श्री स्वामींचा निकटतम सहवास होता. बावडेकर स्वतः चांगले विद्वान व पट्टीचे प्रवचनकार होते. श्री स्वामी समर्थ हे साक्षात परमेश्वराचे स्वरूप आहेत, याचा त्यांनी अनुभवही घेतला होता आणि मनोमन तसे मान्यही केले होते. एवढे सर्व असूनही जेव्हा शृंगेरी मठाच्या शास्त्रांचे श्री स्वामींविषयीचे उद्गार पुराणिकाने निमूटपणे ऐकून घेतले. त्या शास्त्राशी त्याबाबत कोणताच प्रतिवाद केला नाही अथवा त्यास असे बोलण्यास रोखले नाही. पुराणिक बुवांच्या या विद्वत्तेस काय म्हणावे? कोणत्या स्वरूपाची ही विद्वत्ता म्हणायची? वास्तविक पुराणिकबुवांस श्री स्वामींनी काय दिले नव्हते? तरीही आमच्याजवळ राहाल, तर तुम्हास शास्त्र शिकवू, या त्या शृंगेरी मठातील शास्त्रीबुवांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, त्यांच्याबरोबर जाण्यास तयार झाले. वास्तविक शास्त्री आणि पुराणिकबुवांची अल्पकालीन एकच भेट होती. तरीही पुराणिक डळमळीत आणि अस्थिर झाले. येथे शृंगेरीच्या शास्त्रीबुवांबद्दल तुम्हाला तक्रार करण्यास अथवा त्यास नावे ठेवण्यास खूपच कमी वाव आहे. कारण ते प्रथमतःच श्री स्वामींस पाहत होते. श्री स्वामींस जाणून न घेता अथवा त्यांच्यासंबंधी इतरांकडून माहिती न घेता अगर स्वतः अनुभूती न घेता मत व्यक्त करणे, हे त्यांच्या शास्त्रीयपदास न शोभणारेच आहे. कुठल्याही बाबीचा सर्वांगीण, सारासार विचार करून, अनुभव घेऊन मत बनवणे, हा बोध येथे मिळतो. एखाद्या अडाणी, अशिक्षिताकडून असे मत व्यक्त झाले, तर ते एक वेळ क्षम्य असते. पण शास्त्री तेही शृंगेरी मठाचे? पुराणिकबुवांचे जाण्यास तयार होणे, हे त्यांच्या लौकिकास, श्री स्वामींच्या सहवासात सेवेत राहणाऱ्यास निश्चितच भूषणावह नाही.
समाजात सद्यस्थितीतही शास्त्रींच्या आणि पुराणिकांच्या वृत्तीची माणसे आपणास आढळतात. कधी-कधी तुम्ही आम्हीही तसे वागतो. तर तसे न वागता सारासार विचार करून अनुभव घेऊन मत व्यक्त करावे. निकटचा सहवास सोडून म्हणजे काहीही अनुभव न घेता हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागणे ही सर्वथा मोठी चूक आहे. स्वामी पुराणिकांच्या स्वप्नात आले व म्हणाले, अरे तू शास्त्र शिकण्यास केव्हा जाणार? याबरोबर पुराणिक जागृत होऊन स्वामींना शरण गेले. व स्वामींनी त्यांचे कल्याण केले.
विलास खानोलकर