक गरीब गृहस्थही होता. तो ठाण्याच्या सिव्हिल कोर्टात उमेदवार होता. त्याला कुटुंबाचे पालनपोषण करता येईल एवढाही पगार मिळत नसे. त्याच्या घरची मंडळी काटकसर करून कशीबशी गुजराण करीत. त्याला आपली नोकरी कायम असावी असे नेहमी वाटायचे. त्यासाठी त्याला एक परीक्षा द्यावी लागणार होती.
ठाण्यातील कीर्तनात दासगणूंनी भाविकांना शिरडीच्या साईबाबांच्या लीला सांगितल्या. त्या ऐकून चोळकराने आपला भार बाबांवर टाकला. त्याने त्यांना काकुळतीने विनंती केली – ‘बाबा माझी परिस्थिती कशी आहे, हे आपण जाणताच. मी सर्वार्थाने नोकरीवरच अवलंबून आहे. ही नोकरी कायम झाली तर माझ्या बऱ्याच अडचणी दूर होतील. त्यासाठी एक परीक्षा द्यावी लागणार आहे. ती पास होणे गरजेचे आहे, नाहीतर आज असलेली उमेदवारीही जाईल. तुमच्या कृपेने मी पास झालो तर दर्शनासाठी येईन. तुमच्या नावाने खडीसाखर वाटीन.’
चोळकराने बाबांना नवस केला, अभ्यासही केला. तो परीक्षा पास झाला. त्याला खूप आनंद झाला. त्याला बाबांना केलेल्या नवसाची सतत आठवण होती, त्या वेळी घरच्या परिस्थितीमुळे तो शिरडीस जाऊ शकला नाही. आज, उद्या असे करता करता जाणे लांबणीवर पडू लागले. तेव्हा चोळकराने, ‘बाबांचा नवस फेडल्याशिवाय आपण साखर खायची नाही.’ असा निश्चय केला. तो चहाही बिनसाखरेचा पिऊ लागला.
काही दिवसांनी चोळकर शिरडीत आला. त्याने बाबांना नमस्कार केला. ‘बाबा, तुमच्या कृपेने माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले.’ असे म्हणून त्याने खडीसाखर वाटून आपला नवस फेडला. त्यावेळी चोळकर जोगांकडे मुक्कामास होता. त्याच्याबरोबर जोगही मशिदीत आले होते. दर्शन झाल्यावर ते दोघे जाण्यास निघाले तेव्हा बाबा म्हणाले, ‘अहो जोग घरी गेल्यावर याला भरपूर साखरेचा चहा द्या.’
ते ऐकून चोळकराला मोठे नवल वाटले. नवस फेडेपर्यंत आपण बिनसाखरेचा चहा पीत होतो, ही गोष्ट बाबांना माहीत होती, हे जाणून त्याचे हृदय भक्तिभावाने भरून गेले. त्याने श्रीबाबांच्या चरणी अनन्यभावाने मस्तक ठेवले. बाबांच्या बोलण्यामागचे रहस्य समजताच जोगांनाही आनंद झाला.