नोएडा : नोएडातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर आज पाडले जाणार आहेत. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले आहे. हे ट्विन टॉवर पाडण्यासाठी ४६ जणांची टीम काम करत आहे. ही टीम दररोज सुमारे १२ तास स्फोटके लावण्याचे काम करत आहे. विशेष म्हणजे, ३२ मजली टॉवर्स पाडल्यानंतर ३० मीटर उंचीपर्यंत याचा ढिगारा तयार होईल. हे टॉवर्स पाडल्यानंतर परिसरात शेकडो मीटरपर्यंत धूळ पसरेल. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिओ फायबर शीट्स बसवण्यात आल्या आहेत. याशिवाय झाडांच्या सुरक्षेसाठी त्यांना काळ्या पांढऱ्या हिरव्या चादरीनं झाकण्यात आलं आहे. जमीनदोस्त होणारी देशातील ही पहिली उंच इमारत असेल.
खरेदीदारांचा आरोप आहे की, हे टॉवर बनवताना नियम डावलण्यात आले आहेत. सोसायटीतील रहिवासी यूबीएस तेवतिया सांगतात की, टॉवरची उंची जसजशी वाढत जाते, तसतशी दोन टॉवरमधील अंतर वाढत जाते. अग्निशमन अधिकाऱ्यांनी स्वत: सांगितलं की, एमराल्ड कोर्ट ते एपेक्स किंवा सिएना हे किमान अंतर १६ मीटर असावे. पण एमराल्ड कोर्टच्या टॉवरपासून त्याचं अंतर फक्त ९ मीटर होते. या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल नोएडा प्राधिकरणाकडून अग्निशमन अधिकाऱ्यांना कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. उंच टॉवरच्या उंचीवर वारा, सूर्यप्रकाश थांबतो, त्यामुळे दोन टॉवर्समध्ये १६ मीटर अंतर असावे, असा नियम आहे.
दोन टॉवर्समधील अंतर कमी असल्यानं आग पसरण्याचा धोका वाढतो. खरेदीदारांचा आरोप आहे की, टॉवर्सच्या नव्या नकाशात या गोष्टींची दखल घेण्यात आली नव्हती. तेवतिया म्हणतात की बिल्डरने आयआयटी रुरकी येथील सहाय्यक प्राध्यापकाची वैयक्तिक मान्यता घेऊन बांधकाम सुरू केले. तर अशा प्रकल्पात आयआयटीची अधिकृत मान्यता आवश्यक आहे जी येथे पाळली गेली नाही.
सन २०१२ पर्यंत अॅपेक्स आणि सायन टॉवर्स केवळ १३ मजले बांधू शकले, पण जेव्हा हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले तेव्हा बिल्डरने या प्रकल्पाला एवढी गती दिली की, दीड वर्षात आणखी १९ मजले बांधण्यात आले. २०१४ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे काम थांबले. बिल्डरची युक्ती कामी आली नाही. न्यायालय असा कोणताही निर्णय घेऊ नये म्हणून टॉवर्सची उंची वाढवण्यात आली. त्यामुळे काही प्रमाणात नुकसान होऊ शकते, मात्र उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांच्या आणि पर्यावरणाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे स्पष्ट केले. त्याचवेळी दुसऱ्या सुधारित आराखड्यानुसार हे टॉवर केवळ २४ मजल्यापर्यंत बांधले असते तर कदाचित आज ते पाडण्याचा धोका नसता.