अनघा निकम-मगदूम
काळ बदलतो तसे सामाजिक प्रश्नसुद्धा बदलत असतात. नव्याने आव्हान म्हणून उभे राहतात. सध्याचे जीवन हे ऑनलाइन जीवन आहे. माणसे मोबाइलवर जास्त आणि प्रत्यक्षात कमी भेटायला लागली आहेत. दुःख, आनंद, उत्साह, राग लोभ यासाठी प्रत्यक्ष व्यक्त होण्यापेक्षा आभासी जगातील बाहुल्यांच्या चित्रांच्या माध्यमातून व्यक्त होणे वाढले आहे. मूक संवाद वाढला आहे. पण या आभासी जगाच्या पोकळीत आता आपण सारेचजण सामावून गेलो आहोत. आता तो केवळ विरंगुळा राहिलेला नाही, तर दैनंदिन जीवनातील गरज बनली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आपण सोशल मीडियाचा वापर खूप जास्त करतोय. आता पूर्वीसारखा हा सोशल मीडिया फक्त तरुणाईच्या हातातलं माध्यम राहिलेला नाही, तर जवळपास प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून या सोशल मीडियावर आलेला आहे. कोणी फेसबुकवर असेल, कोणी इन्स्टाग्रामवर असेल, व्हॉट्सअॅप हा प्रकार तर सर्रास वापरला जातोय. अगदी ग्रामीण भागामध्येसुद्धा व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढते आहे. त्यात मोबाइलच्या माध्यमातून आर्थिक देवाण-घेवाण सुरू झालेली आहे. सोशल साइट्सवर एकमेकांवर कॉमेंट करणे, व्यक्त होणे सुरू झालेले आहे. पण त्यामुळेच जगण्यात नवी आव्हाने सुद्धा उभी राहिली आहेत. सोशल मीडिया हे दुधारी अस्त्र आहे. ते वापरणं जितकं सोपं तितकंच ते हाताळणे खूप कठीण आहे, याचा प्रत्यय आता प्रत्येकालाच येऊ लागला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सोशल मीडिया अर्थात सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल, आक्षेपर्ह कॉमेंट केल्याबद्दल दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होते आहे, तर दुसरीकडे सोशल साइट्सचा वापर करून आर्थिक व्यवहारात फसवणाऱ्यांच्या विरुद्ध दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचीसुद्धा संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. सर्वासामान्य माणूस यामध्ये भरडला जात आहे. म्हणजेच या साइट्स किंवा सामाजिक माध्यमं हाताळताना आपण किती सजग राहिलं पाहिजे, याचीच हे उदाहरण आहेत.
खरं तर कुठल्याही बाबतीत प्रत्येकाचं स्वतःचं एक वैयक्तिक मत असतं. मग हे मत एखाद्या व्यक्ती, पक्ष, समाज किंवा एखाद्या घटनेबद्दल असतं. पण आपण समाजात राहतो. याचाच अर्थ कुठे, किती आणि कसं व्यक्त व्हावं याबाबत काही मर्यादा या समाजाने आपल्याला घालून दिल्या आहेत. यापूर्वी एकमेकांशी संभाषण करताना सुद्धा, मग ते संभाषण एखाद्या सभेमध्ये, एखाद्या ग्रुपमध्ये किंवा मित्रांमध्ये असलं तरीसुद्धा बोलण्याचे तारतम्य बाळगणं ही प्रत्येकाचीच जबाबदारी असते. हा अलिखित नियम समाजाने घालून दिला आहे. मात्र आता बदलत्या काळात समाजामध्ये एकत्र येण्याचे प्रसंग हळूहळू कमी होताना दिसत असून आता हा समाज एका मोबाइलवर समाज माध्यम किंवा सोशल साइट्स या रूपाने एकत्रित होताना दिसतोय. पण त्याचवेळी समाजाचाचे प्रतिबिंब असलेल्या या समाज माध्यमावर आलेल्या एखाद्या फोटोवर, एखाद्या घटनेवर, एखाद्या व्हीडिओवर व्यक्त होताना आपण किती भान ठेवतोय आणि आपल्या भावना किती व्यक्त करतोय, याचं भान राहिनासे झाले आहे. त्यातूनच सामाजिक क्लेश वाढताना दिसत आहेत.
त्यात यापूर्वी गावात घडणारी एखादी घटना आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित असे. त्यामुळे त्याची कमी जास्त तीव्रता त्या परिसरापुरतीच राहत असे. मात्र या सोशल साइट्समुळे आपण जगाच्या कानाकोपऱ्याशी जोडले गेलो आहोत. जगाच्या दुसऱ्या टोकाला घडलेली घटना काही मिनिटातच आपल्यासमोर येऊन उभी राहते आणि आपण त्या त्या प्रकारे रिअॅक्ट होण्यास प्रवृत्त होतो. त्यातील अनेक घटना या सामाजिक शांतता बिघडवणाऱ्या अधिक असतात किंवा यां घटनांची चर्चा अधिक होते. अशा घटनांमुळे सातत्याने वाढ होताना दिसते आहे. यापूर्वी राजकारण असेल किंवा समाजकारण असेल या गोष्टी ठरावीक काळापुरत्या ठरावीक वेळापुरत्याच घडत होत्या. राजकारण हे निवडणुका आल्या की त्यावेळी त्यापुरते व्यक्त होण्याची गोष्ट होती. मात्र आता प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येकजण व्यक्त होताना दिसतेय. एकीकडे राजकारण आणि दुसरीकडे स्त्रियांचा होणारा अपमान. समाज माध्यमावर स्त्रियांवर होणाऱ्या कॉमेंट्स पाहता आपला समाज नेमका कोणत्याही दिशेने वाटचाल करत आहे, असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे.
ही झाली वैयक्तिक जबाबदारी. पण दुसरीकडे गेल्या काही वर्षांपासून आर्थिक व्यवहारसुद्धा ऑनलाइन पद्धतीने केले जात आहेत. यामुळे वेग वाढला आहे हे नक्की. यामुळे व्यवहारात सुलभतासुद्धा आली आहे, हेही नक्की. मात्र दुसरीकडे आर्थिक फसवणुकीचे प्रकारसुद्धा वेगाने वाढत आहेत. होणारी फसवणूक काही लाखांची असून अनेकांसाठी ती न भरून काढणारी आहे. क्लीक करणे ही प्रवृत्ती झाली आहे. पण विचार न करता अशा साइट्स ओपन करणे महागात पडू लागले आहे.
थोडक्यात आभासी जगामुळे जग मोबाइलमध्ये सामावले आहे. पण, मनाची शांतता, स्थिरता लांब गेली आहे. अर्थात बदल होणे हे नैसर्गिक आहे. अशा वेळी त्यांचा स्वीकार करताना तो सर्वांगीण विचार करून करणे आवश्यक आहे. सोशल साइट्सवरील कमेंट असेल किंवा ऑनलाइन पैसे ट्रान्स्फर असेल. दोन्हींसाठी सोशल मीडियाची सायबर साक्षरता महत्त्वाची झाली आहे. यासाठी या सायबर विश्वाची अ… आ… इ… ई… पुन्हा गिरवावी लागणार आहे. या साक्षरतेची पुन्हा सुरुवात करावी लागणार आहे.