मुंबई (वार्ताहर) : ३३वी पश्चिम विभागीय राष्ट्रीय मैदानी स्पर्धा रायपूर येथे नुकतीच पार पडली. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, गोवा, मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यांतील ७५३ खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने ५५ सुवर्ण पदक मिळवत पुरुष व महिला गटात सर्वसाधारण विजेतेपद मिळवले.
विशेष बाब म्हणजे याच महिन्यात भोपाळ येथे भारताच्या युवा आशियाई स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी काही खेळाडूंनी सहभागी होण्यासाठी या स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता. तरी देखील ५५ सुवर्ण, ३८ रौप्य, १८ कांस्य पदक मिळवत महाराष्ट्राने १०७ पदकांची लूट केली.
नेहमी प्रमाणे पुन्हा एकदा महाराष्ट्र संघाने या स्पर्धेत आपले वर्चस्व राखले आहे. दुसऱ्या स्थानी असलेल्या राजस्थानने २२ सुवर्ण पदके जिंकली. २० सुवर्ण पदके मिळवून गुजरात तिसऱ्या स्थानी आहे. ८ सुवर्ण पदके जिंकत छत्तीसगड चौथ्या स्थानी आहे. यजमान मध्यप्रदेश केवळ ६ सुवर्ण पदके मिळवत पाचव्या स्थानी राहिला. गोव्याला केवळ १ रौप्य पदक मिळाल्याने त्यांचे पदक तालिकेत तळाचे स्थान होते.