
तळा (वार्ताहर) : तळा शहरासह शिवसेना शिंदे गटाने ग्रामीण भागाकडेही आपले लक्ष केंद्रित केले असून तालुक्यातील तारस्ते आणि खांबवली या दोन गावांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने ग्रामीण भागातही शिवसेनेची ताकद वाढली आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदेगटाने रणशिंग फुंकले असून गेली कित्येक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या तारस्ते गावाचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेऊन आ. भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांना मोठा धक्का दिला आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाकडे असलेला खांबवली गाव देखील शिवसेना शिंदे गटाकडे वळवून ग्रामीण भागात आपली पकड मजबूत केली आहे.
यावेळी मांदाड उपसरपंच सिद्धी भात्रे व सदस्य कविता नाडकर यांच्यासह तारस्तेचे जवळपास पाचशे ग्रामस्थ तसेच खांबवली येथील दोनशे ग्रामस्थांनी आ. भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी आ. गोगावले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की दोन्ही गावांना विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या देखील अडीअडचणीच्या वेळी माझ्यासह माझे कार्यकर्ते कायम पाठीशी उभे राहतील, असे आश्वासन दिले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, तालुका प्रमुख प्रदूम ठसाळ, शहरप्रमुख राकेश वडके, संपर्क प्रमुख चेतन चव्हाण, शिवसेनेचे सर्व नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.