Thursday, March 20, 2025
Homeदेशकोरोनानंतर विस्तारली विमा बाजारपेठ!

कोरोनानंतर विस्तारली विमा बाजारपेठ!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संकटे आली की माणूस कधी कधी खचून जातो; परंतु कधी कधी संकटेच त्याला मार्ग दाखवतात, वेगळी दिशा दाखवतात. कोरोनाने असेच केले. कोरोनामुळे अनेकांना उपचार शक्य झाले नाहीत. रेमडेसिव्हीरसारख्या इंजेक्शनसाठी तसेच उपचारासाठी कराव्या लागलेल्या खर्चामुळे किती तरी कुटुंबे उद्ध्वस्त झाली. त्यातून लोकांचा आरोग्य विमा काढण्याकडे कल वाढला असून आता भारताची विमा बाजारपेठ जगात सहाव्या क्रमांकाची होणार आहे.

कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला. कोरोनाची लागण झाल्याने उरलीसुरली कमाईही संपली. त्यामुळे अनेकांनी मोठ्या आर्थिक खर्चासाठी तरतूद म्हणून आरोग्य विमा, टर्म विमा घेण्यास सुरुवात केली. कोरोनानंतर भारतीय विमा बाजार मोठ्या प्रमाणात वाढला असून विमा घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ही जागरुकता कायम राहिल्यास आणि विम्याचे दावे झटक्यात सोडवल्यास भारत लवकरच जगातली सहाव्या क्रमांकाची विमा बाजारपेठ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे; परंतु हा टप्पा गाठायला भारताला अजूनही दहा वर्षं लागतील. त्यामुळे विमा क्षेत्रात मोठे बदल घडून येत आहेत. सरकारने विमा एजंटचे कमिशन कमी करण्याचा निर्णय घेतल्याने स्वस्त विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

स्वित्झर्लंडस्थित पुनर्विमा कंपनी ‘स्वीस रे इन्स्टिट्यूट’ने याविषयी भाकीत केले आहे. त्यांनी याविषयीचा अहवालही तयार केला आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या प्रयत्नांमुळे हा बदल घडून येत असल्याचे म्हटले आहे. भारताच्या विमा बाजाराला विस्ताराचे वेध लागले आहेत. भारतातला एकूण विमा प्रीमियम सरासरी १४ टक्के दराने वाढेल. येत्या दहा वर्षांमध्ये भारत ही जगातली सर्वात मोठी विमा बाजारपेठ म्हणून उदयास येईल, असा विश्वास अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

२०२१ मध्ये भारतीय विमा बाजारपेठ जगात दहाव्या स्थानी होती. विमा पॉलिसी घेणाऱ्यांची संख्या पाहता हा आकडा लवकरच वाढेल आणि जागतिक क्रमवारीत भारत सहाव्या स्थानी झेपावेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अहवालानुसार, भारतीय विमा प्रीमियममध्ये यंदा ६.६ टक्के वाढ नोंदवण्यात आली, तर पुढील वर्षी प्रीमियममध्ये ७.१ टक्के दराने वाढ अपेक्षित आहे. हा अंदाजित वाढीचा दर लक्षात घेता, २०२२ मध्ये भारतातला जीवन विमा प्रीमियम शंभर अब्ज डॉलर पार करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

देशात आरोग्य विम्याबद्दल जागरुकता वाढली आहे. रुग्णालयातल्या खर्चाला आळा घालण्यासाठी बचतीला सुरुंग लागू नये, ती सुरक्षित राहण्यासाठी महागड्या उपचारांचा खर्च परस्पर होण्यासाठी विमा काढण्याकडे कल आहे. २०२० मध्ये कोरोनामध्ये रोजगार बुडाल्याने विमा विक्रीत किंचित घट झाली होती; मात्र, २०२१ मध्ये त्यात ५.८ टक्के वाढ झाली आहे. या वर्षी, म्हणजे २०२२ मध्ये महागाईमुळे त्यात ४.५ टक्क्यांपर्यंत घट येण्याचा अंदाज आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -