Friday, March 21, 2025
Homeअध्यात्मपरमेश्वर कलावंत आहे

परमेश्वर कलावंत आहे

– सद्गुरू वामनराव पै

शरीर साक्षात परमेश्वर हा सिद्धांत क्रांतिकारक आहे. शरीराला परमेश्वर का म्हटले. परमेश्वराची व्याख्या काय केली ते बघा. “निसर्ग नियमांसहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर”। आता हे शरीर निसर्ग नियमांनी बद्ध आहे. स्वयंचलित आहे. मला कोण चावी देऊन चालवतो का? स्वयंचलित आहे म्हणजे मला वाटले उठावे, उठलो. मला वाटले चालावे, चालू लागलो. मला वाटले बसावे, मी बसतो. स्वयंचलित आहे तसेच पुन्हा ते स्वयंनियंत्रित आहे. मी स्वतःच स्वतःला नियंत्रित करतो. मला कुणी नियंत्रित करणारे नाही. आतल्या सर्व व्यवस्था नियंत्रित करण्याचे काम शरीरच करत असते. शरीरच सर्व गोष्टी नियंत्रित करत असते. हे स्वतःच स्वतःला निर्माण करते ते स्वयंचलित व स्वयंनियंत्रित आहे. ते नैसर्गिक आहे. त्यात कुठलीही कृत्रिमता नसते. हात, पाय, नाक, कान, डोळे सर्व पद्धतशीर आहे. सर्व माणसांमध्ये डोळे समोर, कान बाजूला, नाक समोर, दात आतमध्ये, जीभ आतमध्ये, पडजीभ आतमध्ये याला व्यवस्था म्हणतात. systematized order आहे.

कावळा म्हटल्यावर ती एक वेगळीच व्यवस्था आहे. चिमणी म्हटल्यावर ती एक वेगळी व्यवस्था आहे. यांत किती कला आहे. परमेश्वर कलावंत आहे असे म्हटले तरी चालेल. परमेश्वराकडून हे सर्व निर्माण झालेले आहे म्हणून मी परमेश्वर कलावंत आहे असे म्हणेन. काय रचना आहे. कबूतराकडे पाहा काय रचना आहे. कावळ्याकडे पाहा काय रचना आहे. चिमणीकडे पाहा काय रचना आहे. मोराकडे पाहा काय रचना आहे. गरूडाकडे पाहा काय रचना आहे. हे सर्व पाहिले तर काय सुंदर व्यवस्था आहे हे आपल्या लक्षात येईल. त्यात सुंदर प्रयोजन आहे. सुंदर अशी योजना आहे. पुन्हा हे सर्व सहज आहे. त्यात कुठल्याही प्रकारची धडपड नाही. हे सहज निर्माण होते. ते स्वतःच स्वतःला निर्माण करते व स्वतःच स्वतःला विसर्जित करते. असा हा परमेश्वर आहे. या परमेश्वरावर किती प्रेम करावे? मी तर असे म्हणेन की या परमेश्वरावर इतके प्रेम करावे, इतके प्रेम करावे की त्याच्याशिवाय काही सुचत नाही. काही रुचत नाही अशी आपली अवस्था व्हावी. मला परमेश्वरच रुचतो व परमेश्वरच सुचतो अशी आपली अवस्था झाली पाहिजे. अशी आपली अवस्था होते का? नाही होत कारण परमेश्वराबद्दलचे अज्ञान. हे अज्ञान कोण दूर करतो? सद्गुरू अशी सद्गुरूंना शरण जावून ज्ञानी व्हायचे की सद्गुरूंना शरण न जाता अज्ञानी राहायचे हे तू ठरव कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -