मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाचा उत्साह जाणता कोकणात जाण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. बाप्पाच्या स्वागताची आतुरता दिसून येत आहे. दरम्यान गणेशभक्तांनी रेल्वे, खासगी गाड्यांबरोबरच एसटीला खास पसंती दिल्याचे दिसून येत आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सुमारे १.५० लाखांहून अधिक चाकरमानी कोकणात रवाना होणार असल्याची माहिती अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी शुक्रवारी दिली आहे.
गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने सोडलेल्या गणपती स्पेशल जादा गाड्यांना चाकरमान्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुमारे ३ हजार ४१४ गाड्या फुल्ल झाल्या आहेत. यापैकी १ हजार ९५१ गाड्यांना ग्रुप बुकिंगचे प्राधान्य मिळाले आहे. दरम्यान, एसटीच्या जादा गाड्यांमधून कोकणाकडे रवाना होणाऱ्या कोकणवासीयांना चन्ने यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गणेशोत्सव हा कोकणातील महत्वाचा सण म्हणून ओळखला जातो. गणपती व कोकणातील चाकरमान्यांचे एक अतुट नाते बनले आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटानंतर यंदा मोठ्या संख्येने चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणकडे रवाना होत आहेत. गौरी-गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळ दरवर्षी जादा गाड्यांचे नियोजन करते. यंदा महामंडळाने गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच पुणे येथून २५०० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांना सुरुवात झाली असून जादा गाड्यांची माहिती चन्ने यांनी दिली. चाकरमान्यांनी सुरक्षित प्रवास म्हणून एसटीच्या जादा गाड्यांना पसंती दिल्याने ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत तब्बल ३४१४ गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. या गाड्यांमधून सुमारे १.५० लाखांहून अधिक चाकरमानी प्रवास करणार आहेत, असे त्यांनी सांगितले. कोकणातील चाकरमान्यांचे आणि एसटीचे ऋणानुबंध कायम आहेत. ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेल्या लालपरीला सुरक्षित प्रवास म्हणून प्राधान्य दिल्याने चन्ने यांनी चाकरमान्यांचे मनापासून आभार मानले.
दरम्यान, गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या जादा वाहतुकीची सेवा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी महामंडळाने विशेष लक्ष केंद्रीत केले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी फिरती गस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. तसेच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी व सुरक्षित-सुरळीत वाहतुकीसाठी गस्ती पथके विशेष दक्षता घेणार आहेत. याशिवाय कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत.