मला पुसते माऊली,
आले कोणत्या पाऊली…
माझं गौराईचं पाय,
माझा सोन्याचा उंबरा…
आली गौराई अंगणी,
हिला लिंबलोण करा…
अनघा निकम-मगदूम
सगळीकडे आनंद, उत्साह आणि भक्तिभावाचं वातावरण सध्या कोकणामध्ये दिसून येत आहे. गणपती बाप्पाचं जल्लोषात, वाजत गाजत आगमन झाले असून घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत. दोन वर्षांचं कोरोनाचं काळ सावट केव्हाच दूर झाले असून आपले सण उत्सव आपण उत्साहाने साजरे करत आहोत. कोकणातल्या गणेशोत्सवाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होते आणि अनुराधा नक्षत्रावर माहेरवाशीण म्हणून गौरीचेसुद्धा आगमन या कोकणातल्या घरोघरी होतं. या गौरीच्या सणाच्या माध्यमातूनच कोकणानं स्त्रीत्वाचा, शक्तीचा केलेला सन्मान किती मोठा आहे हे मान्य केल्याचं यातून सिद्ध होतं. हिंदू धर्मात गौरी हे शिवाच्या शक्तीचं आणि गणेशाच्या आईचं रूप मानलं जातं. गणेशोत्सवामध्ये कोकणात वेगवेगळ्या पद्धतीने गौरीचा हा उत्सव तीन दिवस उत्साहाने साजरा केला जातो. काही कुटुंबात गौरीचे मुखवटे आणून सजवले जातात. काही ठिकाणी पाणवठ्यावर जाऊन ५, ७ किंवा ११ खडे आणून त्यांची पूजा करतात. तेच गौरी स्वरूप असं मानलं जातं, तर काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून गौरी स्वरूप देऊन तिची पूजा केली जाते. धान्याचे ढीग तयार करून त्यावर मुखवटे लावूनसुद्धा तिचं रूप गौरी असं मानून काही ठिकाणी पूजा केली जाते. हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतोय. घरी येणारी गौरी म्हणजे त्या घरातली लडकी मुलगीच. माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौराईला नवी साडी, दागिने यांनी सजवले जाते. दुसऱ्या दिवशी तिच्यासाठी गोडाधोडाचा किंवा तिखटाचा बेत करून नैवेद्य दाखवला जातो आणि मग तिसऱ्या दिवशी गणपती बाप्पा बरोबरच या गणपती गौरीची पाठवणी केली जाईल.
कोकणात मुलींना किती जपलं जातं, कौतुक केलं जातं, सांभाळलं जातं याचं प्रतिबिंब या उत्सवात दिसून येतंच. कोकणामध्ये स्त्रियांना खूप सन्मान दिला जातो, याची अनेक उदाहरणे आहेत. एकीकडे अनेक ठिकाणी स्त्री भ्रूणहत्येचं पाप राजरोस घडत असताना मात्र कोकणात तीच्या जन्माचं स्वागत जल्लोषात होतं. ‘पहिली बेटी, धनाची पेटी…’ असे मानणाऱ्या या कोकणात म्हणूनच लोकसंख्येत आणि त्यामुळेच मतदार संख्येतसुद्धा स्त्री-पुरुषांपेक्षा जास्त आहेत.
चूल आणि मूल या मानसिकतेच्या जवळपाही न फिरकणाऱ्या कोकणात मुलींना त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, विकासासाठी संपूर्ण संधी दिली जाते. म्हणूनच संपूर्ण राज्यात कोकण बोर्ड दहावी, बारावीमध्ये अव्वल ठरते. त्यात सुरुवातीची नावे अनेकदा विद्यार्थिनींचीच असतात. इथे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य त्यांना दिले जाते. राजकारणामध्ये समाजकारणामध्ये किंवा विविध क्षेत्रांमध्ये कोकणातल्या स्त्रीने आपले नाव मोठे केले आहेच. पण स्वतःचं घर सांभाळणाऱ्या महिलांनीही पती कामानिमित्त बाहेरगावी गेल्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. घरकामपासून शेतीपर्यंत स्त्रिया सर्वत्र दिसून येतात. मतदार म्हणून आपला नेता निवडण्याचं स्वातंत्र्य तिला आहे.
राज्य सरकारने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं जोरदार समर्थन केलं. केवळ इथपर्यंत न थांबता गावोगावी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेऊन हा ठराव एकमताने मंजूर करून घेतला आहे. यात कोकण अव्वल आहे.
रत्नागिरीमधील स्त्रियांबद्दल बोलताना भाजपच्या दिवंगत आमदार कुसुमताई अभ्यंकर यांच्यापासून देशाच्या लोकसभा अध्यक्ष राहिलेल्या सुमित्राताई महाजन याही याचं कोकणातल्या. आयुष्यातल्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत स्त्रीनं इथं खूप मोठं काम केलंय. आज कोकण बांधलेला आहे.
कोकण आणि कोकणीपण टिकवून ठेवण्यामध्येसुद्धा महिलांचा मोठा सहभाग आहे. कारण एखादी स्त्री जरी घरामध्ये राहणारी असली तरी तिचा परिसर, घर फुलांनी, झाडांनी माडांनी बहरून टाकते. तिचं शोभिवंत पारसदार हे तिच्या आवडीचा, विरंगुळ्याचा भाग असला तरीही त्यातूनच पर्यावरण संवर्धन होत राहतं. म्हणूनच कोकणाचा हा निसर्ग आजही तितकाच देखणेपणाने टिकलेला आहे. त्यामध्येसुद्धा सर्वाधिक योगदान हे इथल्या स्त्रीचं आहे. ती झाड तोडत नाही, तर ती झाड रुजवते वाढवते. त्यांना मोठं करते. आपल्या मुलांप्रमाणे सांभाळते. भविष्याचा विचार करते. आपल्या नवऱ्याच्या मागे खंबीर उभी राहते. स्वतःची मतं मांडते. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी पुढे येते. ती शक्ती आहे आणि तिच्यातील या शक्तित्वाचा सन्मान गणेशोत्सवात साजऱ्या होणाऱ्या गौरी सणाच्या निमित्ताने होत असतो.