Sunday, July 21, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यदही आरोग्यवर्धकच; पण कोणते?

दही आरोग्यवर्धकच; पण कोणते?

रंजना मंत्री

समतोल आहारात जीवनसत्त्वे, प्रथिने, कार्बोदके इत्यादींचा समावेश असावा लागतो. त्यासाठी आपण निरनिराळे पदार्थ आपल्या जेवणातून घेत असतो. दही हा त्यापैकीच एक महत्त्वाचा पदार्थ. उत्तम दही लावणे यात मोठे कौशल्य असते; परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याचदा विकतचे दही आणावे लागते. कन्झ्युमर चॉइस या ग्राहक संघटनेतर्फे, ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवर, ११ प्लेन दही व २ प्रोबायोटिक दह्याच्या ब्रॅण्ड्सची नोंदवलेली ही माहिती वाचकहो, तुमच्यासाठी.

आनंद थिक ॲण्ड टेस्टी, पारस, ब्रिटानिया डेली फ्रेश, अमूल मस्ती, पतंजली, व्हिटा, नोवा, नेस्ले a+नरिश, मदर डेअरी क्लासिक, मधुसूदन हे प्लेन दह्याचे ब्रॅण्ड्स व प्रोबायोटिक दह्यापैकी नेस्ले a+ॲक्टिप्लस, मदर डेअरी ॲडव्हान्स असे एकंदर हे १३ ब्रॅण्ड्स आहेत. दिल्ली येथील NABL या प्रयोगशाळेतून FSSAच्या मानांकनाप्रमाणे केलेल्या परीक्षणातून ही माहिती नोंदवण्यात आली आहे.

दह्याच्या दर्जाचे परीक्षण करताना मानांकनानुसार अनेक परीक्षा घेतल्या गेल्या. दुधातील फॅट, SNF, प्रोटीन, कॅल्शिअम, फॉस्फरस, ॲसिडिटी, कॉलेस्टरॉल, सॅचुरेटेड फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, व्हे, फॉस्फेटस ॲक्टिव्हिटी आणि सेन्सरी टेस्ट तसेच यात जड धातू किंवा घातक विषाणूंच्या अस्तित्वाचीही तपासणी झाली. परीक्षण केलेले सगळे प्लेन दह्याचे ११ ब्रॅण्ड्स टोन्ड दुधापासून, तर प्रोबायोटिक दह्याचे २ ब्रॅण्ड्स डबल टोन्ड दुधापासून बनवले गेले आहेत. फक्त पतंजली दही गायीच्या दुधापासून बनवले गेले आहे.

गुणात्मक परीक्षणात मधुसूदन, पतंजली, नोवा या ब्रॅण्ड्स व्यतिरिक्त बाकीचे ब्रॅण्ड्स समाधानकारक असल्याचे आढळून आले. नोवा व मधुसूदन ब्रॅण्ड्समध्ये मिल्क फॅटचे प्रमाण आवश्यकतेनुसार आढळून आले नाही. मिल्क फॅटचे प्रमाण ब्रिटानिया ब्रॅण्डमध्ये सर्वात जास्त, त्या खालोखाल आनंद, अमूल मस्ती, नेस्ले a+नरिशमध्ये आढळून आले. एसएनएफ चे प्रमाण सर्वात जास्त पारस १२.५०%, पतंजली ११.२%, आनंद ११.१%, तर प्रोबायोटिक दह्यापैकी नेस्ले a+ॲक्टिप्लस ११.९०% असे आढळून आले. प्रोटीनचे प्रमाण पारस ४.९%, पतंजली ४.८%, आनंद ४.६%. सॅचुरेटेड फॅट्सचे प्रमाण आरोग्याच्या दृष्टीने कमीत-कमी असणे आवश्यक आहे. मदरडेअरी ब्रॅण्ड मध्ये १.२% तर नेस्ले मध्ये १.३%आढळले. कोलेस्टेरॉलचे प्रमाण गोवर्धनमध्ये सर्वात जास्त ८.५% व आनंदमध्ये ६.४% नोवा ६.२% व मधुसूदन ५.६% या प्रमाणात आढळून आले.

सेन्सरी टेस्टमध्ये गोवर्धन, ब्रिटानिया अपेक्षेप्रमाणे, तर प्रोबायोटिक ब्रॅण्ड पैकी मदर डेअरी नेस्लेपेक्षा चांगले निघाले. मधुसूदन ब्रॅण्डमध्ये शिसे या धातूचे प्रमाण घातक पातळी ओलांडणारे आढळून आले. ते सुरक्षित नव्हते. बाकीचे ब्रॅण्ड्स जिवाणू/विषाणू परीक्षणात सुरक्षित आढळून आले. दुधामध्ये मित्र जिवाणूंची समप्रमाणात वाढ होते व दुधाचे दह्यात रूपांतर होते. मानांकनाप्रमाणे दह्यामधील स्निग्धांश हे त्यासाठी वापरलेल्या दुधातल्या स्निग्धांशाइतके असणे आवश्यक आहे.

मिल्क फॅट प्लेन दह्यापैकी नोवा, पतंजली या ब्रॅण्ड्समध्ये आवश्यक प्रमाणात आढळले नाही. ब्रिटानियामध्ये ३.२%, आनंद, अमूल मस्ती, नेस्ले a+नरिशमध्ये ३% आढळून आले. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ न्यूट्रिशनच्या (हैदराबाद) डायटरी मार्गदर्शक तत्त्वानुसार भारतातील तरुण व किशोरवयीन मुलांच्या वाढीसाठी लागणारी ऊर्जा समतोल आहारातील फॅटमधून दिवसाला ३० ते ५० ग्रॅ. मिळणे गरजेचे असते. म्हणून मानांकनामध्ये हे प्रमाण दर्शवले गेले आहे.

एसएनएफ – हा दुधातील महत्त्वाचा घटक असतो. दुधातील प्रोटीन, लॅक्टोज, विटॅमिन्स व मिनरल्स एकत्र मिळून म्हणजे एसएनएफ म्हणजेच सॉलिड नॉन फॅट होय. याचे प्रमाण टोन्ड मिल्कसाठी ८.५%, तर डबल टोन्ड मिल्कसाठी ९% असावे लागते. गायीच्या दुधापासून बनलेल्या पतंजली दह्यात हे प्रमाण ११.२%, पारस १२.५%, आनंद ११.१%, तर प्रोबायोटिक नेस्ले ॲक्टिप्लसमध्ये ११.९% आढळून आले.

कॅल्शिअम – प्रत्येकी १०० ग्रॅममध्ये मधुसूदन ब्रॅण्डमध्ये १९१.८ मि. ग्रॅ., तर ब्रिटानियामध्ये १२०.१ मि. ग्रॅ. फस्फरस – प्रत्येकी १०० ग्रॅममध्ये मधुसूदनमध्ये १२७.३ मि.ग्रॅ., आनंदमध्ये ११२.६ मि.ग्रॅ. इतके आढळले, तर नेस्ले a+नरिशमध्ये ७६.५ मि. ग्रॅ. इतके कमी आढळले.

कॉलेस्टेरॉल – प्लेन दह्यापैकी नोवामध्ये कमी, तर गोवर्धनमध्ये सर्वात जास्त आढळले. कार्बोहाड्रेटसची गरज आरोग्यच्या सुदृढतेसाठी आवश्यक असते. लेक्टोजमधून ते मिळू शकतात. परीक्षण केलेल्या ब्रॅण्ड्समधून ४.६% ते ६.५% पर्यंत काब्रोहायड्रेट्स आढळले.

लॅक्टिक ॲसिड – म्हणजे दह्याची एकंदर ॲसिडिटी ०.६% ते०.८% पर्यंत हवी. हे प्रमाण जास्त असेल, तर दह्याची चव बदलते, जी अपेक्षित नसते. साठवण्याची जागा व तपमान योग्य नसेल, तर दुधातील लॅक्टोजवर प्रक्रिया होताना जीवाणूंची वाढ प्रमाणाबाहेर होते व दह्यातली ॲसिडिटी वाढते. पतंजली, गोवर्धन, विटा, पारस, अमूल मस्ती व प्रोबायोटिकमध्ये मदर डेअरी यात हे प्रमाण आवश्यकतेनुसार आढळले. व्हे (whey) म्हणजे दह्यातील पाणी. पॅकबंद ब्रॅण्ड्सच्या दह्यात हे पाणी कमी असणे आवश्यक असते. पतंजली, नोवा, ब्रिटानिया, मधुसूदन, अमूल मस्ती यामध्ये हे प्रमाण ०.१ मी.ली.पेक्षा कमी, तर पारसमध्ये ११.२ मी.ली. आढळून आले.

फोस्फेट्स ॲक्टिव्हिटी – दही बनवताना दूध शुद्ध करण्यासाठी पाश्चराइज करून घ्यावे लागते. फॉस्फेट्स परीक्षण करून सगळ्या ब्रॅण्ड्ससाठी वापरलेलं दूध पाश्चराइज केलं आहे हे सिद्ध झालं.

सगळे ब्रॅण्ड्स आर्सेनिक, लेड, मर्क्युरी या घातक घटकापासून सुरक्षित असल्याचे आढळले. दही बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान स्वच्छतेचा अभाव असला, तर त्यात साल्मोनेला व लिस्टेरिया या घातक विषाणूंची वाढ होण्याची शक्यता असते. परीक्षणातून सगळेच ब्रॅण्ड्स यापासून सुरक्षित असल्याचे आढळून आले.

प्रोबायोटिक ब्रॅण्ड्समध्ये विरजणासाठी वापरलेले बॅक्टेरिया/मित्र जंतू लॅक्टोबॅसिलस आणि बायफिडो बॅक्टेरिया जास्त आरोग्यदायी असल्याचा दावा परीक्षणांती खरा ठरला. सर्व ब्रॅण्ड्सच्या परीक्षणातून प्लेन दह्यामध्ये आनंद ब्रॅण्ड, प्रोबायोटिक दह्यामध्ये मदर डेअरी ॲडव्हन्स, तर किमतीच्या दृष्टीने अमूल मस्तीला गुणात्मक दर्जा मिळाला. प्लेन दह्यापैकी वरील सगळ्याच ब्रॅण्ड्सना उत्तम दर्जा व चार स्टार देण्यात आले आहेत; परंतु मधुसूदन या ब्रॅण्डला परीक्षणातून योग्य न उतरल्यामुळे दर्जा देण्यात आला नाही. प्रोबायोटिकमध्ये मदर डेअरी ॲडव्हान्सला अतिउत्तम व पाच स्टार, तर नेस्लेa+ॲक्टिप्लस ब्रॅण्डला उत्तम दर्जा देण्यात आला आहे.

ग्राहक जसा सजग हवा, तसा तो सुदृढही हवा. ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवरून मिळालेल्या या माहितीतून हे दोन्ही हेतू साधले जातील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -