Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीसत्तासंघर्षाचा पेच कायम!

सत्तासंघर्षाचा पेच कायम!

पुढील सुनावणी २७ सप्टेंबरला

नवी दिल्ली : राज्यातल्या सत्तासंघर्षाची लढाई सध्या सर्वोच्च न्यायालयात घटनापीठापुढे सुरू आहे. ही लढाई दिवसेंदिवस काही ना काही कारणाने पुढे ढकलली जात होती. आज पुन्हा एकदा ही सुनावणी २० दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी २७ सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे आता शिंदे आणि ठाकरे गटात आणखी अनिश्चितता निर्माण झाल्याचे दिसत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात खरी शिवसेना कुणाची असा वाद सुरु आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण त्यावर कुणाचा अधिकार आहे? भाजपासोबत सरकार बनवणाऱ्या एकनाथ शिंदेंसोबत असलेले शिवसेना आमदार अपात्र आहेत की नाही? या राज्यातील सत्तासंघर्षाबाबत पहिल्यांदाच घटनापीठाकडे सुनावणी घेण्यात आली. न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी घेण्यात आली. शिवसेना आमचीच असा दावा शिंदे-ठाकरे दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाकडेही हे प्रकरण प्रलंबित आहे.

या विविध मुद्द्यांवर सुनावणीसाठी सरन्यायाधीश यू. यू लळीत ५ जणांचे घटनापीठ स्थापन केले. त्यात न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर शाह, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. नरसिंहमन यांचा समावेश आहे. या घटनापीठाने दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ सप्टेंबरला घेणार आहे. परंतु या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे गटाला दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाला चिन्हाबाबत कुठलाही निर्णय २७ सप्टेंबरपर्यंत घेऊ नये असे कोर्टाने सांगितले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाने केलेली विनंती कोर्टाकडून तूर्तास मान्य करण्यात आली नाही.

आम्ही २७ सप्टेंबरपर्यंत या सगळ्या प्रकरणाची तपशीलवार सुनावणी घेऊ, असे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सांगितले. याच दिवशी निवडणूक आयोगाबद्दलचे सर्वांचे युक्तिवादही ऐकून घेतले जातील, तसेच त्यावर सविस्तर सुनावणी होईल. त्यावर उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी हे चुकीचे असल्याचा दावा केला आहे. ज्यांना विधानसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरवले जाऊ शकते, त्यांना निवडणूक आयोगाकडे जाण्याचा अधिकार नाही. शिंदे गटाला निवडणूक चिन्ह मिळाले की, सगळा कारभार व्यर्थ ठरेल, असा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांनी केला आहे. तर आमदार असो, वा नसो, पक्षावर दावा करुच शकतो, असे शिंदेंचे वकील नीरज कौल यांच्याकडून सांगण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -