मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी वाहतूक बेटं, दुभाजक, पदपथ, स्कायवॉक, समुद्र किनारे, उद्याने यांच्या सुशोभीकरणाची कामे मुंबई महापालिकेने वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळावारी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे या संदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सुशोभीकरणाचा आढावा घेतला. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सादरीकरण केले. यावेळी खासदार राहुल शेवाळे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्रीनिवासन, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलारासू, संजीवकुमार, आशिष शर्मा आदी यावेळी उपस्थित होते.
मुंबई महापालिकेच्या हद्दीत २०५० किमी लांबीचे रस्ते असून त्यामध्ये सुमारे ९९० किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. २०९ किमीच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याचे चहल यांनी सांगितले. ऑक्टोबरपासून ४५० किमी लांबीच्या रस्त्यांचे पूर्नपृष्टिकरण सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर रस्त्यांचे काम गुणवत्तापूर्ण करा, खड्डे पडणार नाही याची दक्षता घ्यायला सांगा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुंबई शहरातील ३०० किमी लांबीच्या विविध ठिकाणच्या दुभाजकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये मोकळ्या जागेत फुल झाडांची लागवड करणे, बोधचिन्हे, सिग्नल यांचा कलात्मकरित्या सजावट करणे अशी कामे पुढील तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यामध्ये शहर, पश्चिम व पूर्व उपनगरातील दुभाजकांचा समावेश आहे.
पदपथांचे सुशोभीकरण करताना वर्दळीच्या ठिकाणची आणि रेल्वे स्थानकांजवळील पदापथांचे सुशोभीकरण करावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यानी केली. सुमारे १७० किमी लांबीच्या पदपथांवर प्रकाश योजना व सजावट केली जाणार आहे.
पुलांखालील मोकळ्या जागेचा वापर करण्यात यावा. त्याठिकाणी स्वच्छता ठेवावी पेंटिंग करण्यात यावे, असेही शिंदे यांनी सांगितले. मुंबईतील २५ महत्वाच्या पुलांची रोषणाई केली जाणार आहे. १८ स्कायवॉकना रोषणाई केली जाणार असून विविध आकाराचे स्ट्रीट फर्निचर देखील महत्त्वाच्या पदपथांवर बसविण्यात येणार आहेत. पुढील तीन महिन्यात ६१ वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.