शिर्डी (प्रतिनिधी) : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट असा केला आहे. श्रीरामपूर येथे जनआक्रोश मोर्चाच्या निमित्ताने नितेश राणे आले असताना त्यांनी भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख केल्याने यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये भाजपच्या वतीने ‘जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. ‘लव्ह जिहाद’ आणि आदिवासी तरुणाच्या अपहरणाच्या घटनेचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. यानिमित्ताने नितेश राणे यांनी हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. या मोर्चामध्ये माजी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके हेसुद्धा सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी जनआक्रोश आंदोलनात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट असा केला.
‘सध्या महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक नाहीत… आज नगर जिल्ह्याचा पालकमंत्री हसन मुश्रीफ नाही आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही नाही, हे संबंधितांनी लक्षात ठेवावे. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत; जे कडवट हिंदुत्ववादी आहेत आणि उपमुख्यमंत्री म्हणून हिंदुहृदयसम्राट देवेंद्र फडणवीस हे काम करत आहेत. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी हे हिंदुत्ववादी सरकार आहे हे लक्षात ठेऊनच काम करावे’, अशी समज भाजप आमदार नितेश राणे यांनी शनिवारी दिली. भोकर येथील आदिवासी समाजातील दीपक बर्डे या तरुणाने मुस्लीम तरुणीशी लग्न केल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी त्याचे अपहरण केल्याचा आरोप आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. मात्र अजूनही दीपकला शोधण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही. याविरोधात भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात श्रीरामपूर येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते.
‘आरोपींना अटक झाली; पण मुलगा सापडत नाही. आता जर अजून काही दिवस दीपक सापडला नाही, तर महाराष्ट्रातला हिंदू समाज तांडव करेल’, अशी इशारेवजा धमकी आमदार नितेश राणे यांनी यावेळी दिली.’