मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत मढ मार्वे येथील अनधिकृत स्टुडिओवर मुंबई महापालिकेचा अखेर हातोडा पडला आहे. मिलेनियर सिटी स्टुडिओवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली असून मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पालिकेने ही कारवाई केली. संबंधित स्टुडिओ उभारताना पर्यावरण नियमांचे उल्लंघन झाले असून त्यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. मढ मार्वे परिसरात ४९ अनधिकृत स्टुडिओ असल्याची तक्रारही सोमय्यांनी केली आहे. तसेच त्यांनी या प्रकरणी माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि माजी मंत्री अस्लम शेख यांच्यावरही आरोप केले आहेत.
मालाड मढ येथे बांधण्यात आलेला मिलेनिअर स्टुडिओ हा बेकायदेशीररित्या बांधण्यात आला होता. हा स्टुडिओ अनधिकृत असल्याचा आरोप झाला होता. तर भाजपच्या आमदारांनीही स्टुडिओत जाऊन काम बंद पाडले होते. याबाबत किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कारवाई करण्याबाबत पत्र दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने हा स्टुडिओ बंद करण्याची नोटीस बजावली होती. जिल्हा सागरतटीय नियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार पालिकेच्या पी उत्तर विभागाने याप्रकरणी कारवाई केली आहे.
दरम्यान, मालाड मढ येथे ४९ अनधिकृत स्टुडिओ असून यात माजी मंत्री अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांच्यावर एक हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप किरीट सोमया यांनी केला होता. येथे स्टुडिओ बांधताना सीआरझेडच्या नियमांचे उलघन केले असून पर्यावरण विभागाची परवानगी नसताना येथे जमिनीवर अनधिकृत स्टुडिओ बांधला असल्याचा आरोप अस्लम शेख यांच्यावर केला होता. मात्र आता पालिकेने या स्टुडिओवर धडक कारवाई केली आहे.
या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी २३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहील्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर आणि खासदार गोपाळ शेट्टी यांनी स्टुडिओला भेट दिली होती. यावेळी काम बंद पाडण्याची मागणी केली होती. तर पालिकेच्या पी उत्तर विभागाने देखील स्टुडिओला जागेचा वापर आणि काम बंद करण्याची नोटीस दिली होती.
मात्र आता ७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांनी पालिकेच्या पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना एक पत्र दिले आहे. यात पालिकेने या स्टुडिओला तात्पुरती परवानगी दिली आहे. मात्र ही जागा सीआरझेड मध्ये येत असल्याने महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऍथॉरिटी यांची परवानगी घेतलेली नाही. यामुळे तात्पुरती दिलेली परवानगी रद्द करून बांधकाम निष्कासित करावे असे लिहिले. त्यानुसार मंगळवारी सकाळीच स्टुडिओच्या पाडकामला सुरूवात झाली.