Sunday, March 23, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखग्रामायण, नागपूर नरसेवा हीच नारायण सेवा

ग्रामायण, नागपूर नरसेवा हीच नारायण सेवा

शिबानी जोशी

स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण विश्वाला जे विचार आणि तत्त्वज्ञान दिलं ते अमर आहे. त्याचं आचरण आजच्या युगात केलं तर एक सुसंस्कृत, निरोगी, समाधानी समाज नक्कीच घडू शकेल. त्यांची दीडशेवी जयंती २०१२ साली संपूर्ण देशभरात साजरी करण्यात येत होती. स्वामी विवेकानंद यांचे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे. “नरसेवा हीच नारायण सेवा.” हेच वाक्य ब्रीदवाक्य घेऊन नागपूरमधल्या काही कार्यकर्त्या मंडळींनी सामाजिक काम करण्यासाठी सुरुवात केली होती. त्यातूनच ग्रामायण नावाची संस्था स्थापन झाली. या जयंतीनिमित्त संघाने “नरसेवा हीच नारायण सेवा” हा विचार घेऊन देशभरात अनेक उपक्रम राबवायचे ठरवले होते. विदर्भातल्या कामाचे संयोजक म्हणून अनिल सांबरे यांची नेमणूक झाली होती. ही कामं वर्षभर करत असताना हळूहळू सामाजिक कार्य करण्याची गरज वाढत गेली. सामाजिक काम करणारे कार्यकर्ते हळूहळू उभे राहिले आणि मग संस्था रजिस्टर केली, तर ती दीर्घकाळ टिकू शकेल असं लक्षात आल्यावर संस्था पंजीकृत करण्याचं निश्चित झालं आणि “ग्रामायण”चं पंजीकरण २०१८ साली झालं. सुरुवातीपासूनच बहुउद्देशीय, बहुस्तरीय खुलं सेवा व्यासपीठ असं स्वरूप संस्थेनं राखलं आहे. “प”सप्तक ही संस्थेची कार्यपद्धती व कार्यक्षेत्र आहे. हे “प” सप्तक काय तर, प्रबोधन, प्रशिक्षण, प्रदर्शन, प्रकाशन, प्रोत्साहन, प्रसिद्धी आणि प्रकल्प दर्शन ही सात सप्तक संस्थेने अंगीकारली आहेत. सहकार्य, संवर्धन आणि समन्वयाच्या माध्यमातून या सात “प”वर काम केलं जातं. स्वतःच्या कोणत्याही प्रकल्पात अडकून न राहता काम करणे, भारतीय संस्कृती, जीवनमूल्य, पर्यावरण, सेंद्रिय शेती, गोसंवर्धन, कौशल्य विकास करणाऱ्या प्रकल्प लक्षत आले की त्यांच्या गरजेनुसार मदत केली जाते. विशेषकरून महिला, दिव्यांग, आदिवासी, कारागीर, शेतकरी, स्टार्टअप, बचत गट यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी या सात “प”च्या माध्यमातून त्यांना उभे राहण्यासाठी सहकार्य केलं जातं.

संस्थेने पहिल्यापासूनच कुठल्याही एका क्षेत्राशी संलग्न राहायचं नाही, समाजाला किंवा सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना गरज लागेल तशी मदत करायची असं उद्दिष्ट ठेवलं होतं. विदर्भात असे अनेक सामाजिक प्रकल्प आहेत, जे सर्वसामान्यांना माहितही नसतात. त्यांना सहलीच्या माध्यमातून या प्रकल्पाचे दर्शन घडावं म्हणून अशा प्रकल्पांना सहल दर्शन टूर्स सुरू करण्यात आल्या आहेत. टूरमधून वेगवेगळे प्रकल्प अनेक जण पाहू शकतात.समाजात आज अनेक व्यक्ती किंवा संघटना आहेत. ज्यांना सतपात्री दान करायचं असतं. अशा व्यक्तींना हे प्रकल्प पाहून शारीरिक, आर्थिक, सामाजिक कोणत्याही स्वरूपातील मदत द्यायची असेल तर या सहली उपयोगी पडतात.

पण या टूरना एक मर्यादा असते. ४० ते ४५ माणसांच्या वर एका बसमधून लोक घेऊन जाऊ शकत नाहीत, म्हणून मग या सामाजिक संस्थांना नागपूरला बोलावून त्यांच्या कामाची माहिती देण्यासाठी पेठा, प्रदर्शन भरवली जातात. यात अनेक स्वयंसहायता गट, छोट्या संस्था आपली उत्पादन आणून त्याची विक्री करतात. या प्रदर्शनात अनेक संस्था आणि संघटनांचे कार्य नजरेस पडतं, दानशूर व्यक्तींकडून त्यांना आर्थिक सहाय्यही मिळू शकते. ग्रामायण ही संस्था सामाजिक संघटनांना त्यांच्या उपयोगी असलेल्या वस्तू देण्याचेही काम करते. या उपक्रमाला संवेदना असे नाव असून गेल्याच वर्षी पारधी समाजासाठी काम करणाऱ्या काही संस्थांना इन्व्हर्टर, साऊंड सिस्टीम, सायकली असं त्यांच्या गरजेचं सामान पुरवलं होतं. ग्रामायणचं काम सुरू होऊन खरंतर दहा वर्षे झाली आहेत. पण तरीही समाजकार्याची आवड असलेल्या जवळजवळ शंभर ते दीडशे जणांची टीम आज तयार आहे, जे कसली ही अपेक्षा न ठेवता मदतीचा हात देण्यासाठी पुढे येत असतात. अनिल सांबरे, अनुराधा सांबरे, डॉक्टर चंद्रकांत रागीट, मंजूषा रागीट, संजय सराफ, सुरेखा सराफ, श्रीकांत घाडगे यांनी मिळून ग्रामायणची स्थापना केली आणि हे सध्या विश्वस्त पदाधिकारी आहेत. ग्रामायणचे आणखी एक अभिनव संकल्पना आहे. पती-पत्नी दोघांनी मिळून संस्थेत काम करावं आणि त्याप्रमाणे अनेक जण काम करीत आहेत. यंदा मतिमंदांसाठी काम करणाऱ्या संस्थांना मदत करण्याची योजना सुरू केली आहे. ज्या संस्था मतिमंदांसाठी सामाजिक कार्य करत आहेत, अशांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्याशिवाय या कामावर आधारित एक मोठा रिपोर्ट तयार केला जाणार आहे. प्रत्येक संस्थांची माहिती, त्यांचं काम, त्यांच्या गरजा दर्शवणार एक ई-बुक ही प्रकाशित करण्याचा विचार आहे. या ई बुकचा अशा संस्थांना आर्थिक मदत मिळायलाही उपयोग होऊ शकेल.

“टाटा समाज यात्रा” अशी एक यात्रा टाटा उद्योग विद्यार्थ्यांसाठी काढत असत. तो उपक्रम बघितल्यावर अशा प्रकारचा उपक्रम आपण हे राबवावा असं कार्यकर्त्यांना वाटल. ही संकल्पना अशी आहे की, यात देशभरातून मुलं निवडली जातात आणि संपूर्ण देशभरात समाज परिवर्तन करू शकलेल्या महान व्यक्ती आहेत, महान स्थळ आहेत त्यांची भेट घडवली जाते. तशा प्रकारचा उपक्रम छोट्या प्रमाणावर संस्थेने राबवला होता. यंदाही राबवायचा संस्थेचा विचार आहे. विदर्भातल्या विविध कॉलेजमधून परिवर्तन करू शकण्याची इच्छा, क्षमता आहे, अशा ५० मुलांची निवड करून विदर्भातल्या सामाजिक नेते, मोठ्या संस्था, शेती यांची भेट घडवून देण्याचा विचार आहे. असा प्रकल्प अगदी सुरुवातीला २०१२-१३ ला ही केला होता. त्यावेळी शेगावच्या प्रतिष्ठानने संस्थेला आठ दिवसांसाठी विनामूल्य बस उपलब्ध करून दिली होती. त्यातून काही मुलांना विदर्भातल्या अशा ७२ प्रकल्पांची भेट घडवून आणली होती.

कोरोना काळात जवळजवळ २५६ ऑनलाइन कार्यक्रम केले होते. त्यात कृषी गाथा, युवा गाथा, ज्ञान गाथा अशा विषयातील तज्ज्ञ सहभागी होऊन लोकांना या क्षेत्राची माहिती दिली होती. ग्रामायणचं काम अतिशय पारदर्शकपणे चालतं. अनिल सांबरे हे अध्यक्ष असून प्रत्येक प्रकल्पासाठी वेगळी समिती नेमली जाते. ही समिती तो प्रकल्प पूर्णत्वाला जाईपर्यंत असं काम करते. नंतर दुसऱ्या एखाद्या सामाजिक प्रकल्पात हात घातला जातो. या आर्थिक मदतीशिवाय काही विरळा, अभिनव अशी सामाजिक काम संस्थेतर्फे राबवली जातात. आता पाहा, बऱ्याच वेळी आपल्याला अचानक अडचण, समस्या उद्भवते आणि नेमकी कोणाची मदत घ्यायची, संपर्काची गरज असते हे लक्षात येत नाही. ही समस्या लक्षात घेऊन संस्थेने सोशल इन्फॉर्मेशन सेंटरची उभारणी केली आहे. अशा सर्व दैनंदिन गरजेच्या संपर्काची वर्गवारीनुसार माहिती एकत्र करून ऑनलाइन पद्धतीने दिला जाण्याचं काम २०२१ साली सुरू केला आहे, ज्याचा लाभ अनेक जणांनी घेतला आहे.

संस्थेचा एक अभिनव उपक्रम म्हणजे अभिनंदन उपक्रम. संपर्कातील कार्यकर्ते नागरिक यांच्या वाढदिवसाला त्यांना फोन करून शुभेच्छा देण्याचं काम केलं जात. आत्तापर्यंत ५६२ जणांना असे दूरध्वनी करून त्यांचा अभिष्टचिंतन केलं आहे आणि अनेकांनी असा फोन आल्यावर खूप बरं वाटलं असा अभिप्राय ही दिला आहे. त्याशिवाय समाजामध्ये अनेक व्यक्ती संस्था काहीतरी उल्लेखनीय कार्य किंवा विशेष काम करत असतात अशा संपर्क शोधून त्यांनाही दूरध्वनी करून त्यांचा अभिनंदन केलं जातं. केवळ आर्थिक विकास नाही तर मानसिक विकास साधण्यासाठी स्पर्धा, कार्यशाळांचा उपयोग होऊन समाज स्वास्थ्य संतुलित राहिला मदत होत असते.

हे लक्षात घेऊन सीएसआर, समुपदेशन, भूमी सुपोषण, पर्यावरण पूरक गणपती, आकाश कंदील बनवणे अशा विषयावर कार्यशाळा घेऊन कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केलं जात. याशिवाय विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात महिलांसाठी वाळवणीचे पदार्थ आणि उपयुक्त सरबते अशी स्पर्धा घेण्यात आली होती. ज्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला होता. घरगुती पदार्थ तसेच आयुर्वेदाचे महत्त्व ही यावेळी आयुर्वेदिक तज्ज्ञांनी दिलं. याशिवाय टाकाऊपासून टिकाऊ, देशभक्तीपर गीत, पथ नाट्य,पंतप्रधानांना पत्र अशी ही स्पर्धा घेण्यात आली होती. रामायण अक्षय हा जसा अक्षय ग्रंथ आहे तसेच ग्रामायणच काम अक्षय चालू राहावे. तसेच उच्च-नीच, श्रीमंत-गरीब यामधली फळी म्हणून त्यांचं काम सुरू राहिलं पाहिजे, एवढीच सदिच्छा बाळगूया.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -