कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे गणेशोत्सव साजरा करणे गणेशभक्तांना शक्य झाले नव्हते. सार्वजनिकच नाही, तर घरगुती गणेशोत्सव साजरा करताना भाविकांना मर्यादा पडल्या होत्या. गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यत सर्वत्रच कोरोना महामारीचा प्रभाव दिसून आला. कोठे डीजेचा जोश नाही, लाऊडस्पीकरवरील गाण्यांचा उत्साह नाही, गणरायांचे आगमन व विसर्जन सर्वत्र शांततेतच झाले. ठिकठिकाणी कृत्रिम तलावातच गणेश विसर्जन करण्यात आले. त्यामुळे गणराय आले कधी आणि गेले कधी हे कोणाला समजले नाही. माणसांची गर्दी नाही. आरतीचा आवाज नाही, मंडपात गणराय आणि चार-दोन भाविकांचा अपवाद वगळता सर्वत्र शांतताच असायची; परंतु कोरोना आता नियत्रंणात आलेला आहे. लसीकरणामुळे तसेच बुस्टर डोसमुळे कोरोनाचा नियत्रंणात आलेला उद्रेक यामुळे यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा होत आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी देशातून कोरोनाचे पूर्णपणे उच्चाटन झालेले नाही. राज्य सरकारने यंदा दहीहंडी व गणेशोत्सव निर्बंधमुक्त जाहीर केल्याने महाराष्ट्रीयन जनतेमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. राज्य सरकारने निर्बंध काही दिवसांपूर्वीच हटविल्याने गणेशोत्सव घरगुती व सार्वजनिक साजरा करण्यासाठी भाविकांना वेळ मिळाला आणि हा मिळालेला वेळ गणेशभक्तांनी सत्कारणी लावला.
कितीही मंदीचे सावट असले आणि संकटांचा तणाव असला, तरी धार्मिक बाब व देवांचा उत्सव असल्यावर भारतीय सण-उत्सव साजरा करण्यासाठी कधीही हात आखडता घेत नाही. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये तेच पाहावयास मिळत आहे. गणेशोत्सवामुळे अर्थकारणातही कमालीची उलाढाल आहे. ही उलाढाल शेकडो-हजारोंच्या नाही, तर करोडोंच्या घरात आहे. यामुळे केवळ अर्थकारणालाच गती मिळाली नाही, तर अनेक बेरोजगारांना हंगामी बेरोजगारही मिळालेला आहे. साध्या मंडपवाल्यापासून रोषणाईपर्यंत सर्वत्रच वर्दळ वाढली आहे. गणेशोत्सवावर महागाईचे सावट दिसत असले तरी सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सवावर नजर टाकल्यास कोठेही भक्तांच्या उत्साहावर महागाईचा प्रभाव दिसत नाही. अगदी किराणा मालाच्या दुकानापासून ते स्पीकर विक्रीची दुकाने, फुलांच्या माळापासून मोदक-लाडूची विक्री करणाऱ्या मिष्ठान्न विक्रीच्या दुकानांपर्यत सर्वत्रच गर्दी पाहावयास मिळत आहे.
दोन वर्षांनी आलेला गणेशोत्सव, भाविकांचा जल्लोष आणि तोंडावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याचा मिलाफ साधताना निवडणूक लढवू पाहणाऱ्या घटकांनी स्वत:ची छायाचित्रे व कार्यअहवाल असलेली आरती संग्रहाची पुस्तके घराघरात वितरीत केली आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये भेटीदाखल आरतीसंग्रहाची पुस्तके दिली आहेत. याशिवाय दहावी-बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा त्या-त्या सोसायटी आवारातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात जाहीरपणे सत्कार करताना आगामी निवडणुकीसाठी आपली मोर्चेबांधणी करण्यात राजकारणी मंडळी व्यस्त झाले आहेत. गणरायाला फळांची व फुलांची आरास करावी लागत असल्याने स्थानिक बाजारामध्ये फळे व फुले महागली आहे.
केळी, संत्री, सफरचंदे, चिकू, पेरू या फळांना विशेष मागणी आहे. रस्त्यावर, नाक्यावर असणाऱ्या केळीच्या हातगाडीवरील केळींची हातोहात विक्री होत असून दिवसातून किमान तीन ते चार वेळा वखारीत जाऊन विक्रीसाठी केळी आणावी लागत असल्याने केळी विक्रेत्यांच्याही चेहऱ्यावर आनंद पाहावयास मिळत आहे. मिठाई विक्रेत्यांच्या दुकानांमध्येही वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकाच्या जोडीला बुंदीचे व मोतीचूरचे लाडू, काजू कतली, पेढे यांच्याही विक्रीत वाढ झाली आहे. रेल्वेमध्येही गर्दी वाढीस लागली आहे. रेल्वेच्या डब्याडब्यांमध्ये ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ’च्या घोषणा कानावर पडू लागल्या आहेत. गणेशोत्सव मंडळांच्या रोषणाईने रस्त्यांची शोभा वाढीस लागली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव पाहण्यासाठी अखेरच्या दिवसांमध्ये गर्दी वाढत असते. गणरायाचे नीट दर्शनही घेता येत नाही, हा मागील अनुभव पाहता आपल्या आवडीचे सार्वजनिक गणेशोत्सवातील गणेशाचे दर्शन घेण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच भाविक घराबाहेर पडले आहेत. एरवी घराबाहेर कधीही न पडणारी व सोसायटीच्या आवारात फारसे न फिरकणारी माणसे सोसायटी आवारातील सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये उत्साहाने सहभागी होऊ लागली आहे. कोरोनानंतर रिक्षा-टॅक्सीच्या व्यवसायावर झालेला प्रतिकूल परिणाम अजूनही कायम होता.
गणेशदर्शनासाठी माणसे घराबाहेर पडू लागल्याने रिक्षा-टॅक्सीच्या व्यवसायात वाढ झाली आहे. एरवी सोसायटी आवारात काही वादामुळे एकमेकांची तोंडेही न पाहणारी मंडळी सोसायटीच्या सार्वजनिक गणेशोत्सवात आरती करताना ‘पंढरपुरी आहे माझा मायबाप’ म्हणताना एकमेकांना सूर आळवित उंच ताण देताना एकमेकांना साथ देताना पाहावयास मिळत आहे. गणेशोत्सवामुळे वातावरणात बदल झाला असून सर्वत्र मांगल्याचा उत्साह व भक्तीचा महापूर निर्माण झाल्याचे दिसत आहे. महापालिका प्रशासनाने ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मदतीने आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे. या आरोग्य शिबिरांमध्ये साथीच्या आजारांवर तसेच अन्य नवनवीन आजारांविषयी व करावयाच्या उपाययोजनांविषयी मार्गदर्शन केले जात आहे. गणेशोत्सवाच्या आयोजनात अधिकाधिक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक बांधिलकी जोपासताना रक्तदान शिबिरांचेही आयोजन केल्यामुळे रक्ताचीही उपलब्धता होण्यास त्यामुळे मदतच होणार आहे.
सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष असल्याने एक वेगळेच भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. मंडपामध्ये अर्धा ते पाऊण तास आरत्या होत आहे. सुखकर्तापासून निर्माण झालेला सूर-ताल शेवटचे उंदीर मामा की जय म्हणताना काही प्रमाणात चढ-उतार असला तरी उत्साह मात्र तोच कायम आहे. आरत्या म्हणताना भक्तांमध्ये थकवा येत नाही. कोठे आवाज कमी झाल्यास विठोबा माऊलीची आरती म्हणताना ‘निढळावरी कर’ म्हणताना सर्वच गणेशभक्त बेंबीच्या देठापासून आवाज चढविताना पहावयास मिळतात. प्रत्येकाच्या घरात अडचणी आहेत, परंतु विघ्नहर्त्यांच्या आगमनामुळे प्रत्येकालाच आपल्या अडचणींचा, दु:खाचा विसर पडला आहे. गजानना, गणराया तूच विघ्नहर्ता असल्याने भाविकांच्या जीवनी सुख कायम राहू दे!