Saturday, March 15, 2025
Homeमहत्वाची बातमीउमदा उद्योजक हरपला

उमदा उद्योजक हरपला

अजय तिवारी

सायरस मिस्त्री यांच्या निमित्ताने आणखी एक उमदं व्यक्तिमत्त्व महामार्गावरील अपघातामध्ये बळी पडलं आणि पुन्हा एकवार या महामार्गांच्या आणि वाहनचालकाच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत आला. उद्योगविश्वावर आपलं नाव कोरणारे, अद्भुत व्यावसायिक कौशल्य असणारे असे कुशल उद्योजक इतक्या फुटकळ कारणांमुळे बळी पडत असतील, तर काही तरी मोठी चूक होत आहे, हे लक्षात घेऊन अशा प्रश्नाच्या मुळाशी जायला हवं.

अतिशय कमी वयात शापूरजी पालन उद्योगसमूह आणि टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा कारभार पाहणाऱ्या सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू व्हावा, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. देशात रस्ते अपघातातल्या मृतांच्या संख्येबाबतचा अहवाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या तीन-चार दिवसांमध्ये ही घटना घडली. मिस्त्री यांच्या मृत्यूने आणखी गंभीर प्रश्न उपस्थित झाले. गाडी महागडी असली आणि त्यात एअरबॅग असल्या म्हणजे मृत्यू टाळता येतो, हा गैरसमज या अपघाताने पुन्हा एकवार दूर केला. बहुतांश राष्ट्रीय महामार्गांवर ‘वेगावर नियंत्रण, अपघातावर नियंत्रण’ या आशयाचे अनेक फलक लावलेले दिसतात. त्याचा अर्थ समजून घेतला जात नाही. लाखो रुपयांची गाडी असली, म्हणजे ती कितीही वेगाने चालवावी आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करावं असं नाही. सायरस मिस्त्री मर्सिडीज गाडीतून अहमदाबादहून मुंबईला परतत होते. त्यांची गाडी स्त्रीरोगतज्ज्ञ अनाहिता पंडोल चालवत होत्या आणि गाडीचा वेग प्रति तास १२० हून अधिक असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. समोर आलेल्या माहितीवरून ही कार भरधाव वेगानं जात होती आणि दुसऱ्या कारला ओलांडून जात असताना दुभाजकाला धडकली. डॉ. पंडोल यांनी दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे पती दरायस पंडोलदेखील सोबत होते. मिस्त्री आणि दरायस यांचे बंधू जहांगीर मागच्या सीटवर बसले होते. नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन आदळली. त्यामुळे जोरदार हिसका बसून सायरस यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

सायरस मिस्त्री यांच्या निधनामुळे टाटा समूहासोबतचा त्यांचा दीर्घकाळ चाललेला कायदेशीर लढा पुन्हा एकदा चर्चेत आला. २०१२ मध्ये ‘टाटा सन्स’च्या अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या मिस्त्री यांना २४ ऑक्टोबर २०१६ रोजी अचानक पदावरून हटवण्यात आलं. तेव्हापासून ते टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा आणि त्यांचे व्यवस्थापकीय विश्वस्त एन. वेंकटरामन आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक वर्षांपासून प्रदीर्घ कायदेशीर लढाई लढत होते. ही कायदेशीर लढाई २०२१ मध्ये संपली. २०१२ मध्ये मिस्त्री यांना ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष बनवण्यात आलं. त्या वेळी त्यांचं वय ४४ वर्षं होतं. त्या वेळेपर्यंत ते शापूरजी पालोनजी ग्रुपच्या कंपन्यांचे प्रमुख होते. मिस्त्री यांना चर्चेत राहणं पसंत नव्हतं. त्यांनी शांतपणे काम करणं पसंत केलं. ‘टाटा सन्स’चं अध्यक्षपद स्वीकारणारे ते टाटा कुटुंबाबाहेरील दुसरी व्यक्ती होते. त्यांनी ‘टाटा सन्स’च्या संचालक मंडळावर आपले वडील पालोनजी शापूरजी यांची जागा घेतली. ते आयरिश नागरिक होते. ते मृदुभाषी होते तसंच स्पष्टवक्तेही होते. त्यांना गोल्फ खेळण्याची आणि वाचनाची आवड होती.

मिस्त्री यांची गणना देशातल्या प्रसिद्ध आणि कुशल उद्योगपतींमध्ये होते. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे उद्योग विश्वापासून राजकारणापर्यंत विविध क्षेत्रांतल्या लोकांना आश्चर्याचा जोरदार धक्का बसला. वडिलांच्या कंपनीतून सुरू झालेला व्यावसायिक प्रवास त्यांची वेगळी ओळख घेऊन संपला. त्याच वेळी ते कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक होते. पालोनजी यांचा बांधकाम व्यवसाय होता. त्यांच्या ‘एसपी ग्रुप’ या कंपनीने भारतात ताज हॉटेल आणि रिझर्व्ह बँकेची इमारत बांधली आहे. मिस्त्री यांनी १९९१ मध्ये शापूरजी पालोनजी अँड कंपनी लिमिटेडमध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. २०१२ ते २०१६ या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते. टाटा समूहात सायरस मिस्त्री यांची सर्वाधिक म्हणजे १८.४ भागीदारी टक्के होती. मिस्त्री यांची एकूण संपत्ती सुमारे दहा अब्ज डॉलर आहे. भारतीय रुपयात त्याची किंमत ७० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. शापूरजी मिस्त्री आणि कंपनीने मध्य आशिया आणि आफ्रिकेतले अनेक बांधकाम प्रकल्प तसंच वीज प्रकल्प आणि कारखाने उभारले. सायरस यांची लंडन, आयर्लंड आणि दुबई इथेही निवासस्थानं आहेत.

अहमदाबादहून मुंबईला परतताना मिस्त्री मर्सिडीजच्या जीएएलसी २२० डी या कारमधून प्रवास करत होते. ही कार सर्व सुरक्षावैशिष्ट्यांनी सुसज्ज होती आणि त्यात सात एअरबॅगही होत्या. असं असूनही रस्ता अपघातात सायरस मिस्त्री यांचे प्राण वाचू शकले नाहीत. मर्सिडीज, बीएमडब्ल्यूसारख्या कंपन्यांची वाहनं अतिशय सुरक्षित मानली जातात; परंतु सुरक्षित असण्याचा अर्थ असा नाही की, कोणत्याही पद्धतीने अपघात झाला तरी ही वाहनं आतल्या माणसाला वाचवतील. असे काही गंभीर अपघात अनपेक्षित आणि विचित्र पद्धतीने घडतात की त्याचा परिणाम वाहनाच्या आतील भागावर होतो. अपघाताची छायाचित्रं पाहिली तर ही कार रस्त्यावरून घसरली आणि दुभाजकावर जोरात धडकली, असं जाणवतं. मागील सीटवर बसलेल्या सायरस यांनी सीट बेल्ट बांधल्याचा अंदाज आहे; मात्र टक्कर इतकी जोरदार होती की, त्यांना जीवघेणी दुखापत झाली. भारतातले द्रुतगती मार्ग आणि महामार्गानुसार गाड्यांची वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यूसारख्या कार जर्मनीसारख्या देशात ३०० किलोमीटर प्रति तास वेगाने धावतात; परंतु भारतात त्यांची वेग मर्यादा बरीच कमी आहे. ही वाहनं भारतात प्रचंड वेगाने चालवता येत नाहीत. आतापर्यंतच्या सर्व रस्ते अपघातांमध्ये एअरबॅगमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत; परंतु एअरबॅगच्या सुरक्षिततेला मर्यादा आहेत. दुसरीकडे, सीट बेल्टचं कार्य कारमध्ये बसलेल्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवणं हे आहे. त्यामुळे गाडीच्या वेगावर उत्तम नियंत्रण राखणं हा अपघात टाळण्याचा महत्त्वाचा मंत्र आहे.

मिस्त्री यांच्या कारला झालेल्या अपघातात एअरबॅग उघडल्या गेल्या. त्यामुळे त्यांचं डोकं डॅशबोर्डवर आपटलं नाही; मात्र विंडस्क्रीनची अवस्था पाहता चालक आणि सहप्रवाशाचं डोकं विंडस्क्रीनला आदळल्याचं दिसतं. एअरबॅग ही फुग्यासारखी असते. ती अपघातानंतर कारचालकाच्या शरीरावर किंवा डोक्यावर आदळते. अशा वेळी एअरबॅग गाडीत बसलेल्या व्यक्तीला पुन्हा मागे ढकलते. एअरबॅगच्या आत ‘इनहार्ट’ गॅस असतो. त्यामुळे प्रवाशाचं मोठं नुकसान होत नाही. असं असलं तरी महागड्या एसव्हीयूचे ‘सेफ्टी फीचर्स’सुद्धा मिस्त्री यांचा जीव वाचवू शकले नाहीत. या अपघातामुळे वाहनाच्या बिल्ट क्वालिटीबद्दल शंका निर्माण झालेली नाही, अशा वाहनांची बिल्ट क्वालिटी खूप चांगली असते. पण अपघातात चालकाची चूक जास्त असल्याचं दिसून येत आहे. एखाद्याला वाचवण्याच्या प्रयत्नात, चालकाला झोप लागली किंवा तो वाहनावर नियंत्रण ठेवू शकला नाही, असंही होऊ शकतं. देशात रस्ते आणि रेल्वे अपघातांचं वाढतं प्रमाण चिंतेचा विषय बनलं आहे. २०२१ मध्ये वर्षभरात चार लाख २२ हजार रस्ते आणि रेल्वे अपघात झाले. त्यात तब्बल एक लाख ७३ हजार लोकांना जीव गमवावा लागला, तर तीन लाख ७१ हजार ८८४ लोक जखमी झाले. या अवधीत महाराष्ट्रात १६ हजार ४४६ जणांचा अपघाती मृत्यू झाला.

२०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये अपघाती मृत्यूचं प्रमाण तब्बल १८.८ टक्क्यांनी वाढलं. ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्यूरो’च्या (एनसीआरबी) अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळेही पादचारी आणि दुचाकीस्वारांचे हकनाक बळी जात आहेत. या अहवालानुसार, देशात २०२० मध्ये तीन लाख ६८ हजार ८२८ रस्ते आणि रेल्वे अपघात झाले होते. या वाहतूक अपघातांचा आकडा २०२१ मध्ये चार लाख २२ हजार ६५९ वर गेला. यामध्ये चार लाख तीन हजार ११६ रस्ते, १७ हजार ९९३ रेल्वे व एक हजार ५५० रेल्वे क्रॉसिंग अपघातांचा समावेश असून यात अनुक्रमे एक लाख ५५ हजार ६२२, १६ हजार ४३१ आणि एक हजार ८०७ मृत्यू झाले, अशी नोंद आहे. अपघातांमध्ये मृत्यू होण्याचं महाराष्ट्र राज्यातलं प्रमाण चिंताजनक आहे. अपघाती बळींच्या आकडेवारीत महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०२१ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक २४ हजार ७११ लोकांचा अपघाती मृत्यू झाला. त्यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये १६ हजार ६८५ आणि महाराष्ट्रात १६ हजार ४४६ अपघाती मृत्यूंची नोंद झाली. देशातल्या आकडेवारीच्या तुलनेत महाराष्ट्रातल्या अपघाती बळींचं प्रमाण ९.५ टक्के आहे. मानवी चुका टाळण्याबरोबरच रस्त्यांची स्थिती चांगली करणं हा अपघात टाळण्याचा उपाय आहे. मात्र वाहनाचा प्रचंड वेग मर्यादेत राखणं हा महत्त्वाचा उपाय ठरू शकतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -