Thursday, April 24, 2025
Homeदेशलंपीमुळे राजस्थानातील ५७ हजार गायींचा मृत्यू

लंपीमुळे राजस्थानातील ५७ हजार गायींचा मृत्यू

आतापर्यत ११ लाख गायी आजारी

जयपूर (वृत्तसंस्था) : राजस्थानात जनावरांमध्ये पसरणाऱ्या लंपी स्कीन रोगाने महामारीचे रूप धारण केले आहे. लंपीमुळे राजस्थानमध्ये आतापर्यंत ५७ हजार गायींचा मृत्यू झाला असून ११ लाख गायी आजारी आहेत. याचा थेट परिणाम राजस्थानातील दुधाच्या उत्पादनात झाला असून चार लाख लिटरने उत्पादनात घट झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दुधाची आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे राजस्थानमधील सर्वात मोठ्या डेअरी सरसने दूध प्रतिलिटर दोन रुपयांनी महाग केले आहे. तुपाचे उत्पादनही घटले आहे.

जयपूरजवळील बरना गावातून दररोज १० हजार लिटर दुधाचा पुरवठा होत होता. मात्र, लंपीच्या रोगामुळे केवळ सहा हजार लिटर दुधाचा पुरवठा होत आहे. यासंबंधीचे वृत्त एका वेबसाइटने दिले आहे. त्यानुसार, बरना गावात दूध उत्पादक महेंद्र शर्मा यांचा गोठा आहे. त्यांच्या गोठ्यात २७ गायी आहे, मात्र गेल्या काही दिवसात ८ गायींचा लंपी रोगाने मृत्यू झाला. पाच अजूनही लंपीग्रस्त आहेत. महेंद्र यांनी गायींच्या उपचारासाठी अनेक फेऱ्या मारल्या, मात्र मदत मिळाली नाही. महेंद्र यांनी बँकेकडून कर्ज घेऊन या गायी खरेदी केल्या होत्या. एका गायीची किंमत जवळपास ७० हजार रुपये होती. गायींच्या मृत्यूनंतर महेंद्रला कर्जाचा हप्ता फेडणे कठीण झाले. लंपीमुळे दूधही कमी झाले आहे. महेंद्र आधी १५० लिटर दुधाचा पुरवठा करत होते, आता फक्त ७५ लिटर दुधाचा पुरवठा करत आहेत.

या गावात ३ हजार गायी आहेत, मात्र २५० गायींचा लंपीमुळे मृत्यू झाला तर ५०० गायी आजारी आहेत. ग्रामस्थ आपापल्या स्तरावर स्वदेशी उपचार करत आहेत. शासनाकडून उपचारासाठी विशेष व्यवस्था नाही. सरकार जनावरांना वाचवण्यासाठी काहीच करत नसल्याचा संताप ग्रामस्थांमध्ये आहे. लंपीच्या आराजाचा परिणाम असा झाला की, बरना गावातील मेम दूध डेअरीवर दूध देणाऱ्या शेतकऱ्यांच्या रांगा कमी झाल्या आणि दूध कमी झाले. या गावातून शेतकरी दररोज १० हजार लिटर दूध डेअरीत विकत होते. लंपीच्या कहरानंतर आता फक्त सहा हजार लिटर पुरवठा होत आहे.

दुसरीकडे, भाजप नेते राजेंद्र राठोड यांनी आरोप केला की, लंपीमध्ये गायींच्या मृत्यूची संख्या लाखोंच्या घरात आहे. गायींना वाचवण्यात आणि त्यांच्यावर उपचार करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. याचबरोबर, राजस्थान सरकारमधील पर्यावरण मंत्री सुख राम विश्नोई यांनी स्पष्ट केले की, लंपीपासून गायींना वाचवण्यासाठी औषधे पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. घटत्या दूध उत्पादनातून दिलासा मिळावा म्हणून दूध उत्पादकांना सवलत दिली जात आहे, मात्र राजस्थान सरकारने लंपीला साथीचा रोग म्हणून घोषित करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली.

दरम्यान, गुजरातनंतर राजस्थान हे दूध उत्पादनात देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. देशाच्या दूध उत्पादनात राजस्थानचा वाटा १२.७४ टक्के आहे. राजस्थानची अर्थव्यवस्थाही पशुधनावर अवलंबून आहे. जीडीपीच्या दहा टक्के पशुधनातून येतात. एका ढोबळ अंदाजानुसार, लंपीमुळे जवळपास ६०० कोटींचे नुकसान झाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -