केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गणेशोत्सव काळात मुंबईत आले असताना, शिवसेनेने भाजपला धोका दिला, आधी दोन जागांसाठी युती तोडली, असे स्पष्ट करत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला आपली जागा दाखवू या असा निर्धार भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत जे बोलले तेच सत्य होते. त्यावरून किती काहूर माजवले. म्हणे अमित शहा यांनी शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द दिला होता आणि तो पाळला नाही म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर शिवसेनेने युती करून मुख्यमंत्रीपद शिवसेनेने स्वत:च्या पदरात पाडून घेतले. अडीच वर्षांपूर्वी मातोश्रीच्या बंद दाराआड झालेल्या चर्चेचे ठाकरे यांनी भांडवल केले. या चर्चेदरम्यान कोणीही साक्षीदार नव्हता. तरीही मी नेहमी खरे बोलतो, आम्ही शब्दाला पक्के आहोत हे जनतेच्या मनावर ठासून सांगण्यात उद्धव ठाकरे आतापर्यंत कुठेही कमी पडलेले नाहीत. याउलट अमित शहा यांनी शब्द पाळला नाही, असा उघड आरोप उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि अमित शहा यांच्यावर केला. आपण सत्यवचनी असल्याचा आव ठाकरे नेहमी आणतात; परंतु त्यांचे सत्यवचन कसे पोकळ असते हे आता जनतेच्या समोर आले आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या इतर आमदारांनी पक्ष नेतृत्वाविरोधात बंड केल्यानंतर आपली खुर्ची राहणार नाही याची खात्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी आणखी एक वाक्य बोलले होते की, मी विधान परिषदेच्या सदस्यपदाचा राजीनामा देणार आहे. तसे पाहायला गेले तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर, विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली असली तरी तिला त्यावेळी कोणी फारसे महत्त्व दिले होते. दिलेला शब्द पाळतो असे जनतेला वाटत असल्याने ते सबुरीने राजीनामा देतील असे वाटत होते; पण तसे घडले नाही. कारण विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा केल्याने, ठाकरे गटाचे संख्याबळ कमी होऊ नये यासाठी त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय बदलला असे सांगण्यात आले. एकवचनी बाण्याच्या उद्धव ठाकरे यांनी आता स्वत:चा शब्द फिरवला; परंतु त्यावर कोणाचे लक्ष जाऊ दिले नाही. एवढंच नव्हे तर आमदारकी टिकावी यासाठी विधिमंडळात हजेरीपटावर सही करावी लागते, ती करण्यासाठी ते गेले होते. दुसरीकडे कारण सांगितले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीला हजर राहण्यासाठी विधिमंडळात आल्याचे भासवण्यात आले. खरा उद्देश पदलालसा ती आमदारकीची. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: कोणतेही पद घेतले नाही. आमदारकी, खासदारकीच्या मोहात ते कधी पडले नाहीत. त्यांनी इतरांना पदे दिली. मुख्यमंत्रीपदावर बसविले म्हणून आजही त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. या उलट त्यांच्या वारसा सांगत शिवसेनेची सूत्रे सांभाळणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी शिवसेनेची विचारधारा कधी काँग्रेसी केली याचा पत्ता त्यांना लागला नाही. एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असे वचन बाळासाहेब यांना दिल्याचे उद्धव ठाकरे हे नेहमीच सांगत होते. मग, मुख्यमंत्रीपदावर स्वत: का बसले? हा प्रश्न कोणी उपस्थित केला नाही. एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करायचे होते. पण शरद पवार यांनी सांगितले म्हणून मी स्वत: मुख्यमंत्री झालो, असा उद्धव ठाकरे यांचा युक्तिवाद होता. मोठेपण हे दुसऱ्याला देण्यात असते. ते स्वत: मिरविण्यात नसते, ही गोष्ट बहुधा ते विसरले असावेत. मुळात चौकडीतील तीन-चार माणसे सोडली तर कोणावर विश्वास नाही, हा त्यांचा स्वभाव. भाबडा चेहरा करून फक्त सहानुभूतीच्या नावाखाली लोकांना आपलेसे कसे करावे एवढे कौशल्य त्यांनी बहुधा आत्मसात केले आहे. शिंदे यांच्यावर जर खरोखरच विश्वास होता आणि शिवसेनेतील दोन नंबरची खाती त्यांच्याकडे दिली असल्याचे सांगण्यात येत होते, तर मग उद्धव ठाकरे आजारी असताना मुख्यमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार शिंदे यांच्याकडे का सोपविला नाही. त्यावेळी माध्यमातून शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार देतील अशी चर्चा होती. शिंदे यांनाही त्यावेळी माध्यमांनी याबाबत विचारणा करून भंडावून सोडले होते. शेवटी शिंदे यांनी आपल्याकडे मुख्यमंत्रीपदाचे अधिकार दिले हे वृत्त निराधार असल्याचे सांगण्याची वेळ आली होती. आता भाजपच्या पाठबळावर मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले शिंदे हे धडाकेबाज निर्णय घेत आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची कार्यशैली लोकांना आवडू लागली आहे. त्यामुळे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीतून तयार झालेल्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे काम खऱ्या अर्थाने भाजपने केले असे म्हटले तर वावगे ठरत नाही. कारण एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल चाळीस आमदार ज्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली खरी शिवसेना ही शिंदे यांच्यासोबत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आणखी एक शब्द बुडबुडा ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. सेनेत उभी फूट झाल्यानंतर शिल्लक सेना वाचविण्यासाठी गणेशोत्सवानंतर शेतकऱ्यांना भेटणार आणि महाराष्ट्र दौरा काढू असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आता म्हणे दसऱ्यानंतर दौरा काढणार आहेत. त्यामुळे पक्षप्रमुख आता शब्द बदलत आहेत, अशी शिवसेनेत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. एकीकडे शिंदे हे मुख्यमंत्री असताना लोकांमध्ये मिसळून काम करत आहेत, हे शिवसैनिकांना आवडत आहे, तर दुसरीकडे मातोश्रीवर जे कोणी येतात त्यांचे फोटो माध्यमांना देऊन आपण कसे काम करत आहोत, हा ठाकरे यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. मुख्यमंत्रीपदावर असताना ठाकरे आणि शिंदे यांची तुलना होते तेव्हा शिंदे हे दिवसेंदिवस उजवे ठरत चालले आहेत.