ठाणे (प्रतिनिधी) : गणपती आल्यावर गौरीचे आगमन होते. यंदाही हे आगमन अवघ्या काही दिवसांवर आलेले आहे. यंदा ओवसाचा मुहूर्त असल्याने ठाण्यात सुपांची मागणी वाढली आहे. सव्वाशे रुपयांना दोन सुपे मिळत आहेत. ठाण्यात जळगाव, भुसावळ, उस्मानाबाद, गडचिरोली येथून आलेले कारागीर दिवस-रात्र सुपे बनवण्यासाठी व्यस्त आहेत.
दर वर्षी ठाण्यात असे कारागीर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून दाखल होत आहेत. गौरी-गणपतीचा सण महाराष्ट्रात अगदी मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या – चौथ्या दिवशी गौरीस्थापना केली जाते.
गौरीला गणपतीच्या आईचे रूप मानले जाते. त्यामुळे शंकर भगवान, पार्वती माता आणि गणपती बाप्पा सहकुटुंब आपल्या घरी आल्याची भावना या प्रथेमागे दडलेली असते. त्यात गौराईला घरातील माहेरवाशिणीचे स्थान दिले जाते. ज्यामुळे तिचा पाहुणाचार त्याप्रमाणेच केला जातो. वाजत-गाजत गौराईला घरी आणले जाते. गौरीला साडी नेसवली जाते.
तिला नटवले जाते. गौरीची स्थापना आणि इतर तयारी घरातील माहेरवाशिणीच्या हातून केली जाते. काहींच्या घरी खड्यांची, तेरड्याची गौर बसवली जाते, तर काहींकडे ज्येष्ठा-कनिष्ठा, महालक्ष्मींची पूजा केली जाते. कोकणातील काही भागात गौरीपूजनामध्ये ‘ओवसा’ ही एक परंपरा दिसून येते.
‘ओवसा’ म्हणजे ओवसणे अथवा ओवाळणे. काही लोक ओवशाल्या ‘ववसा’ असंही म्हणतात. विशेषतः कोकणात रत्नागिरी, रायगडमधील काही प्रांतात ही पद्धत अगदी मोठ्या श्रद्धेने केली जाते. लग्नानंतरच्या ज्या वर्षी गौरी पूर्व नक्षत्रांमध्ये येतात, तेव्हा घरातील नववधूचा पहिला ओवसा करण्याची पद्धत आहे. यंदा ओवसाचा मुहूर्त असल्याने बाजारात सुपे विकण्यासाठी आलेली दिसून येत आहेत.