Thursday, April 24, 2025
Homeदेशज्ञानवापी प्रकरणी हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल; पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला

ज्ञानवापी प्रकरणी हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल; पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला

वाराणसी (वृत्तसंस्था): ज्ञानवापी मशीद प्रकरणात वाराणसी सत्र न्यायालयाने हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल दिला आहे. हिंदू पक्षाने दाखल केलेली याचिका सुनावणीयोग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मुस्लीम पक्षकारांची याचिका वाराणसी न्यायालयाने फेटाळली आहे. यासंदर्भात पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला होणार आहे.

‘हा हिंदू समाजाचा विजय आहे. न्यायालयाचा हा निर्णय ज्ञानव्यापी मंदिरासाठी रचण्यात आलेला पाया आहे’ अशी प्रतिक्रिया याचिकाकर्ते सोहन लाल आर्या यांनी दिली आहे. राज्यात शांतता टिकवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
ज्ञानवापी मशीद परिसरात असलेल्या हिंदू देवतांच्या दैनंदिन पुजेच्या परवानगीसाठी पाच हिंदू महिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या याचिकेवरील निकाल जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांनी गेल्या महिन्यात राखून ठेवला होता. दरम्यान, न्यायालयाच्या निकालानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी वाराणसीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

‘अंजुमन इंन्तेझामिआ मशीद समिती’ने ज्ञानव्यापी मशिदीची जागा वक्फ बोर्डाची संपत्ती असल्याचा दावा करत हिंदू पक्षाने दाखल केलेल्या याचिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. तर या जागेवर असलेले मंदिर पाडल्यानंतर मशीद बांधण्यात आली’, असा दावा हिंदू याचिकाकर्त्यांनी केला होता. दरम्यान, कनिष्ठ न्यायालयाने या मशिदीचे व्हिडीओ सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. या सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांनी हा निकाल दिला. यावेळी हिंदू पक्षाचे वकील हरिशंकर जैन आणि विष्णू जैन यावेळी उपस्थित होते. याशिवाय लक्ष्मी देवी, रेखा आर्या आणि मंजू व्यास या ५ पैकी ३ फिर्यादी देखील कोर्टात पोहोचल्या होत्या. केवळ ४० पक्षकार आणि त्यांच्या वकिलांना या सुनावणीवेळी प्रवेश मिळाला होता. इतर लोकांना कोर्टामध्ये प्रवेश देण्यात आलेला नव्हता.
ज्ञानवापी मशीद खटल्यात हिंदू पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितलं की, न्यायालयाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळून लावली आणि दावा कायम ठेवण्यायोग्य असल्याचे सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२सप्टेंबर रोजी होणार आहे. हा हिंदू समाजाचा विजय आहे.

दुसरीकडे, हिंदू पक्षाच्या वतीने वक्फची कागदपत्रे बनावट असल्याचे आणि ज्ञानवापी मशिदीच्या खाली आदि विश्वेश्वराचे मंदिर असल्याचा दावा करण्यात आला. वरची रचना वेगळी आहे. जोपर्यंत एखाद्या ठिकाणाचे धार्मिक स्वरूप ठरवले जात नाही तोपर्यंत पूजा स्थळ कायदा-१९९१ प्रभावी मानला जाणार नाही, असा दावा करण्यात आला. या प्रकरणी २४ ऑगस्टला दोन्ही बाजूंनी युक्तिवाद पूर्ण झाला होता. जिल्हा न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. तो आज सुनावण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -