जनतेच्या अनेक प्रश्नांची तड लावण्यासाठी, त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी, राज्यातील नवनवे विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी, नवे प्रकल्प मंजूर करण्यासाठी, नवे कायदे तयार करण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाची अधिवेशने होत असतात. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी या अधिवेशनात सक्रिय सहभाग घेऊन आपले कर्तव्य इमानेइतबारे बजावत असतात, ही चांगली परंपरा महाराष्ट्रात आहे. सुदृढ आणि परिपक्व लोकशाहीचे हे द्योतक आहे. राज्यात दीड – दोन महिन्यांपूर्वी मोठ्या राजकीय नाट्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारची परीक्षा पाहणारे, खरे तर प्रत्येक अधिवेशन हे तत्कालीन राज्य सरकारचे सत्त्वपरीक्षा पाहणारेच असते हे नक्की. या सर्व पार्श्वभूमीवर सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. हे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार हे आधीच दिसत होते. अधिवेशनाचे पहिले चार दिवस हे घोषणाबाजी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी गाजले. त्यानंतर बुधवारी पाचव्या दिवशी मात्र विधान भवनाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व असा गोंधळ पाहायला मिळाला. विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी शिंदे गटातील आमदार आणि विरोधी पक्षांतील विशेषत: राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये चक्क धक्काबुक्की झाली. दोन्ही बाजूंचे आमदार चक्क गल्लीतील पोरांप्रमाणे भिडले. महाराष्ट्राच्या विधान भवनातील सत्ताधारी-विरोधकांमधील ही धुमश्चक्री राज्यातील सगळ्या जनतेने पाहिली. एखाद्या गल्लीतले किंवा चौकातले दोन गट आमने-सामने यावेत तसे लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी समोरासमोर येऊन एकमेकांना धक्काबुक्की केली. अधिवेशन काळात लोकांच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, राज्यातल्या ऐरणीच्या प्रश्नांवर आणि अडचणींवर साधक- बाधक चर्चेतून मार्ग काढून जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत, लोककल्याणकारी योजना आखाव्यात, असे साधारण अधिवेशन काळात अपेक्षित असते. पण हे सगळे चित्र इतिहासजमा झाले. विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक हमरातुमरीवर आले, एवढ्यावर हे प्रकरण शांत झाले असे नाही, तर दोन्ही गटांमध्ये एकमेकांना ढकलाढकली, धक्काबुक्कीही झाली.
या सगळ्या गोंधळावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना, जे काही चाललेय ते बरोबर नाही, असे सांगत आपल्या आमदारांना समज दिली आणि त्या सर्वांना सभागृहाच्या दिशेने ते घेऊन गेले. खरं म्हणजे अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधी पक्षांच्या म्हणजे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’, ‘ओला दुष्काळ जाहीर करा, गाजर देणे बंद करा’, ‘पूरग्रस्तांना मदत करा’, अशी घोषणाबाजी सुरू केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गट आणि भाजपचे आमदार यांनी चक्क पाचव्या दिवशी ‘लवासाचे खोके, बारामती ओक्के’, ‘वाझेचे खोके, मातोश्री ओक्के’ अशी घोषणाबाजी सुरू केली. या घोषणाबाजीदरम्यान राष्ट्रवादीचे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांनी शिंदे – फडणवीस सरकारला डिवचण्यासाठी तसेच सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी गाजराचा हार आणला. थोड्या वेळानंतर त्यांनी तोच हार गळ्यात घातला आणि त्यांच्यासह विरोधी पक्षांच्या आमदारांनी जोरजोरात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. याचवेळी त्यांच्या गळ्यातील हार हिसकावून घेण्यासाठी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले हे पुढे सरसावले. त्यांनी आमदार पाटील यांच्या गळ्यातील हार हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. हे पाहून अनिल पाटील यांच्या मदतीला मिटकरी धावून आले. त्यांनीही अनिल पाटील यांच्या बाजूला थांबून जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात केली. मग हार हिसकावण्यासाठी गोगावले, महेश शिंदे हे मिटकरी यांच्या दिशेने गेले. या गोंधळात दोन्ही बाजूंचे आमदार एकमेकांना भिडले. विधान भवनाच्या पायऱ्यांवर हा राडा झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली. सुरुवातीला महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार अमोल मिटकरी यांनी केली आहे, तर मिटकरी यांनीच आपल्याला धक्काबुक्की केल्यानंतर पुढील सगळ्या गोष्टी घडल्या, असे महेश शिंदे यांनी म्हटले आहे. जनतेने आपल्याला का िनवडून दिले याबाबतचे कोणतेही सोयरसुतक त्यांना राहिलेले नाही. महाराष्ट्रातला शेतकरी ओल्या दुष्काळाने त्रस्त आहे. अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. महाराष्ट्रातल्या रस्त्यांची तर चाळण झाली आहे. सर्वत्र खड्ड्यांचे सम्राज्य दिसत असून या खड्ड्यांतून वाट काढताना हजारो लोकांचे बळी गेले आहेत. मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर नुकताच विनायक मेटेंसारख्या राजकीय नेत्याचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचा सापळा बनलेल्या या महामार्गावरील मृत्यू रोखण्याच्या उपायांची चर्चा होणे बाकी आहे. ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. हे आणि यासारखे जनतेचे असंख्य प्रश्न अजून सुटलेले नाहीत आणि आपले आमदार मात्र एकमेकांच्या कुचाळक्या करण्यात, भिडण्यात व्यस्त दिसत आहेत. विशेषत: लोकशाहीच्या या मंदिरात सर्वांनी तारतम्य बाळगणे नितांत गरजेचे आहे. विधिमंडळ म्हणजे कायदेमंडळ. तिथे आमदारच कायदा हातात घेताना दिसताहेत, राडा घालताहेत. मग गरीब बिच्चाऱ्या, नाडलेल्या जनतेने दाद मागायची तरी कुणाकडे? असा प्रश्न या गोंधळानंतर आ वासून उभा राहिला आहे. खरं तर तुमचे – आमचे प्रश्न मांडण्यासाठी आमदार विधिमंडळात जात असतात, पण तेच आमदार जर तिथे जाऊन एकमेकांची उणीदुणी काढत, गावगुंडांसारखे भिडत असतील, तर कुणाकडे दाद मागावी. एकूणच ‘आमदारांनी घातला राडा आणि विकासाचा अडला गाडा’, असे नाईलाजाने म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ‘काय ते आमदार… काय ती भाषा आणि काय तो राडा… अजिबातच नॉट ओक्के…’, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.