Wednesday, April 23, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यआला गणेशोत्सव अन् चाकरमानींची खरेदीसाठी लगबग...

आला गणेशोत्सव अन् चाकरमानींची खरेदीसाठी लगबग…

रचना लचके बागवे

आज लालबाग परिसर भाविकांच्या गर्दीने व्यापला आहे. गणपतीला गावाकडे जाण्यासाठी किंवा घरी गणपतीच्या आगमनाच्या तयारीकरिता खरेदीसाठी चाकरमानी गिरणगावात फिरतो आहे. सगळीकडे नुसता जल्लोष आहे. मोठमोठ्या गणपती मंडळांचे कार्यकर्ते लॉऱ्या – ट्रक घेऊन, ढोल ताशांच्या गजरात आपल्या बाप्पाला न्यायला आले आहेत. त्यांना बघायला आणि social media reels बनवण्यासाठी आणि हा सर्व उत्साह आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी दूरदूरहून कलाकार मंडळी आली आहेत. तसेच घरातील मंडळी काही ना काही खरेदीसाठी बाहेर पडली आहेत. लालबागच्या मार्केटमध्ये मिळणारे मसाले, चिवडा गल्लीतले चिवडा – लाडू – वेफर्स, तेथील छोट्या छोट्या दुकानांमध्ये मिळणारे विविध प्रकारची तोरणं, दिवे, पूजेचे सामान, गणपतीला सजवण्यासाठीची आभूषणे, मुकुट, माळा त्याचसोबत घरातील गृहिणींसाठीचे दागिने – टिकल्या, कपडे आणि सजावटीचे सामान, भांडी इत्यादी वस्तू खरेदीसाठी गर्दी झाली आहे.

लालबागसारखेच सर्वच बाजार ओसंडून वाहत आहेत. गरिबातला गरीब व्यक्तीदेखील या उत्सवांसाठी काही ना काही पैसे जमवून, या दरम्यान आपल्या कुटुंबासाठी आणि बाप्पासाठी गोष्टी विकत घेतो आहे. या काळात अनेक लोकांचे उद्योग-धंदे उभे राहतात. अगदी छोट – छोट्या उद्योगांपासून ते अगदी मोठे व्यापारी ह्या उत्सवाच्या आर्थिक चक्रात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी काम करतात. फक्त गणपतीचे १०-१५ दिवस व्यवसाय करणारे, भाविकांना पाणी – वडापाव, चिंच – कैरी, खेळणी विकणारे ते मोठंमोठाली होर्डिंग्ज लावून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या लोकांना आपल्या होर्डिंग्जवरील जाहिरातीच्या माध्यमातून गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देणे आणि भाविकांना आपल्या जाहिरातींकडे आकर्षित करणे हे सर्व ह्या उत्सवात चालू असते. आपण सरळ साधा विचार केला तर फक्त गणेश उत्सवाच्या दरम्यान कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांना प्रोत्साहन मिळत असेल. गणेशमूर्ती बनवणाऱ्या लोकांना, ते बनवण्यासाठी वापरलेल्या सर्वसामान जसे माती, रंग, कपडा, मंडप उभारणारे लोकं, प्रसादासाठी आणि घरी पाहुणे मंडळींना देण्याकरिता सर्व जेवणाचे सामान, खाऊ, नारळ, पिठं, मसाले, भाज्या, फळं, इतर सर्व धान्य आणि बरेच काही…त्याचबरोबर सजावटीसाठी आरास, लायटिंग, फुलं, मखर, कंठी असं सर्व काही… आता मार्केटिंगच्या जमान्यात विविध प्रकारच्या जाहिराती, होर्डिंग्ज, स्पीकर्स, led screen, news channels वर जाहिराती… किती साऱ्या लोकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळतात. एकूण हे सर्व एका आर्थिक चक्रासारखेच चालू होते. इथे गणेशोत्सव हे एक निमित्त असले, तरीही त्याच्या प्रेमामुळे किंवा हल्ली दिखाव्यामुळे हे एक खूप मोठे आर्थिक चक्र बनले आहे.

श्रावण महिना चालू होताच भारतात अनेक सणांची लगबग चालू होते आणि त्यासोबतच घरातल्या सर्व लोकांची आणि अप्रत्यक्षरीत्या उद्योग व्यवसायाची देखील. गेली दोन वर्षं हे आर्थिक चक्र कुठे तरी विस्कळीत झाले होते, पण या वर्षी ते दुपटीने वाढल्याचे दिसत आहे. काही वर्षांपूर्वी फक्त गणपती विसर्जनाला ढोल-ताशांचा गजर व्हायचा, पण आता एक आठवड्यापूर्वीच गणरायाचे आगमन हा देखील एक सोहळा झाला आहे. आता विविध ठिकाणचे राजे, इच्छापूर्ती, चिंतामणी मंडळ जल्लोषात हा उत्सव साजरे करत आहेत. नागपंचमी, रक्षा बंधन, गोपाळकाला, पोळा, गणपती आणि इतर सर्व. ह्या सर्व उत्सवात खरेदी – विक्रीमुळे आपले आर्थिक चक्र चालू राहते आणि पैसा बाजारात फिरत राहतो. इतर वेळेस लोकांची खरेदी करण्याची क्षमता कमी असते, पण ती या उत्सवांच्या दरम्यान आपसूकच वाढते. हेच आहेत आपले उत्सव आणि उत्सवाचे आर्थिक चक्र. ह्यात सर्व जण आपापली भाकरी शिजवण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्सव परंपरेचा – उत्सव प्रगतीचा. गणेश उत्सवाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेछा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -