मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लालबागचा राजा व सिद्धिविनायक या प्रमुख गणपतींचे दर्शन घेतले. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरगुती गणपतीचेही दर्शन घेतले.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांच्या उपस्थितीत भाजपतर्फे ‘मिशन मुंबई महापालिके’चा शुभारंभ करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखण्यासाठी अमित शहांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली जाणार आहे.
अमित शहा यांचे रविवारी वायुदलाच्या विशेष विमानाने रात्री ९.४९ वाजताच्या सुमारास मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह इतर मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.
त्यांच्या स्वागतासाठी मुंबई भाजपने जय्यत तयारी आहे. ठिकठिकाणी भाजपतर्फे अमित शहा यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत.