मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यात शिवसेना आणि शिंदे गट आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळवण्याची जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यावेळी दोन शिवसेना गट तयार झाल्याने दसरा मेळावा कोण घेणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
तर, आता शिवाजी पार्क कोणालाच देऊ नका, अशी आक्रमक भूमिका शिंदे गटाने घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क फ्रिज होण्याची शक्यता अधिक वर्तवण्यात येत आहे.
मनपाने परवानगी दिली तर त्याला विरोध केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणालाच देऊ नका, अशी भूमिकादेखील शिंदे गटाने घेतली असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घ्यायचा आहे, तिथे मी सविस्तर बोलेन. आतापर्यंत मुख्यमंत्रिपदाचा मास्क असायचा, त्यामुळे बोलताना जपून बोलावे लागायचे. आता तसे नाही,’ असा थेट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट व भाजपला दिला आहे. तर मेळाव्यासाठी शिवतीर्थ आम्हाला द्यावे, असा अर्ज शिंदे गटाने मुंबई महापालिकेकडे केला आहे.
तर तिकडे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ज्यांच्याबरोबर ४० आमदार त्यांचाच दसरा मेळावा शिवाजी पार्कवर व्हावा. असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे दसरा मेळावा सेनेचा की शिंदे गटाचा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.