बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आता पुन्हा एकदा दिल्लीचे वेध लागले आहेत. २०२४ साली नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून त्यांनी आतापासून स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आठ वेळा मुख्यमंत्री पद भूषविणाऱ्या नितीशकुमार यांच्या जेडीयूला मागील बिहार विधानसभेच्या निवडणुकीत किती जनाधार मिळाला होता आणि भाजपचे जास्त आमदार असतानाही नितीशकुमार यांना भाजपच्या नेतृत्वाने मुख्यमंत्रीपद बहाल केले होते. तरीही त्यात ते रमले नाहीत. त्यांनी ज्या पद्धतीने जनाधार डावलून विरोधी पक्षनेते असलेल्या तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत युती करून पुन्हा सत्ता काबीज केली असली तरी, बिहारच्या जनतेच्या पाठीत एकप्रकारे खंजीर खुपसला आहे. अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात भाजप-सेनेला स्पष्ट बहुमताचा कौल असतानाही शिवसेनेने विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली होती. त्याची पुनरावृत्ती बिहारमध्ये झाली आहे. त्यामुळे, नितीशकुमार यांना बिहार सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अशा स्थितीत, नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीप्रमाणे नितीशकुमार यांना आपल्या मर्यादा माहीत असतानाही ते दिल्लीच्या राजकारणात सध्या जास्त लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची नुकतीच भेट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या झंझावातापुढे अनेक प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांचे कार्य फिके पडू लागले आहे. त्यांच्यात न्युनगंड निर्माण झाला आहे. या अस्वस्थतेतून आता समदु:खी मंडळी एकत्र येऊन मोदी यांच्याविरोधात नारा देण्याचा प्रयत्न करत आहेत. सपाचे अखिलेश यादव, बसपाच्या मायावती आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सुद्धा उद्या नितीशकुमार यांना भेटून देशात नवी क्रांती करू असा नारा देऊ शकतात; परंतु त्यात भारतीय जनतेवर या विरोधी आघाडीचा कितपत प्रभाव पडेल हे सांगता येणार नाही. कारण भ्रष्टाचाराच्या बाबतीत सगळेच शेराला सव्वाशेर आहेत. तसेच पंतप्रधानांच्या शर्यतीत प्रत्येकाला आपले घोडे पुढे दामटायचे आहेत, समोरचा आपल्यापेक्षा कमी गुणवान आहे. याबाबत कोणाच्याच मनात शंका नाही. त्यामुळे तुमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण हा प्रश्न माध्यमाकडून चंद्रशेखर राव यांना विचारला तेव्हा, नितीशकुमार यांना उभे राहून स्वत:कडे लक्ष वेधून घ्यावे लागले. चला निघायचे ना, अशी विचारणा नितीशकुमार यांनी राव यांच्याकडे केली, ही वस्तुस्थिती लपून राहिली नाही. कारण चंद्रशेखर राव पंतप्रधान म्हणून आपले नाव सुचवणार नाहीत, याची नितीशकुमार यांना पूर्ण खात्री होती. पंतप्रधानपदासाठी ज्याप्रमाणे चंद्रशेखर राव नितीशकुमार यांचे नाव सुचवू शकत नाही, त्याप्रमाणे नितीशकुमारही चंद्रशेखर राव यांचे सुचवू शकणार नाही. हीच स्थिती मायावती, ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांचीही आहे. कारण सगळेच चोरचोर मौसेरे भाई आहेत.
दुसरीकडे विरोधी पक्षांच्या भेटीगाठी संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या सूचक विधानामुळे विरोधकांची हवा निघून गेली आहे. मोदी म्हणतात, “देशाच्या विकासात सर्वात मोठा अडथळा भ्रष्टाचाराचा आहे, त्यामुळेच आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई सुरू केली, मात्र भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी सर्व भ्रष्ट विरोधक एकत्र आले आहेत.” अनेक राज्यांचे मुख्यमंत्री येनकेन भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकले आहेत. त्यामुळे पंतप्रधानांच्या सूचक विधानामुळे कोणाला झाकावे आणि कोणाला काढावे, असे वाटण्यासारखी ही स्थिती आहे.
मोदी सरकारने आपल्या आठ वर्षांच्या काळात देशात अनेक विकासकामे केली, विकासाचे नवीन युग देशात सुरू केले. कोणत्याही सरकारच्या काळातील भ्रष्टाचार शोधून काढणे अतिशय सोपे असते, कारण तो सहज दिसण्यासारखा असतो आणि आपल्यासोबत अनेक पुरावे घेऊन बसला असतो. काँग्रेस सरकारच्या काळातील भ्रष्टाचार साध्या डोळ्यांनी दिसत होता. पण मोदी सरकारातील भ्रष्टाचार हुडकून काढण्यासाठी विरोधकांनी जंगजंग पछाडले. अगदी भिंग घेऊन ते शोधायला निघाले, पण त्यांना काहीच सापडले नाही. त्यामुळे मोदी सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून सध्या सुरू आहे.
अशी एक म्हण आहे की, एका दारूड्याला आपल्या समोर असलेली व्यक्ती ही दारू प्यायणारी असेल तर त्याला नेहमी बरे वाटते. त्याला हसरे कोणी नसते. तसेच भ्रष्टाचारी माणसाचे सर्वात मोठे दु:ख हे असते की आपण भ्रष्टाचारी आहोत, हे नसते, तर समोरचा स्वच्छ प्रतिमेचा आहे, म्हणजेच भ्रष्ट नाही, हे असते. मोदी सरकारने देशाच्या सर्व क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई सुरू केली, रणशिंग फुंकले, मोदी आणखी काही वर्षे सत्तेत राहिले, तर आपल्याला राजकारणातूनच नाही तर देशातूनही गाशा गुंडाळावा लागेल, याची त्यांना खात्री पटली आहे. त्यामुळे सर्वच जण अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे आता काय करायचे सुचत नसल्याने भ्रष्ट विरोधकांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई करणाऱ्या मोदी सरकारविरुद्ध आपली लढाई सुरू केली आहे. स्वत:ला सेक्युलर चेहरा मानणारे नितीशकुमार यांनी २०१९ च्या आधी मोदीविरोधात स्वत:ला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, बिहारमध्ये भाजपसोबत युती करून नितीशकुमार यांनी वाऱ्याची दिशा ओळखून मोदी यांच्या विरोधात उभे राहण्याचा चंग बासनात गुंडाळला होता. आता पुन्हा एकदा नितीशकुमार यांना खुमखुमी आली असावी; परंतु २०२४ च्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून अनेकांना पंतप्रधानपदाची स्वप्न पडू लागल्यास आश्चर्य वाटायला नकोत. नितीशकुमार यांचा पुन्हा भ्रमनिरास होणार की नाही हे येणारा काळ ठरवेल.