सुकृत खांडेकर
एकशे चाळीस वर्षांच्या ऐतिहासिक काँग्रेसची वाटचाल अंताकडे सुरू झाली आहे का?, अशी चर्चा सुरू होणे हेसुद्धा या पक्षाचे दुर्दैव म्हणावे लागेल. ज्या पक्षाने देशावर व अनेक राज्यांवर साठ दशकांहून अधिक काळ सत्ता उपभोगली, ज्याने देशाला सर्वाधिक पंतप्रधान दिले, त्या पक्षावर गेल्या काही वर्षांत संकुचित होण्याची पाळी आली आहे. मोदी-शहांच्या झंझावातापुढे आणि सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या फाजील महत्त्वाकांक्षेमुळे पक्षाची वेगाने घसरण चालू आहे. पक्षात एकावन्न वर्षे काढलेल्या संघटनेच्या जबाबदार पदांवर व केंद्रीय मंत्री म्हणून वर्षांनुवर्षे काम केलेल्या गुलाम नबी आझाद यांना पक्षाचा राजीनामा देण्याची पाळी आली, ही शोकांतिका आहे. काँग्रेस पक्ष नैराश्य, अस्वस्थता आणि पराजयाच्या गर्तेत सापडला आहे. पराभव हा काँग्रेसला नवीन नाही. पण गांधी परिवाराला पक्षाचे सर्वोच्च स्थान सोडवत नाही हेच मोठे दुखणे आहे. १९५७ मध्ये काँग्रेसला पराभवाचा पहिला झटका बसला होता. ईएमएस नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली डाव्या पक्षांनी केरळच्या निवडणुकीत काँग्रेसला दणका दिला होता. त्यानंतर वेगवेगळ्या प्रांतात काँग्रेसचा अनेकदा पराभव झाला. पण काँग्रेसला नैराश्याने कधी घेरले नव्हते. मोदी-शहांचा भारताच्या राजकीय क्षितिजावर उदय झाल्यापासून काँग्रेसच्या जुन्या वाड्याची पडझड वेगाने सुरू झाली.
गुलाम नबी हे सार्वजनिक जीवनात ‘आझाद’ झाले. काश्मिरी नेता आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्याचा परिणाम केवळ जम्मू-काश्मीरपुरता मर्यादीत राहिलेला नाही, तर पक्षातील अन्य नेते व कार्यकर्ते यांचे मनोबल खचले आहे. ७३ वर्षांच्या आझाद यांना सुगीच्या काळात पक्षाने भरघोस काही दिले. इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव, डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये ते अनेक वर्षे केंद्रीय मंत्री होते. ३७ वर्षे पक्षाचे सरचिटणीस होते. २ वर्षे काश्मीरमध्ये युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. राज्यसभेत ७ वर्षे विरोधी पक्षनेतेपदी होते. राज्यसभेतील त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना पक्षाने अडगळीत टाकले.
आझाद हा पक्षाचा उत्साही नेता होता. सदैव सक्रिय असणारा व पक्षाला ऊर्जा देणारा स्त्रोत होता. पण राहुल गांधींच्या टीममध्ये त्यांना स्थान मिळाले नाही. सोनिया गांधींनी त्यांची बूज राखली नाही. पक्षात बदल व्हावेत, संघटनात्मक निवडणुका होऊन पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा, यासाठी पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांना बरोबर घेऊन त्यांनी नाराजीचा आवाज उठवला. पण जी-२३ गट म्हणून पक्षात लढाई चालू ठेवण्याऐवजी तेच निघून गेले. कपिल सिब्बल, जितिन प्रसाद, योगानंद शास्त्री यांच्यानंतर जी-२३ गटातील काँग्रेसमधून बाहेर पडणारे आझाद हे चौथे नेते आहेत.
आझाद यांना पक्षाने काय दिले नाही, त्यांना सर्व पदे व मंत्रीपदे वर्षांनुवर्षे मिळाली, नवीन नेते आले की, ज्येष्ठांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत जायला हवे, असे काँग्रेसमधील शिल्लक नेते व प्रवक्ते बोलत आहेत. राजीव गांधींच्या हाती सत्ता आल्यावरही अनेक काँग्रेस नेत्यांनी पक्षात खदखद व्यक्त केली होती. विद्याचरण व श्यामाचरण शुक्लही त्यात होते. विरोधी मोहीम चालविणाऱ्या अनेकांना राजीव गांधींनी बाहेरचा रस्ता दाखवला होता. पण पक्षाबाहेर गेल्यावर पक्षनेतृत्वावर कोणी आगपाखड चालू ठेवली नव्हती. ज्यांनी गेल्या काही वर्षांत काँग्रेस पक्ष सोडला, त्यांच्यापैकी कोणीही थेट राहुल गांधी यांच्यावर टीका केली नव्हती. पण राहुलवर हल्लाबोल करून पक्ष सोडणारे गुलाम नबी आझाद हे पहिलेच नेते असावेत. काँग्रेस पक्षाच्या बर्बादीला राहुलच जबाबदार आहेत, असे त्यांनी सोनिया गांधी यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. यापुढे जो काँग्रेस पक्षातून बाहेर पडेल, तो राहुल यांच्यावर टीका करूनच बाहेर पडू लागेल.
दुसरीकडे, ज्यांना आपली गांधी परिवारावरील निष्ठा दाखवून द्यावयची आहे, ते गुलाब नबी आझादांवर गद्दार म्हणून चिखलफेक करायला सुरुवात करतील. आपण आझादांना शिव्या घालू, तेवढे आपण राहुल गांधींच्या निकट जाऊ, असे चित्रही आता बघायला मिळेल. जानेवारी २०२१ मध्ये आझाद राज्यसभेतून निवृत्त झाले, तेव्हा त्यांच्या संसदीय कार्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. २००७ मध्ये आझाद हे काश्मीरचे मुख्यमंत्री होते, मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा काश्मीरमधे मोठा दहशतवाद होता. गुजरातचे नागरिक तिकडे अडकले होते. मोदी व आझाद एकमेकांशी सतत संवाद साधून होते. आझाद यांनाही त्यावेळी बोलताना हुंदके आवरत नव्हते व ते सांगताना मोदींचे डोळेही पाणावले, हे दृश्य सर्व देशाने टीव्हीवर बघितले. गुजरातच्या लोकांची सुखरूप सुटका करण्यासाठी मोदी, आझाद व प्रणव मुखर्जी सतत एकमेकांच्या संपर्कात होते. ‘माझे खरे मित्र’ असा मोदींनी आझाद यांचा उल्लेख केला. तुम्ही जरी उद्यापासून सदनाचे सदस्य नसलात, तरी माझा दरवाजा आपल्याला सदैव खुला आहे, असे मोदींनी म्हटले. नंतर मोदी सरकारने आझाद यांना पद्म पुरस्कार देऊन त्यांचा सन्मानही केला. मोदींनी केलेली प्रशंसा काँग्रेसला आवडली नसावी. म्हणूनच आझाद हे मोदींच्या जवळ गेलेत, असे काँग्रेसचे दहा जनपथचे निष्ठावान सांगत आहेत. त्यांच्या राजीनाम्यामागे भाजप व मोदी आहेत, असा प्रचार काँग्रेसने सुरू केलाय.
आझाद यांनी सोनियांना पाच पानी राजीनामापत्र पाठवले. राहुल गांधी यांना पक्षाचे उपाध्यक्ष नेमल्यापासून चर्चा, संवाद, सल्लामसलत अशी कार्यपद्धती बंद झाली आहे. वरिष्ठ नेत्यांना बाजूला सारले आहे. राहुल हे अपरिपक्व, मनमानी काम करणारे आणि विक्षिप्त स्वभावाचे आहेत. ज्यांना संघटनेचा अनुभव नाही व जे चापलुसी करण्यात रस दाखवतात, त्यांचे महत्त्व वाढले आहे. सोनिया या अध्यक्षपदावर असल्या तरी सर्व निर्णय राहुल घेतात, एवढेच नव्हे तर त्यांचे सुरक्षारक्षक व पीए निर्णय घेत असतात, अशी स्पष्ट मते त्यांनी मांडली आहेत. इंदिरा गांधी, संजय गांधी, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या काळातील पक्षातील अनेक घटनांचा त्यांनी आपल्या राजीनामापत्रात उल्लेख केला आहे. राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग सरकारने काढलेला अध्यादेश दिल्लीत पत्रकारांसमोर टराटरा फाडला, ही सर्वात गंभीर बाब होती.
काँग्रेसच्या कोअर गटाने त्याचा मसुदा मान्य केला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाने व राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली होती. पण राहुल यांच्या वर्तनाने पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्या अधिकारपदावर व प्रतिष्ठेवर घाव घातला, याचीही आझाद यांनी या पत्रात आठवण करून दिली आहे. सोनिया व राहुल यांच्या नेतृत्वाखाली २०१४ व २०१९ या लोकसभा निवडणुका काँग्रेसने लढवल्या, दोन्ही निवडणुकांत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. याच काळात ४९ विधानसभा निवडणुका झाल्या. पण ३९ निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. आता केवळ दोन राज्यांत काँग्रेस सत्तेवर आहे व दोन राज्यांत सत्तेत भागीदार आहे, याचीही त्यांनी आठवण करून दिली आहे.
“आझाद यांनी पक्षात असताना सर्वाधिक सत्तासुख मिळवले, आता पक्षाच्या चुका सांगत सुटले आहेत”, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे. “पक्षात सुधारणा व्हावी म्हणून जी-२३ ची स्थापना झाली, ती पक्षाच्या विरोधात उठाव करण्यासाठी नव्हे”, असे संदीप दीक्षित म्हणतात. “आझाद यांचा राजीनामा ही तर काँग्रेसच्या अंताची सुरुवात” असे पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांनी म्हटले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्व सरमा, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांना काँग्रेसला अलविदा म्हणावे लागले, तीच पाळी आझाद यांच्यावर आली.