नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबईत गणेशोत्सवात जमा झालेल्या ३८ टन ओल्या निर्माल्यावर नैसर्गिक खत निर्मिती प्रक्रिया करण्यात येणार आहे. अत्यंत उत्साहात संपन्न झालेल्या श्रीगणेशोत्सवामध्ये नवी मुंबईकर नागरिकांनी पर्यावरणशील दृष्टिकोन जपत १५ हजारपेक्षा अधिक श्रीमूर्तींचे १३४ कृत्रिम तलावात विसर्जन केले. त्याचप्रमाणे श्रीमूर्तींसोबत विसर्जनस्थळी आणले जाणारे निर्माल्य ओले व सुके अशा वेगवेगळ्या निर्माल्य कलशातच टाकावे या महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलेल्या आवाहनालाही उत्तम प्रतिसाद दिला.
श्रीगणेशोत्सवातील पाच विसर्जन दिवसांमध्ये २२ नैसर्गिक व १३४ कृत्रिम विसर्जन स्थळांवर ठेवलेल्या निर्माल्य कलशात ३८.७९५ टन ओले निर्माल्य जमा झाले. हे निर्माल्य संकलित करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वतंत्र ४६ निर्माल्य वाहतूक वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. गणेशोत्सवात श्रीमूर्तींसोबत विसर्जनस्थळी येणाऱ्या पुष्पमाळा, फुले, दुर्वा, तुळस, शमी, फळांच्या साली-तुकडे यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे ‘ओले निर्माल्य’ तसेच मूर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान असे ‘सुके निर्माल्य’ ठेवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वेगवेगळ्या निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली होती.
अशाप्रकारे ओले व सुके निर्माल्य वेगवेगळ्या कलशात ठेवण्याच्या संकल्पनेला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे यावर्षीच्या श्रीगणेशोत्सव विसर्जन कालावधीत दीड दिवसाच्या विसर्जनादिवशी ६ टन, पाच दिवसाच्या विसर्जनाप्रसंगी ५ टन, गौरींसह सहाव्या दिवसाच्या विसर्जनाप्रसंगी १२.५७० टन, सात दिवसाच्या विसर्जनाप्रसंगी ४.५७५ टन तसेच दहाव्या अनंतचतुदशीच्या विसर्जनाप्रसंगी ९.८८५ टन अशाप्रकारे पाच विसर्जनदिनी एकूण ३८.७९५ टन निर्माल्य जमा झाले. या निर्माल्याच्या वाहतुकीसाठी ४० स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. हे निर्माल्य तुर्भे प्रकल्पस्थळी नेण्यात आले असून त्यावर शास्त्रोक्त खत निर्मिती प्रक्रिया केली जात आहे.