सिंधुदुर्ग : समुद्रात वादळसदृश्य परिस्थितीमुळे कोकणातील मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. स्थानिक प्रशासनाने देखील मच्छिमारांनी १५ सप्टेंबरपर्यंत मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन केले आहे.
समुद्रात वादळसदृश्य परिस्थिती असल्याने गुजरातमधील १२३ मासेमारी बोटी कोकणातील सुरक्षित अशा देवगड बंदरात आश्रयाला दाखल झाल्या आहेत. तर कोकणातील स्थानिक मच्छिमारांनी आपल्या बोटी सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत. समुद्र खवळलेला असल्याने लाल बावटा लावण्यात आला आहे. जेणेकरुन खवळलेल्या समुद्रात मच्छिमार मासेमारीसाठी जाऊ नये यासाठी मच्छिमारांना इशारा देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने देखील मच्छिमारांनी १५ सप्टेंबरपर्यंत मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन केले आहे.
पावसाळ्यात समुद्राला असलेले उधाण, माशांच्या प्रजननाचा काळ या कारणास्तव जून आणि जुलै या कालावधीमध्ये मासेमारी बंद असते. यंदा १ जून ते ३१ जुलै हा कालावधी पावसाळी मासेमारी बंदी कालावधी म्हणून शासनाने जाहीर केला होता. या काळात मासेमारी पूर्णतः बंद होती. तर १ ऑगस्टपासून नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात झाली.
यावर्षी १ ऑगस्टपासून मासेमारीचा हंगाम सुरु झाला. मात्र हंगाम सुरु झाल्यापासून आतापर्यंत २० ते २२ दिवस मासेमारी झाली. गेली दोन वर्षे वातावरणात होत असलेले बदल, येऊन गेलेले तोक्तेसारखं चक्रीवादळ, याचा परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला होता. परिणामी कोकणातील मच्छीमार मेटाकुटीला आले होते. त्यामुळे यंदाचा हंगाम चांगला असेल अशी अपेक्षा मच्छिमारांची होती. परंतु यावर्षी समुद्रात वादळसदृश्य परिस्थिती असून मासेमारीसाठी पोषक वातावरण नसल्याने मच्छिमारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.